24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसंपादकीयअखेर घंटा वाजली!

अखेर घंटा वाजली!

एकमत ऑनलाईन

मागील दीड वर्षापासून ओस पडलेल्या विद्यामंदिरांच्या वास्तू अखेर सोमवारी पुन्हा एकवार गजबजल्या! शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार व तज्ज्ञांमध्ये एवढी प्रचंड धास्ती होती की, त्यातून अनेकदा शाळा सुरू करण्याचे निर्णय झाल्यावर आणि तशी घोषणा झाल्यावरही ऐनवेळी निर्णय रद्द झाले. त्यामुळे राज्यातल्या शाळा खरोखरच सुरू होणार का? याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनांमध्ये प्रचंड संभ्रमाचेच वातावरण होते. मात्र, यावेळी अखेर शाळांची घंटा वाजली आणि पालक, विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. कोरोना संकटाने केलेल्या नुकसानीची वर्गवारी व आकडेवारी प्रचंड आहे. त्याचा ऊहापोह सातत्याने माध्यमांतून होतोच आहे. मात्र, कोरोनाने विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान केले आहे ते महाप्रचंड आहे. शिवाय ते शैक्षणिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक अशा विविध पातळीवरील असल्याने त्याची मोजदाद करणेही शक्य नाही की, झालेल्या या नुकसानीची भरपाई करता येणे शक्य नाही!

निव्वळ परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्याने व पुढच्या वर्गात ढकलल्याने सवंग लोकप्रियता व क्षणिक आनंद मिळू शकतो पण या काळात घरात कोंडल्या गेलेल्या मुलांचे झालेले शैक्षणिक, शारीरिक व मानसिक नुकसान त्याने कदापि भरून निघणार नाहीच! या काळात मुलांची सर्वांगीण वाढच पुरती खुंटली आहे. शिक्षण म्हणजे निव्वळ पाठ्यपुस्तकांची पोपटपंची नाही तर आकलन व ज्ञान या दोहोंच्या वृद्धीचे साधन आहे. परीक्षा न घेण्याचा सवंग निर्णय घेऊन काही काळासाठी टाळ्या भलेही घेता येतील पण त्यातून हे नुकसान भरून निघणार नाहीच! बंदिस्तपणा हा कुठल्याही वयोगटाच्या व्यक्तीचे मानसिक नुकसान करतच असतो. मागचे दीड वर्ष घरात कोंडली गेलेली मुले या मानसिक दुष्परिणामांची सर्वांत जास्त बळी ठरली आहेत. या मानसिक दुष्परिणामांमुळे त्यांच्या शरीर स्वास्थ्यावरही विपरीत परिणाम झाला आहे. याबाबतच्या विविध पाहण्यांचे अहवाल सध्या येतच आहेत. घरातच कोंडले गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणाची समस्या वाढीला लागली आहे.

चिडचिडेपणा, नैराश्य वाढीला लागून जीवनाविषयीचा दृष्टिकोन नकारात्मक होत चालला आहे. टाळेबंदीने अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर गेलेले दिसले व त्यावर मोठी चर्चाही झाली. उद्या कळकळीचे विशेष प्रयत्न झाले तर कदाचित त्यातील ब-याच विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणून हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करता येईलही! मात्र, या टाळेबंदीने सर्वच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर जो विपरीत परिणाम केला तो कसा भरून काढणार? दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षण हे केवळ गुणांच्याच टक्केवारीत मोजण्याची व मानण्याची मानसिकता एवढी खोलवर रुजली आहे की, त्यामुळे शिक्षणाच्या इतर सर्वांगीण परिणामांचा विचारही कुणाच्याच मनाला स्पर्शूनसुद्धा जात नाही. सरकारने तर त्यावर विचार करण्याची अपेक्षाच फोल! मात्र, पालक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही याबाबत कोरडेठाक व निर्विकार राहतात हेच मोठे दुर्दैव! यामुळेच मग आपली शिक्षणपद्धती ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारी व त्याला माणूस म्हणून घडविणारी असण्यापेक्षा कारकून घडविणारीच बनली आहे. राज्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ उठताबसता शिक्षणपद्धती विद्यार्थीकेंद्रित बनवण्याचा जप करतात खरा पण अशी पद्धती प्रत्यक्षात येईल तो देशासाठी सुदिनच ठरावा!

