31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home संपादकीय ...आता आव्हानांना भिडा !

…आता आव्हानांना भिडा !

एकमत ऑनलाईन

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना आणि स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत दररोजच ‘हे सरकार पडणार’ अशी हाळी दिली जात असतानाही महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आपली वर्षभराची वाटचाल पूर्ण करत अत्यंत विश्वासाने पहिला वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या संकटाच्या छायेत राज्य अद्यापही वावरत असल्याने वर्षपूर्तीचे जल्लोषी समारंभ न होणे साहजिकच व योग्यही! मात्र, तरीही या वर्षपूर्तीने सरकारमध्ये सामील तीनही पक्ष, त्या पक्षांचे नेते-कार्यकर्ते यांना नक्कीच मोठा राजकीय आत्मविश्वास दिला. तसेच सर्व शंका-कुशंकांवर यशस्वीपणे मात करत राज्यातील जनतेलाही स्थैर्याचा विश्वास दिला.

आघाडी सरकार म्हटले की, मतभिन्नता असणे व संसार चालवताना भांड्याला भांडे लागणे आलेच! मात्र, या मतभिन्नतेचे रुपांतर मनभिन्नतेत झाले की, मग खेळखंडोबा होतो. या राजकीय चमत्कार ठरलेल्या प्रयोगाचे शिल्पकार शरद पवार यांनी अत्यंत कौशल्याने मनभिन्नता होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आणि म्हणूनच भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचे जेवढे काही प्रयोग वर्षभरात झाले ते साफ अपयशीच ठरले! सत्तेचा तोंडातला घास हिरावला गेल्याने भाजप अस्वस्थ होणे, भाजप नेत्यांचा जळफळाट होणे व त्यातून त्यांनी थयथयाट करणे साहजिकच! शिवाय केंद्रात सत्तास्थानी असल्याने राज्यातील विरोधी सरकारची कोंडी करण्याची प्रत्येक संधी भाजपकडून साधली जाणेही साहजिकच! मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अशा प्रत्येक कारनाम्याला पुरून उरले.

भाजपने तर राज्यपालांनाही मैदानात उतरवून सरकारविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला, संघर्ष उभा केला. मात्र, विश्वासाच्या जोरावर आघाडी अभेद्य व एकजूट राहिली. नरेंद्र मोदी व अमित शहा या ‘अजेय जोडी’चा चौखूर उधळणारा वारू एकीच्या आणि निग्रहाच्या बळावर नक्कीच रोखता येतो, हे महाराष्ट्रातल्या या राजकीय चमत्काराने देशाला दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही त्यामुळे सरकारच्या कामकाजात गोंधळ उडेल, असाच अंदाज व्यक्त होत होता. मात्र, शरद पवार आपला पूर्ण अनुभव व कौशल्य पणाला लावून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे हे सरकार केवळ पहिला वाढदिवसच नाही तर पाच वर्षांचा आपला संपूर्ण कार्यकाळ नक्कीच पुरा करेल, हा विश्वास आता निर्माण झाला आहे. राज्यातील जनतेच्या दृष्टीने ही निश्चितच समाधानाची बाब आहे. उलट आता सरकार पडणार, सरकार पडणार म्हणून दररोज थयथयाट करणा-या भाजपचे हसू होते आहे आणि जनतेच्या मनातला विरोधी पक्ष म्हणून भाजपवर असणारा विश्वास कमी होतो आहे.

पुर्णेत भरधाव कारने दोघांना चिरडले

खरं तर भाजप नेत्यांनी ही बाब लक्षात घेऊन आता आपली पोटदुखी दाबायला हवी आणि जनतेसाठी काम करण्यावर भर द्यायला हवा. असो! ही झाली राजकीय बाजू! मात्र, सरकार म्हणून जनता केवळ राजकीय बाजूने पहात नाही तर जनतेची अपेक्षापूर्ती या अंगानेही सरकारच्या कामकाजाकडे पहात असते.त्यामुळे सरकारच्या वर्षपूर्तीनंतर वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा व आढावा अटळच! इथे मात्र, सरकारला कोरोना संकटाने अक्षरश: जखडून टाकले आहे. हे सरकार सत्तेवर आले आणि त्यापाठोपाठ कोरोनाचे संकटही आले. ते अद्यापही कायम आहेच.सरकार पाठोपाठ आता कोरोनाच्या संकटाचीही वर्षपूर्ती होते आहे. त्यामुळे साहजिकच सरकारने हे संकट कसे हाताळले? हाच कळीचा प्रश्न बनतो. उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कोरोना संकट अत्यंत धैर्याने, संयमाने व ठामपणे हाताळले आहे, हे मान्यच करावे लागेल! महाराष्ट्रात व त्यातल्या त्यात आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रचंड उद्रेक झालेला असतानाही ठाकरे सरकारने अत्यंत संयमाने व ठामपणे परिस्थिती हाताळली आणि धारावीसारख्या महाकाय झोपडपट्टीतला कोरोना नियंत्रणात आणण्याचा चमत्कार घडवून दाखविला. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याचे कौतुक केले आणि हा धारावी पॅटर्न सर्वत्र वापरला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

