गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी उशिरा रात्री अटक केली. तब्बल १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात अनियमितता झाल्याचा ईडीचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहका-यांसोबत झालेल्या संबंधित व्यवहारात मनीलाँडरिंग झाल्याचा आरोप आहे. १ जुलै रोजी चौकशीसाठी राऊत ईडी अधिका-यांसमोर जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित झाले होते. त्या आधी त्यांना दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. २७ जुलैला तपास यंत्रणेने राऊत यांना चौकशीसाठी बोलावले होते. परंतु संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देऊन ते चौकशीला गैरहजर राहिले होते. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश ईडीच्या अधिका-यांनी राऊत यांना दिले होते. परंतु त्याबाबतची पूर्तता राऊत यांच्याकडून झाली नव्हती. रविवारी सकाळी सात वाजता ईडंीचे दहा अधिकारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांसह राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी चारच्या सुमारास ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत राऊत यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली.
रात्री साडेबाराच्या सुमारास ईडीने राऊत यांना अटक केली. ईडी कार्यालयाकडे जाताना राऊत यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ‘झुकेगा नही’, असे म्हणत अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा आणि शिवसेना न सोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. ईडीने राऊत यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ईडीने संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केली आहे. याच प्रकरणी त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. २००६ मध्ये जॉइंट व्हेंचर अंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली पण दहा वर्षांनंतरही पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ ६७२ रहिवाशांना वा-यावर सोडून म्हाडाच्या घरांनादेखील बिल्डरने चुना लावल्याचे दिसून आले. या बिल्डरने म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला होता. बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र सात त्रयस्थ विकासकांना विकल्याचा आरोप या बिल्डरवर होता. गुरू आशिष कन्सट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहेत. राकेश वाधवान सोबत प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने प्रवीण राऊतला अटक केली होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे स्नेही आहेत. प्रवीणला अटक झाली नंतर सुटकाही झाली. त्यानंतर २ फेब्रुवारी २०२२ ला त्याला पुन्हा अटक करण्यात आली. आता संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या संपत्तीवर टाच आली आहे.
याच घोटाळ्यातील पैसा संपत्ती घेण्यासाठी वापरण्यात आला, असा ईडीला संशय आहे. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये टाकण्यात आले होते. परंतु ते पैसे दहा वर्षांनंतर परत करण्यात आले. हे पैसे कर्जाच्या रूपात घेतले होते, असा दावा संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी केला होता. पण संजय राऊत यांचादेखील घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ बंगल्यातून साडे अकरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ईडीने माझ्या विरोधात खोटे पुरावे तयार करून कारस्थान रचून कारवाई केली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. माझा कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवले आहे. त्यामुळे मी शिवसेनेसाठी लढत राहीन, असेही राऊत म्हणाले. संजय राऊत यांचे बंधू शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्यासह कुटुुंबातील सदस्यांचीही चौकशी करण्यात आली. ईडीचे कारस्थान म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. लाज-लज्जा, शरम सोडून हे कारस्थान सुरू आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या ११ लाखांपैकी १० लाखांची रक्कम असलेल्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सुनील राऊत यांनी खुलासा करताना म्हटले आहे की, ईडीने जप्त केलेली रक्कम ही अयोध्या दौ-याशी संबंधित होती. ईडी अधिका-यांना पत्राचाळ संबंधी कोणतीही कागदपत्रे आणि पुरावे मिळालेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला. ईडीला काही मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. या मालमत्तेसंबंधी ईडीला माहिती नव्हती. त्यामुळे मालमत्ता बेनामी आहे की नाही हे तपासण्यासाठी ईडीच्या वतीने पीएमएलए कोर्टात १० दिवसांची कोठडी मागितली होती पण कोर्टाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे. संजय राऊत यांची नेमकी किती संपत्ती आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका माहितीनुसार बँकेत राऊतांच्या नावे ब-याच एफडी आहेत. शिवाय मुंबईसह अलिबागमध्येही त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे भूखंड, फ्लॅट असल्याची नोंद आहे. राज्यसभेच्या नामनिर्देशनाचा अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यानुसार त्यांच्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपयांची रोकड, बँकेत १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याची माहिती देण्यात आली होती.
याशिवाय आपल्या नावे २००४ मध्ये खरेदी केलेली वाहन असल्याचे त्यांनी सांगितले होते. राऊतांच्या नावे बँकेत ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रुपयांच्या एफडी आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार २०२०-२१ या आर्थिक वर्षात राऊतांची कमाई २७ लाख ९९ हजार १६१ रुपयांची तर पत्नीची कमाई २१ लाख ५८ हजार ७९० इतकी आहे. अलिबाग, पालघर, दादर आदी भागांत राऊतांनी त्यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आणि प्लॉट आहेत. एका दैनिकाच्या संपादकाची इतकी संपत्ती असू शकते का ? असा प्रश्न केला जात आहे. संजय राऊतांवर सुडबध्दीने कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पलटवार करताना म्हटले आहे की, ईडीने जी कारवाई केली आहे त्याला कायदेशीर तोंड द्या, उगीच राजकीय रंग देऊ नका. काँग्रेसच्या काळात लालू प्रसाद यादव तुरुंगात गेले होते. सुरेश कलमाडींची चौकशी झाली होती. अमित शहांना तुरुंगात पाठविले होते, मोदीजींची चौकशी झाली होती, तुम्ही निर्दोष असाल तर आपले निर्दोषत्व न्यायालयात सिध्द करा. संजय राऊत यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, अनेकांना तुरुंगात टाकण्याची धमकी देणा-या संजय राऊत यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे, सत्यमेव जयते ! राज्यपालांच्या व्यक्तव्यामुळे नाराज झालेला मराठी मतदार आणि त्याचा शिवसेनेला होणारा फायदा विचारात घेता तो मुद्दा अडगळीत टाकण्यासाठीच भाजपने संजय राऊत यांच्यावर ईडी कारवाईचे नाट्य तयार केल्याचे बोलले जात आहे.