सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात शुक्रवारी सकाळी खासगी आराम बस आणि माल मोटार यांच्यात टक्कर होऊन त्यात १० प्रवासी ठार तर ३० जण जखमी झाले. अपघाताची भीषणता इतकी होती की, त्यात बसची एक बाजू पूर्णत: कापली गेली. तर माल मोटारीच्या दर्शनी भागाचा पूर्णत: चुराडा झाला. बसच्या अतिवेगामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रवास सुरू झाल्यापासून चालक वेगाने बस चालवीत होता. काही प्रवाशांनी त्याला वेग कमी करण्याची सूचनाही केली होती. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पहाटे सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना चालकाने पुन्हा बस भरधाव चालविल्याने हा अपघात झाला.
रस्त्यांवरील खड्डयांमुळे मृत्यूचा सापळा ठरलेल्या यवतमाळ-अमरावती मार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावर मसलगा येथे मलेशियन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सोळ नदीवर भारतातील पहिला पूल बांधण्यात आला. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. या पुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला सुमारे ५०० फुटांपर्यंत रस्ता अर्धवट सोडण्यात आला आहे. रस्ता अर्धवट असल्याचे लक्षात येत नसल्याने अचानकपणे वाहने उजव्या बाजूला घ्यावी लागतात, त्यामुळे उजव्या बाजूने आलेल्या वाहनांवर धडकून अपघात होतात तसेच रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन समोरच्या खड्डयात पडून अपघात होतो. औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर टाका पाटी येथे तीन वर्षांत झालेल्या विविध अपघातांत १५ जणांचे बळी गेले.
त्याची दखल महामार्ग प्राधिकरण घेत नाही , अशी नागरिकांची तक्रार आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे., असे सांगितले जाते. महामार्गावर वाहनांची गती रोखण्यासाठी रबलर स्ट्रीप, लाईट इंडिकेटर, टाका गावाकडे जाणा-या सर्व्हिस रोडची रुंदी वाढवावी लागणार आहे. अपघात होऊ नये आणि अपघातात प्राणहानी होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्ष रहायला हवे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काम रखडले आहे. काही ठिकाणी मावेजा देण्यात आला नसल्याने शेतक-यांनी विरोध केला आहे. वाहनांमुळेच अपघात होतात असे नाही. ब-याच वेळा रस्ता ओलांडणा-या पादचा-यांमुळेही अपघात होतात, नुकतेच रस्ता अपघातात आमदार बच्चू कडू जखमी झाले. अमरावती शहरातील कठोरा मार्गावरील जकात नाका परिसरात रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना धउक दिली. त्यामुळे बच्चू कडू हे दुभाजकावर आदळले. त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामुहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे लागणार आहे.
त्या दृष्टीने परिवहन विभागातर्फे राज्य रस्ते सुरक्षा अभियानाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. १७ जानेवारीपर्यंत रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना शिस्त लागावी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे हे उद्दिष्ट आहे, केवळ दंडाची वसुली करणे हे शासनाचे उद्दिष्ट नाही. खरे तर मुलांना शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविले गेले पाहिजेत. पोलिसांच्या भीतीपेक्षा स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. शहरांमध्ये सिग्नल थांब्यावर वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसते. दिवसेंदिवस रस्ते अपघातांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. रस्ते अपघातांविषयी आपण रोज वाचतो, ऐकतो. हे अपघात रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी वाहतूक नियम जाणून घ्यायला हवेत. रस्तासुरक्षा समजून घेताना सुरक्षा म्हणजे धोक्याची जाणीव होणे. वेगाने वाहन चालविल्यामुळे अपघात होतात. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालविणे केव्हाही चांगले. नियम पाळले तर अपघात होतील कसे? नियमामधला ‘नि’ बाजूला ठेवला तर समोर ‘यम’ उभा राहतो. म्हणून वाहनचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
अपघातांमध्ये वर्षाकाठी सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू आणि चार लाख जखमी होता म्हणे! ताशी १८ जणांचा जीव जातो म्हणे. म्हणजे एकाने चूक करायची नि अनेकांनी शिक्षा भोगायची! युद्धापेक्षाही अपघातात अनेकांचे जीव जातात. मृत्यूमध्ये १८ ते ४५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. भारत हा तर तरुणांचा देश आहे. तरुणच जीव गमावू लागले तर देशाचे भविष्य काय? दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराबाबत आणि चार चाकी वाहनचालकांना सीटबेल्टच्या वापराबाबत कितीही मार्गर्शन केले तरी त्याबाबत बेफिकीरपणा दाखविण्यातच पुरुषार्थ मानला जातो ही वस्तुस्थिती आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये ही साधी गोष्टही लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे अपघातांना आयते निमंत्रण मिळते. सरकारी यंत्रणा सुरक्षिततेसाठी जनजागृतीच्या मोहिमा हाती घेत असते परंतु रस्त्यांवरील अपघातांमध्ये वरचेवर वाढच होत चाललेली दिसून येते. अपघातामध्ये जीव गमावणे अथवा अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागे बेफिकीर वृत्तीने वेगाशी स्पर्धा करण्याची नशा हेच प्रमुख कारण आहे.
सर्वांत पुढे जाण्याच्या शर्यतीत आपण वेगाच्या स्पर्धेचे सारे नियम धाब्यावर बसवीत आहोत याचेभान राहात नाही. रस्त्यावर जागोजागी धोक्याचा इशारा देणारे फलक लावलेले असतात परंतु त्याकडे दुर्लक्षच केले जाते. सुरक्षिततेसाठी जनजागृतीचे सप्ताह आयोजित केले जातात. असे सप्ताह म्हणजे सोहळे नसतात. ते साजरे करावयाचे नसतात तर ते पाळावयाचे असतात. किमान अशा मोहिमांच्या काळात तरी अपघात टाळण्यासाठी जास्तीत जास्त सावधगिरी आणि सुरक्षिततेचे सारे नियम पाळते जावेत ही अपेक्षा असते. सुसंस्कृत समाजाकडून किमान एवढी अपेक्षा बाळगण्यात गैर खचितच नाही. आज ‘माझी सुरक्षितता ही माझीच जबाबदारी’ हे भान बाळगण्याची शिस्त प्रत्येकाने अंगी बाणविण्याची गरज आहे. ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ ही वृत्ती बाणविल्यास जगाचा निरोप घेण्याशिवाय गत्यंतर नाही. हे टाळायचे असेल तर स्वत:स सुरक्षित ठेवण्याचे मार्ग स्वत:च शोधले पाहिजेत.