25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसंपादकीयआता पुरे...पुरे !

आता पुरे…पुरे !

एकमत ऑनलाईन

परमेश्वर माणसाची नेहमीच परीक्षा पाहतो. काही वेळा असा काही ताण देतो की माणसाला दयावया करण्याची वेळ येते. जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो. अगदी झोळी फाटायची वेळ येते तेव्हा दयाघना, आता पुरे असे म्हणायची वेळ येते. माणसाला कोणतेही सहन होत नाही. त्याला उन्हाळा सहन होत नाही अन् पावसाळाही सहन होत नाही. उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होते तेव्हा त्याचा थयथयाट सुरू होतो आणि कधी एकदा पाऊसमान सुरू होते असे वाटते. एकदा का पाऊस सुरू झाला की भान हरपण्याची वेळ येते. जून महिना सुरू झाला की ‘बरसो रे’चे वेध लागतात. कारण माणसाचे जीवनच त्यावर अवलंबून आहे. वेळेवर पाऊस आला तर वेळेवर पेरण्या होणार आणि तरारणा-या पिकाबरोबर जीवनाच्या रहाटगाड्यात बहार येणार ! जून महिन्याआधीच पाऊसमानाबाबत इतकी उत्सुकता असते की त्याबाबत हवामान विभागाचे वेगवेगळे अंदाज जाहीर होत असतात.

त्यावर भविष्यासंबंधी शेख महंमदी स्वप्नं सुरू होतात. पुढे जसजसा स्वप्नभंग होत जातो तसतसे आभाळाकडे हात जोडले जातात. निर्गुण, निराकार दयाघनाला दया येते, ‘जम के बरसो रे’ची प्रार्थना त्याला मान्य होते आणि अदृश्य शक्तीच्या मायेला पाझर फु टतो. नंतर अशी काही बरसात होते की माणसाच्या नाका-तोंडात पाणी जाऊ लागते आणि आक्रोश सुरू होतो. आता पुरे-पुरे रे ! सध्या देशाची-राज्याची तीच स्थिती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसणा-या मुसळधार पावसाने काही अपवाद वगळता शेत-शिवार आनंदित झाले असले तरी सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. आल्हाददायक वाटणारा पाऊस उरात धडकी भरवत आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कोकण, रत्नागिरी, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, नांदेड अशा सर्वच शहरांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.

वसईत घरावर दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला तर उरणमध्ये घरावर दरड कोसळल्याने एकाला आपले प्राण गमवावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोली दौ-यावर असून राज्यातील सर्वच यंत्रणांना त्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या शाळांना एक दिवसाची तर काही ठिकाणी शनिवारपर्यंत सुटी देण्यात आली आहे. कोकणात रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. रायगडमध्ये बुधवारी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे रोहा, नागोठणे आणि आपटा परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. एकूण १२६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक ८० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. अर्धापूर आणि भोकर तालुक्यात प्रत्येकी एकजण पुरात वाहून गेला. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून हिंगोली जिल्ह्यात १९ महसूल मंडळांत पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून पाऊस सुरू असून या भीजपावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत कमी-अधिक प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे. शेत-शिवारात कोवळ्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्याने पिके पिवळी पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यातील १६ महसूल मंडळांत ६० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. लातूर, हरंगूळ, चिंचोली महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होईल व गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतक-यांनी एप्रिल-मेमध्येच खरीप पेरणीसाठी रान तयार करून ठेवले होते परंतु मृग नक्षत्राने निराशा केली, आर्द्रा नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाला नाही. पुनर्वसु नक्षत्राने मात्र जिल्ह्यात पाणीच पाणी करून टाकले. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या भीजपावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले वाहते झाले आहेत.

काही साठवण तलावांत पाणी पातळी ब-यापैकी वाढली आहे. मात्र, मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांत नोंद घ्यावी असा जलसंचय झालेला नाही. मांजरा नदीवरील काही बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अवस्थेत आहेत. मराठवाड्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीनच्या रानात माजलेले तण काढता येत नसल्याने अनेक ठिकाणी पिके पिवळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी ९२ ते ९५ टक्के कापूस पेरा झाला आहे तर ८० ते ९० टक्के तूर, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांची पेरणी झाली आहे. सततच्या पावसामुळे ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त आहे. हवामान विभागाने राज्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते, दळणवळण आणि संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मांजरा नदीवरील ७ बॅरेजेसचे दोन दरवाजे उघडून पाणी मांजरा नदीत सोडण्यात आले असून मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात ६ सें.मी.ची वाढ झाली आहे. विष्णुपुरी धरणाचे ७ तर बाभळी बंधा-याचे सर्व १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. राज्यात गत १२ दिवसांत अतिवृष्टीमुळे ८४ नागरिकांचा तसेच १८० जनावरांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’ची १३ आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणा-या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही विभागांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीने देशातील २५ राज्यांना झोडपले आहे. गुजरातमध्ये पावसामुळे १४ जण मृत्युमुखी पडले तर ३१ हजार पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. याआधी अतिवृष्टीने आसामची दाणादाण उडवली होती. ८ जुलै रोजी अमरनाथ गुहेजवळ ढगफु टी झाल्याने आलेल्या पुरात किमान १६ भाविकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात चोहीकडे पाणीच पाणी झाल्याने आता पुरे…पुरे म्हणावे लागत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या