22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसंपादकीयफ्लाईंग सिख

फ्लाईंग सिख

एकमत ऑनलाईन

जगभरातल्या अनेक धावणा-या स्पर्धा जिंकणा-या मिल्खा सिंगला मरणरेषा मात्र ओलांडता आली नाही. अ‍ॅथलिटपटू मिल्खा सिंगची ओळख नाही असे म्हणणारा एकही भारतीय सापडणार नाही. ‘उडता शीख’(फ्लाइंग सिख) असे टोपण नाव मिरवणारे मिल्खा सिंग जगभरात ख्यातनाम होते. कोरोनाच्या महामारीने त्यांची ‘रेस ऑफ लाइफ’ संपुष्टात आणली. महिनाभरापासून त्यांची कोरोनाशी झुंज सुरू होती. आयुष्यभर अनेक संकटावर मात करत धैर्याने, जिद्दीने पुढे वाटचाल करणा-या मिल्खा सिंग यांना आपण कोरोनावरही सहज मात करू असा विश्वास होता. म्हणूनच कोरोनाची लागण झाल्यानंतरही मी तीन-चार दिवसात बरा होईन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. कारण वयाच्या नव्वदीतही ते पूर्णत: फिट होते. दररोज व्यायाम आणि धावण्याचा सराव त्यांनी सोडला नव्हता.

स्वातंत्र्योत्तर काळात वा-याच्या वेगालाही लाजवेल अशा भन्नाट वेगाने धावणा-या मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी पाकिस्तानमधील गोविंदपूर या गावात एका गरीब शीख कुटुंबात झाला होता. परंतु १९४७ च्या फाळणीचा फटका त्यांच्या कुटुंबाला बसला होता. त्याच्या कटूस्मृती त्यांना आयुष्यभर छळत होत्या. फाळणीच्या दंगलीने १६ वर्षाच्या मिल्खाचे आई-वडिल, दोन बहिणी हिरावून नेल्या होत्या. त्यामुळे फाळणीचा कडवटपणा आयुष्यभर त्यांच्या मनात राहिला होता. परिस्थितीच्या या फटक्यातून सावरणे अतिशय कठीण होते. आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यानंतर मन उभारी ती काय घेणार? निर्वासित म्हणून ते भारतात दाखल झाले. अनाथ म्हणून दाखल झाल्यानंतर राहण्या-खाण्याचीही पंचाईत, त्या काळात बिनातिकीट प्रवास केल्याबद्दल त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली. अशा वेळी त्यांच्या विवाहित बहिणीने त्यांना आसरा दिला, जगण्याची उमेद दिली.

स्वत:चे दागिने मोडून बहिणीने मिल्खाची तुरुंगातून सुटका केली. ऐन तारुणावस्थेत आयुष्याची धुळधाण उडाल्यानंतर माणूस गुन्हेगारीकडे वळणे साहजिक होते परंतु लष्करात असलेल्या भावाने मिल्खाचे आयुष्य बदलवून टाकले. त्याने मिल्खाला लष्करात दाखल होण्यास प्रवृत्त केले. तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर चौथ्यांदा मिल्खाचा लष्कर प्रवेश यशस्वी झाला आणि त्यांची धावण्याची कला झळाळून निघाली. वेगवेगे धावत त्यांनी शर्यती जिंकण्याचा सपाटा लावला. छोट्याशा गावातून आलेल्या मुलाला धावण्याची शर्यत काय असते याची माहितीही नव्हती मग ऑलिम्पिकची माहिती तर दूरच. आयुष्यातील कटुता दूर सारून मिल्खा धावतच राहिला आणि या धावण्यानेच त्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली.धावत राहिल्यानेच त्यांना आयुष्यात यश, कीर्ती, मान-सन्मान मिळाला. कठोर मेहनत, जिद्द, परिश्रम, प्रशिक्षण यांच्या जोरावरच उत्तम खेळाडू घडू शकतो हे मिल्खा सिंग यांनी सा-या जगाला दाखवून दिले.

ऐन तारुण्यात मिल्खा अनेक कटू प्रसंगांना सामोरे गेले, फाळणीचे चटकेही सहजतेने बाजूला ठेवले, त्याच सहजतेने त्यांनी अपयशही पचवले, ऑलिम्पिकमधल्या अपयशाची सलही पचवली. त्यापासून आजच्या तरुणाईला खूप काही शिकण्यासारखे आहे. आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यानंतरसुद्धा जीवनात आनंदाची हिरवळ निर्माण करता येते हे थोड्याशा अपयशानंतर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणा-या आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवले पाहिजे. ध्येयाच्या दिशेने धावत राहिल्याने मिल्खाला जगण्याची नवी दिशा, दृष्टी मिळाली. मिल्खाला त्यांच्या उमेदीच्या काळात पाकिस्तानात धावण्याचे निमंत्रण मिळाले होते पण फाळणीच्या कटू स्मृती मनात असल्याने या स्पर्धेसाठी त्यांनी नकार दिला होता. परंतु तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आग्रहामुळे ते स्पर्धेत उतरले आणि स्पर्धा जिंकली. वा-याच्या वेगाने धावणा-या मिल्खाला त्यावेळचे पाकचे राष्ट्रपती अयूबखान यांनी ‘फ्लाईंग शीख’ ही उपाधी दिली होती.

मिल्खा सिंग यांनी १९५६ मेलबर्न, १९६० रोम आणि १९६४ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. १९६० च्या ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर्समध्ये त्यांचे कांस्यपदक अवघ्या ०.१ सेकंदाने हुकले होते. त्यावेळचा त्यांचा ४५.६ सेकंदचा राष्ट्रीय विक्रम ३८ वर्षे अबाधित राहिला होता. १९९८ मध्ये परमजीत सिंगने तो मोडला. आशियाई क्रीडा स्पर्धेत २०० आणि ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवणारे ते पहिले भारतीय. मिल्खा सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत एक, आशियाई क्रीडा स्पर्धेत चार तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. १९६२ मध्ये मिल्खा यांचा निर्मल कौर यांच्याशी विवाह झाला. निर्मल सुद्धा भारतीय महिला व्हॉलिबॉल संघाच्या कर्णधार होत्या. या दाम्पत्याला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. मुलगा जीव मिल्खा सिंग हा प्रसिद्ध गोल्फपटू आहे. मिल्खा सिंग यांचे चंदीगड येथे शुक्रवारी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. पाच दिवसापूर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल यांचेही कोरोनामुळेच निधन झाले होते.

मिल्खा सिंग यांची जीवनकथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. म्हणूनच की काय त्यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट निघाला आहे. मिल्खा यांच्या जाण्याने भारतीयांच्या मनात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची कामगिरी भविष्यातही अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल. तामिळनाडूची ‘पायल एक्सप्रेस’ पी.टी. उषा हे त्याचेच उदाहरण. मिल्खाचे धावणे अनेकांना ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी बळ देणारे ठरेल यात शंका नाही. क्रिकेटपटू विरेद्र सेहवाग म्हणतो तसे, मिल्खा यांचे फक्त शरीर आपल्याला सोडून गेले आहे. परंतु जेव्हा धैर्य, सामर्थ्याचा उल्लेख केला जाईल तेव्हा मिल्खा यांचे नावच सर्वप्रथम लक्षात येईल. उत्तम व्यक्तिमत्त्व आणि सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून मिल्खासिंग यांची आठवण सदैव कायम राहील. ‘कभी हार नही मानेंगे’ हा बाणा कायम प्रेरणास्रोत बनून राहील.

स्वबळावरून आघाडीत खडाखडी !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या