22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home संपादकीय निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

एकमत ऑनलाईन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे ठरवले आहे. या प्रस्तावित प्रकल्पाबाबत तज्ज्ञांशी व या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींशी चर्चा करण्यासाठीच आपण मुंबईत आलो आहोत कारण मुंबईतील मायानगरीला शतकोत्तर मोठी व यशस्वी परंपरा आहे, असा योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे. त्यांचा हा दावा प्रामाणिक व सत्य असेल तर खरे तर महाराष्ट्राची व मुंबईची छाती अभिमानाने भरूनच यायला हवी. मात्र, देशातील पूर्वानुभव पाहता या दौ-याने महाराष्ट्राची छाती फुगण्याऐवजी छातीत धडकीच भरल्याचे चित्र आहे आणि साहजिकच त्यातून राजकीय कल्ला सुरू आहे. मनसे व शिवसेनेने हा महाष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याचाच प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट आक्रमक होत योगी मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या समोर निदर्शने केली.

योगींनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली खरी पण त्यांच्या हेतूबाबत साशंकता कायमच आहे. यातून नव्या चर्चेलाही सुरुवात झालीय! एक प्रवाद राज्यातील उद्योग पळवण्याचा हा डाव असल्याचा तर दुसरा प्रवाद राज्याराज्यांत निखळ स्पर्धा असाव्यात व प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याने आपल्या राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात गैर काय? हा! तसे वरवर पाहिले तर दुसरा प्रवाद योग्यच वाटतो कारण प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याने त्या राज्याच्या विकासासाठी तळमळीने प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही! उलट ते तसेच घडायला हवे व राज्याचा विकास व्हायला हवा, हीच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, हेच सर्वसामान्य जनतेचे मत आहे. मात्र, प्रत्यक्षात विकासाच्या स्पर्धेवरून गदारोळ सुरू होतो व तो थेट प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न बनतो! त्यावेळी देशाचे संविधान एक, देश एक किंवा विविधतेत एकात्मता किंवा सर्व राज्यांना समान संधी व समतोल विकास किंवा देशातील राज्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास, वगैरे इतर वेळी अत्यंत आकर्षक ठरणारे दावे व घोषणा अक्षरश: बाजूला पडतात, विस्मरणात जातात आणि उरते ती फक्त अत्यंत अनकुचीदार बनलेली प्रादेशिक अस्मिता! हे असे का होते? तर आपल्याकडे विकासाच्या मुद्यावर निखळ स्पर्धा होत नाही, राजकारण होते.

विकासाचा मुद्दा हा राजकीय श्रेयाचा व पर्यायाने राजकारणाचा मुद्दा बनला आहे. तो तसा बनवण्यात देशातील सर्वच राजकीय पक्षांनी सर्वतोपरी योगदानच दिले आहे. आणि म्हणूनच आपल्या देशात एखाद्या प्रकल्पाच्या येण्याने होणा-या फायदे-नुकसानीवर कमी आणि त्याच्यावरून असणा-या राजकीय फायद्या-तोट्यांवरच जास्त चर्चा होते. साहजिकच या अंगानेच चर्चा घडवायची तर त्याला प्रादेशिक, सांस्कृतिक, भाषिक अस्मितांची झालर लावली जाणे अपरिहार्यच! ही बाब दोन्ही बाजूंनी तेवढ्याच तीव्रतेने होते, हे विशेष आणि त्यामुळेच मग वरकरणी अत्यंत योग्य व सत्य भासणारा हा दोन क्रमांकाचा प्रवाद मागे पडून प्रथम क्रमांकाच्या प्रवादाची चर्चा सत्य वाटायला लागते! देशात राज्याराज्यांमध्ये आजवर असेच घडत आल्याची व अशा ‘पळवापळवीची’ कित्येक उदाहरणे देता येतीलच! शिवाय विविध प्रकल्पांवरून आजवर रंगलेल्या प्रचंड मोठ्या राजकारणाच्या प्रकरणांची यादीही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या सगळ्याची उजळणी हा जागेचा अपव्ययच!

