24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसंपादकीयएकीची ग्वाही !

एकीची ग्वाही !

एकमत ऑनलाईन

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ईडी, प्राप्तिकर खाते, सीबीआय आदी केंद्रीय यंत्रणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री, नेते यांच्या अक्षरश: पिच्छावर पडलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये बसलेल्या पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. त्यात विरोधी पक्ष भाजप ही संधी साधून जास्तीत जास्त आक्रमक हल्ले चढवत राज्यातील जनतेच्या मनात आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. या अस्वस्थतेला सत्ताधा-यांकडून खणखणीत उत्तर हाच एकमेव उपाय होता. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री अशी दुहेरी भूमिका पार पाडत असलेले उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याची केवळ शिवसैनिकांनाच नाही तर सरकारमधील उर्वरित दोन मित्रपक्षांना व राज्यातील जनतेलाही प्रचंड उत्कंठा लागली होती.

राज्यातले आघाडी सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी भविष्यात कोणता रस्ता निवडू इच्छितात हे स्पष्ट होणे सरकारच्या भवितव्याविषयीचे संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या स्वभावाविरुद्ध अत्यंत आक्रमकपणे भाषण करताना थेट भाजपविरुद्ध दंड थोपटून शिवसेनेचा पक्ष म्हणून पुढचा रस्ता कोणता हे सुस्पष्ट केले. भविष्यात शिवसेनेचा प्रमुख राजकीय शत्रू हा भाजपच आहे, हे त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने स्पष्ट केल्याने केवळ राज्य सरकारच्या भवितव्याबाबतचाच नाही तर राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांतील आघाडीतील पक्षांच्या एकीबाबतचाही संभ्रम दूर झाला आहे. उद्धव ठाकरेंचे हे भाषण अर्थातच मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंगच होते व ते अपेक्षितही आहे. शिवसेनेसाठी मुंबई मनपातील सत्ता ही सर्वतोपरी प्राधान्याचा विषय आहे, हे उघड सत्य आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीत शिवसेनेचा प्रमुख सामना हा भाजपबरोबरच होणार आहे, हे ही स्पष्ट आहे.

मागच्या निवडणुकीतही असाच सामना झाला होता व शिवसेनेला अगदी निसटता विजय मिळाला होता.भाजपने त्यावेळी राज्य सरकारच्या बदल्यात मुंबई मनपा सेनेकडे सोपविण्याची खेळी केली होती. हा इतिहास पाहता यामुळेच उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता लागलेली होती. ती संपवताना उद्धव ठाकरे यांनी भविष्यात भाजपशी थेट दोन हात करण्याचा रस्ता निवडल्याचे सुस्पष्ट करत केवळ शिवसैनिकांचा नाही तर आघाडीतील मित्रपक्षांचा व राज्यातील जनतेचाही संभ्रम मिटवून टाकला आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या हिंदुत्वाची नाळ रा.स्व. संघाच्या हिंदुत्वाशी जोडून व भाजपचेच हिंदुत्व हे ‘नवहिंदुत्व’ असल्याचे दाखवून देण्याचा आणि आपल्या हिंदुत्वाची रेघ स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यातून देशात २०२४ मध्ये भाजपविरोधी जी आघाडी निर्माण होईल त्या आघाडीत भाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डाला चढे उत्तर देण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून शिवसेना सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकले आहेत.

देशात भाजपविरोधी उभारल्या जाणा-या विरोधी आघाडीसाठी हा खूप मोठा व महत्त्वाचा दिलासा आहे. या विरोधी आघाडीला भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी एक भिडू मिळणार आहे. शिवसेना भाजपच्या हिंदुत्वाला आक्रमक व चढे उत्तर देऊन धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर एकत्र येणा-या विरोधी पक्षांचा रस्ता खूप सुकर करू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला भविष्यातील रस्ता सुस्पष्ट केल्याने आश्वस्त झालेल्या शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंसोबतची एकीची ग्वाही देण्यास अजिबात विलंब न लावता भाजपची पुरती गोची करून टाकली. उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भाषणाचे पडसाद भाजपमध्ये उमटणे अपेक्षितच होते. ते तसे उमटलेही! देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची सगळीच नेतेमंडळी ठाकरेंच्या भाषणावर तुटून पडली. फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरेंना स्वत: मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणूनच आघाडी जन्माला आल्याचा जोरदार हल्ला चढवला व पुन्हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्याचे निमित्त बरोबर पकडून शरद पवारांनी तातडीने सप्रमाण खुलासा करत उद्धव ठाकरेंची जोरदार पाठराखण करून व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या एकीची ग्वाही देऊन भाजपची पुरती बोलतीच बंद करून टाकली. भाजपने सत्तेचा दुरुपयोग करत कितीही यंत्रणा मागे लावून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सेना व राष्ट्रवादी त्याला भीक घालणारच नाहीत तर उलट या प्रयत्नांना एकत्रितपणे व तेवढ्याच आक्रमकतेने तोडीस तोड उत्तर देणार हे दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सुस्पष्टच केल्याने आता संभ्रमांचे सगळेच ढग हटून आघाडी सरकारच्या भवितव्याचे आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे राज्यातील आगामी निवडणुका आघाडीतील मित्रपक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या काय किंवा एकत्र येऊन लढवल्या काय? त्याचा सरकारच्या स्थैर्यावर व एकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सुस्पष्टच झाले आहे. थोडक्यात आता भाजप नेत्यांनाही नित्यनेमाने सरकार पाडण्याचे मुहूर्त शोधण्याचे उद्योग बंद करावे लागतील व त्यांच्याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळाव्यातच पक्षाला विरोधी पक्ष म्हणून कामाला लागण्याचा जो सल्ला दिलाय तो स्वीकारावा लागेल.

भाजपला आता केवळ राज्यातच नाही तर देशपातळीवरही आजवर मित्र राहिलेल्या पक्षांना भविष्यात अंगावर घेण्याची तयारी ठेवावी लागेल व स्वत:च्या पक्षाचा नवा रस्ताही तयार करावा लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून विरोधकांना घाबरवण्याचा भाजपचा रडीचा डाव आता देशात फार काळ यशस्वी होणार नाहीच, हे आता सुस्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी नक्की अस्तित्वात येणार याचेही स्पष्ट संकेत ममता बॅनर्जींच्या पाठोपाठ आता शरद पवार व उद्धव ठाकरे या राज्यातल्या दोन बड्या नेत्यांनीही स्वच्छपणे दिलेले असल्याने देशातील राजकारणाची कूस बदलण्यास आता सुरुवात झाल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. भाजपची अजेय जोडी मोदी-शहांना हे संकेत नक्कीच कळले असतील! त्यावर आता भाजप कोणती रणनीती आखणार? याचीच आगामी काळात प्रतीक्षा राहील, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या