18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसंपादकीयपर्यावरणाचे संकट

पर्यावरणाचे संकट

एकमत ऑनलाईन

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत सण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आणि उत्साह ओसरल्यानंतर समोर उभ्या राहिलेल्या गंभीर स्थितीला तोंड द्यायचे ही भारतीयांची आवडती सवय आहे परंतु याबाबत आधीच काळजी घेतली असती तर… या ‘तर’ला आपल्याकडे उत्तर नसते. दिवाळीत फटाक्यांची हौस भागवू नका असे कितीही घसा खरवडून सांगितले तरी आम्ही फटाके वाजवणारच. फटाक्यांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो हे माहित असूनही फटाक्यांचे आवाज काढले जातात. फटाक्यांमुळे शहरी भागातील हवा बिघडली. मुंबई, पुण्यासह राज्यातील छोट्या शहरांमधील वातावरणावर परिणाम झाला.

संपूर्ण देशातही हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. देशातील सर्वांत प्रदुषित शहर असलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचल्याचे आढळून आले. गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) ५० पर्यंत एक्युआय असलेली हवा चांगली मानली जाते. १०० ते २०० दरम्यानची हवा सर्वसाधारण, २०० ते ३०० एक्युआय दरम्यानची हवा वाईट, ३०० ते ४०० दरम्यानची हवा अत्यंत वाईट तर ४०० एक्यूआयवरील हवा गंभीर मानली जाते. देशाची राजधानी नवी दिल्लीत राज्य सरकारने फटाके फोडण्यास बंदी घातली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवरील बंदी उठविण्याची घाई नसल्याचे सांगत लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या असे आवाहन केले. फटाक्यांवरचा खर्च मुलाबाळांच्या मिठाईवर खर्च करा, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर पूर्णत: बंदी घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार दिल्ली सरकारने १४ सप्टेंबरला अध्यादेश जारी करत राजधानीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर कायदेशीर बंदी घातली होती.

या निर्णयाला व्यापा-यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खंडपीठाने ही याचिका फेटाळल्यानंतर व्यापा-यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही ऐनवेळी लादलेली बंदी असून त्यामुळे आमच्या उपजिविकेवर परिणाम होत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे होते. काही वर्षांपूर्वी दिल्ली हे जगातील सर्वांत प्रदुषित शहरांपैकी एक मानले जात होते. नव्या अहवालानुसार आशियातील दहा सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी आठ शहरे भारतातील आहेत. परंतु या यादीत दिल्लीचा समावेश नाही. दिल्लीने अद्याप प्रदुषणाविरुद्धची लढाई जिंकलेली नसली तरी दिल्लीला आता जगातील सर्वांत प्रदुषित शहर मानले जात नाही, ही उत्साहवर्धक बाब म्हटली पाहिजे. महाराष्ट्रातही दिवाळी मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी केली जाते. या सणाला मोठ्या आवाजाचे महागडे व रोषणाई करणारे फटाके फोडले जातात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण होते. यामुळे श्वासोच्छवासास त्रास, डोळ्यांना गंभीर इजा होते, हात भाजणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने १ जानेवारी २०२३ पर्यंत फटाके फोडण्यास त्याची विक्री व साठवणूक करण्यास बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आणि ६ महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दिल्ली सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे.

पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून विविध संस्था प्रयत्नशील आहेत. त्यासाठी जनतेनेही सहकार्य करावयास हवे. निवडणुकांच्या विजयी मिरवणुकीत वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजाचे फटाके फोडून उन्माद व्यक्त केला जातो. हे प्रकार थांबले पाहिजेत. ध्वनिप्रदूषणाची समस्याही मोठी आहे. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात ध्वनिप्रदूषणाने कहर केला. हा सामना सुमारे ९३ हजार प्रेक्षकांनी पाहिला. भारताने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी जो गिल्ला केला तो काही कि. मी. पर्यंत ऐकू गेला म्हणे! सध्या ध्वनिप्रदूषण, वायूप्रदुषण वाढत चालल्याने विविध आजार वाढत चालले आहेत. त्यासाठी पर्यावरण समतोल राखण्याचे आणि स्वास्थ्य जपण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. फटाक्यात बेरियमचा वापर केला जातो. फटाके फोडल्याने पर्यावरण प्रदुषित होते असे म्हटले जाते.

मात्र वर्षभरापासून युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे तेथे बॉम्बवर बॉम्ब फुटत आहेत मात्र आजपर्यंत तेथील पर्यावरण प्रदुषित झाल्याचे ऐकिवात नाही, हे कसे? भारतात मात्र दिवाळीला फटाके फोडले की वायू प्रदुषण, ध्वनि प्रदूषण होते, श्वास गुदमरतो हे कसे काय होते असा सवाल फटाके प्रेमींकडून केला जातो. आशिया खंडातील सर्वाधिक प्रदुषित १० शहरांमध्ये भारतातील राजा महेंद्रवरम व गुरुग्रामसह ८ शहरांचा समावेश असल्याचे जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या नव्या आकडेवारीत दिसून आले आहे. देशात हिवाळ्याची चाहूल लागताच अनेक शहरांमधील प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. नव्या यादीनुसार आंध्र प्रदेशातील राजा महेंद्रवरम, दिल्ली लगतचे गुरुग्राम, रेवाडी, मुझफ्फर जवळचे धारूहेडा, लखनौस्थित तालकटोरा, बेगुसराय जवळचे आनंदपूर, देवासस्थित भोपाळ चौक, गुजरातमधील खडकपाडा, दर्शननगर आणि छपरा आदी शहरांना प्रदुषित शहरे मानण्यात आले आहे. भारतीय शहरे वगळता चीनमधील लुझोऊ स्थित शिया ओशिशांग बंदर आणि मंगोलियाच्या बपानखोशू शहरातील हवेचा दर्जा अतिशय खराब आहे.

प्रदुषण आणि जैवविविधतेच्या हानीवर नवे उपाय शोधणे हे जगासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विनाश करणा-यांसोबत काम करू नका असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुथेर यांनी केले आहे. संशोधन आणि नवकल्पनांच्या बाबतीत भारतीय शैक्षणिक संस्था अत्यंत मोलाचे योगदान देत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. लवचिकता हा भारतीयांचा गुणधर्म आहे. भारताकडे वैश्विक गुरु बनण्याची क्षमता आहे असेही ते म्हणाले. हवामान बदलाशी लढा देताना तापमान नियंत्रणासाठी विकसित आणि विकसनशील देशांदरम्यान ऐतिहासिक करणे काळाची गरज आहे. जी-२० चे सदस्य असलेले प्रगत देश वैश्विक ८० टक्के प्रदूषणाला जबाबदार आहेत. पर्यावरणाचे हे संकट सामुहिक विकासात सर्वांत मोठा अडथळा आणत आहेत. कोट्यवधी लोकांचे उदरभरण करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी भारतीय अर्थव्यवस्था देखील या वैश्विक संकटापासून दूर नाही. हवामान बदलाच्या विरोधात लढण्यासाठी एकता महत्त्वाचा घटक आहे. जीवनशैली बदलून आपण पर्यावरण रक्षण करू शकतो. बदलासाठी जागतिक एकता गरजेची आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या