असो!! मुलांच्या आरोग्याबाबत असणारी पालकांची व सरकारची धास्ती अयोग्य ठरवता येणार नाही. मात्र, या धास्तीच्या बागुलबुव्याने जर विद्यार्थ्यांचे जीवनच उद्ध्वस्त होत असेल तर मग ही धास्ती कितपत योग्य? याचा विचार व्हायलाच हवा! अर्थात सरकारने असा काही विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजिबात वाटत नाहीच. कारण, एवढ्या प्रदीर्घ काळ शाळा बंद राहूनही त्या सुरू करताना पुन्हा त्या बंद कराव्या लागणार नाहीत याची कुठलीही ठोस उपाययोजना या काळात सरकारने केलेली नाहीच! म्हणजेच शाळा कुठवर सुरू राहणार? या प्रश्नाचे उत्तर रामभरोसेच! ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ही घोषणा धीर देणारी व आकर्षक वाटत असली तरी कोरोना अशा घोषणांना भीक घालत नाही, याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेलाच आहे. तो केवळ ठोस उपाययोजनांनीच रोखता येतो, हे सत्य आता शाळेत जाणा-या लहानग्यांनाही कळून चुकलेले आहे. अशावेळी सर्वज्ञानी सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना त्या पुन्हा बंद होणार नाहीत यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर सरकारकडून मिळत नाहीच! बहुधा आपली अशी काही जबाबदारी आहे, हेच सरकारच्या गावी नसावे! त्यामुळे जी काही जबाबदारी उचलायची ती शाळा व्यवस्थापनाने व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनीच, असेच सरकारला वाटते.

ही जबाबदारी उचलणे भाग आहे हे तर पालक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापनांना फार पूर्वीच कळून चुकले होते व त्यांनी ती जबाबदारी मनोमन स्वीकारलेली होतीच. मग सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यास एवढा विलंब का लावला? एवढे घोळ का घातले? हे प्रश्न अनुत्तरितच! सरकार ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाचा जो उदो उदो करत होते ते खरेच पर्यायी सक्षम व्यवस्था उभारण्यासाठी की, स्वत:चा बचाव करण्यासाठी? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीच! सरकार या प्रश्नाचे उत्तर देवो की न देवो पण कोरोना काळाने या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिलेलीच आहेत! असो!! कुठल्या का कारणाने असेना पण सरकारने अखेर शाळा उघडण्याचा निर्णय एकदाचा घेतला त्याबद्दल महाराष्ट्राने या सरकारचे ऋण व्यक्त करायलाच हवेत व आता सरकारला सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्याची संधी मिळणार नाही याची खबरदारीही घेतली पाहिजे व जबाबदारीही उचलली पाहिजे तरच राज्याच्या उद्ध्वस्त झालेल्या दोन शैक्षणिक पिढ्यांना आपल्याला सावरता येईल. त्यांचे आणखी होणारे नुकसान रोखता येईल. कारण आता कोरोनापेक्षाही त्याला रोखण्यासाठीचे ‘सरकारी उपचार’ महाभयंकर ठरतायत!

या उपचारांमुळे जे नवनवीन घातक विकार उत्पन्न केले आहेत ते सहन होण्याच्या पलिकडचे आहेत. त्यापेक्षा कोरोनाशी भिडणे, हा पर्याय कधीही योग्यच, हा गंभीर विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. ग्रामीण भागाने पर्यायच नाही म्हणून अगोदरच हा विचार स्वीकारलाही आहे आणि अवलंबिलाही आहे. आता शहरी भागानेही हा विचार ठाम करावा, तरच विद्यार्थ्यांचे कैकस्तरांवर होत असलेले प्रचंड नुकसान रोखता येईल, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या