भरदिवसा वृद्ध शेतक-याची लूट

मूळ मुद्दा हाच की, विकास हा राजकारणविरहित असावा, हीच अपेक्षा असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती ही नेमकी त्याउलटच असते, हेच वास्तव! यामुळेच योगी पत्रपरिषद घेऊन आपल्या दौ-याचे साळसूद समर्थन करत असले तरी त्यावर विश्वास बसणे व ते पचनी पडणे अवघडच! ते पचनी पडायचे तर मग योगींवरच आपले म्हणणे खरे असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी येते. ते तसे सिद्ध करायचे तर मग योगींनी केवळ बॉलिवूडचाच अभ्यास करून भागणार नाही. त्यांना टॉलिवूडचा व प्रत्येक राज्यातील मनोरंजन क्षेत्राचा तेवढ्याच तळमळीने अभ्यास करावा लागेल. एवढेच नव्हे तर त्यांनी हॉलिवूडचा व जगातील प्रत्येक देशातील या उद्योगाचा अभ्यासही तेवढ्याच तळमळीने तसेच तत्परतेने करायला हवा कारण त्यांना जी फिल्मसिटी उभारायची आहे ती जागतिक पातळीवरची श्रेष्ठ बनवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहेच! शिवाय ते ही महत्त्वाकांक्षा पदोपदी बोलून दाखवतायत! योगींनी हे केले तर त्यांच्या प्रयत्नांवर आज जी प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाची टीका होते आहे ती आपोआपच निराधार व असत्य ठरेल!

योगी आदित्यनाथ हे करून आपले ‘निर्मोहीपण’ सिद्ध करणार का? हा खरा प्रश्न! योगींनी या प्रश्नाचे आपल्या कृतीतून उत्तर द्यायला हवे! या उत्तरावरच त्यांचा हा प्रयत्न विकासाची निखळ स्पर्धा की निव्वळ राजकीय हठयोग? हे ठरणार आहे. सध्या तरी राज्यातील नवे राजकीय समीकरण आणि त्यातून योगींच्या भाजपचा होत असलेला जळफळाट हीच स्थिती पहायला मिळतेय. सत्ता हातून निसटल्याने अस्वस्थ भाजप व त्या पक्षाचे नेते येनकेन प्रकारे राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा, कोंडी करण्याचाच प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचा पक्षाचा बिनीचा शिलेदार म्हणूनच योगी आदित्यनाथ यांची भाजपात व देशात ओळख आहे व त्यांनी वारंवार आपली ही ओळख सिद्धही केली आहे. त्यामुळेच योगींनी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले तर बिघडले कुठे? हा वरकरणी खरा व आकर्षक वाटणारा प्रवाद हा प्रत्यक्षात मात्र पोटात गोळा आणणारा ठरतो, हे नाकारता येणार नाहीच!

त्यामुळे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर शंका उपस्थित करण्यास गैर किंवा चुकीचे ठरवणे आणि ते प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करत असल्याचा आरोप घाईघाईने करणे चूकच! याबाबत कुठल्याही निष्कर्षाला पोहोचण्यापूर्वी प्रत्यक्ष घडतेय काय? याची प्रतीक्षा करणे शहाणपणाचे! आता राहता राहिला मुद्दा योगींच्या फिल्मसिटीमुळे मुंबईतील बॉलिवूडला घरघर लागण्याचा तर तो भुई थोपटण्याचाच प्रकार! कारण बॉलिवूड हे एका दिवसात मुंबईत विकसित व स्थिरस्थावर झालेले नाहीच. त्यामागे किमान शतकभर वर्षांची परंपरा, सातत्य, विश्वास व वातावरण आहे. आजही मॉरिशससारखे अनेक देश बॉलिवूडसाठी आपल्या देशात अक्षरश: पायघड्या घालतात आणि ५० टक्के चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात करण्याचा बॉलिवूड निर्मात्यांचा ट्रेंडही आहे म्हणून मुंबईतील बॉलिवूडला ना घरघर लागलीय ना उद्योग डबघाईला आलाय! त्यामुळे उत्तर प्रदेशात फिल्मसिटी अवतरली म्हणून मुंबईतील बॉलिवूड ओस पडेल, हा दावा हास्यास्पदच!

उलट बॉलिवूड निर्मात्यांना जर स्पर्धेतून एक चांगला व आर्थिकदृष्ट्या परवडणारा पर्याय उपलब्ध होत असेल तर काय वाईट? उलट अशा स्पर्धेतून बॉलिवूडची भरभराटच होईल व प्रचंड रोजगार देणारे हे क्षेत्र आणखी वेगाने वाटचाल करेल! त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचेच नव्हे तर देशाचेही हित आहेच! मुद्दा उरतो तो केवळ निखळ, निकोप स्पर्धेचा! नेमके इथेच आपले घोडे देश म्हणून पेंड खाते आणि त्याचा परिणाम जागतिक पातळीवर भोगावा लागतो. किमान आता तरी हे आपल्या लक्षात येईल, हीच माफक अपेक्षा !

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या