ही सरकारची कामगिरी अभिनंदनीयच! मात्र, त्याचवेळी कोरोनाने राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या त्रुटी व अवस्थाही चव्हाट्यावर आणली. ठाकरे सरकार सत्तेवर असल्याने साहजिकच ही जबाबदारी त्यांच्यावर येणे अटळच. मात्र, या दोष किंवा त्रुटीला सध्याचे सरकार नव्हे तर आजवरची सर्वच सरकारे कारणीभूत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाबाबत मागच्या कित्येक वर्षांपासून सातत्याने जी सार्वत्रिक अनास्था सरकारी पातळीवर दाखविण्यात आली त्याचाच हा परिपाक आहे. असो! मात्र, आहे त्या साधनांसह सरकार व यंत्रणा कोरोना संकटाला भिडली व कोरोना नियंत्रित करण्यात यश मिळविले, हे अभिनंदनीयच! मात्र, कोरोना संकटाशी लढण्यातच सर्व शक्ती पणाला लागल्याने राज्यात जी इतर संकटे व आव्हाने उभी राहिली आहेत त्यावर सरकार हवे त्या ताकदीने लक्ष देऊ शकलेले नाही. त्यामुळे ही संकटे व आव्हाने आता हळूहळू ज्वालाग्राही बनतायत! आता वर्षपूर्तीनंतर व कोरोना ब-यापैकी अटोक्यात आल्यावर सरकारने तातडीने या आव्हानांशी भिडावे व त्रस्त जनतेला दिलासा द्यावा, ही जनतेची अपेक्षा आहे.

वरवडे टोल नाक्याजवळ २१४ किलोचा गांजा पकडला

टाळेबंदीने कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, डबघाईला आलेले उद्योगधंदे, प्रचंड नुकसान सहन करावे लागल्याने संकटात सापडलेले व्यापार-व्यवसाय, रोजंदारीवरील कामगार, मजूर व कोरोनाच्या संकटातच नैसर्गिक संकटाचाही तडाखा बसल्याने उद्ध्वस्त झालेले शेतकरी या सर्व समाजघटकांना सरकारच्या मदतीची व आधाराची अपेक्षा आहे. कोरोनाने सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण केलाय हे सत्यच. मात्र, तरीही त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारला नवे मार्ग शोधावे लागतील! केवळ तिजोरीतील खडखडाट व केंद्राकडे बोट दाखवून भागणार नाहीच. या आव्हानांना सरकारने स्वत:च्या हिमतीवर भिडणे आवश्यक आहे कारण त्रस्त सामान्य माणसांना राजकीय उत्तराने दिलासा मिळणार नाहीच! कोरोना संकटातही महाराष्ट्रात गुंतवणूक सर्वांत जास्त आली आहे व जीएसटी संकलनातही राज्य देशात अग्रेसर आहे. हे राज्याची स्वत:ची ताकद दाखविणारेच आहे. तेव्हा ही ताकद आता पूर्णपणे वापरायला हवी.

संकटे एकावेळी हातात हात घालूनच येतात. त्यांना भिडावेच लागते. राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्व संकटे व आव्हानांना भिडले आहे, हा दिलासा आता जनतेला मिळायला हवा. त्यासाठी सरकार केवळ चालून उपयोग नाही तर ते पूर्ण वेगाने धावायला हवे. तरच जनतेची अपेक्षापूर्ती होईल व जनतेचा सरकारवर व या सरकारच्या निमित्ताने झालेल्या राजकीय प्रयोगावरचा विश्वास दृढ होईल, हे मात्र निश्चित!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या