22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसंपादकीयस्वातंत्र्य हवे तर स्वैराचार नको!

स्वातंत्र्य हवे तर स्वैराचार नको!

एकमत ऑनलाईन

दुस-या प्रदीर्घ टाळेबंदीतून सोमवारपासून महाराष्ट्र राज्याने मुक्ततेचा श्वास घेतला आहे. अर्थात हा पूर्ण मुक्ततेचा श्वास नाही तर सध्या ही अंशत: मुक्तता आहे आणि पूर्ण मुक्ततेचा प्रवास पाच टप्प्यांत व हळूहळू होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. शिवाय पूर्ण मुक्ततेचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी सरकारने जी नियमावली जाहीर केलीय त्यासाठी मानांकनाचा शास्त्रीय आधार असल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ‘मुक्ततेची वाट तुमच्याच हाती व ती तुमचीच जबाबदारी’, असा इशाराच सरकारने जनतेला दिला आहे. सरकारने जबाबदारी जनतेवर लोटणे योग्य की अयोग्य? हा वादाचा विषय ठरू शकतो. त्यात न पडता सरकारने टाळेबंदीच्या उपचारापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आणि जबाबदारीतून स्वत:ची मुक्तता करून घेत ती जनतेवर सोपवली हे एका अर्थी बरेच झाले!

यातून जनतेने कोरोना प्रतिबंधाबाबत सरकारकडून बाळगलेल्या अवाजवी अपेक्षा संपून जनता वास्तवात येईल, भानावर येईल आणि आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण जबाबदारीने वागले पाहिजेच, त्याला पर्याय नाही, याचे स्पष्ट भान जनतेला येईल! सरकारने स्वत:ची जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून टाळेबंदी लादायची आणि आमच्या स्वातंत्र्यावर टाच येते म्हणत जनतेने त्याला छेद द्यायचा, हा मागच्या दीड वर्षापासून सुरू असलेला निरर्थक खेळ आता तरी थांबेल, ही आशा! सरकारने टाळेबंदी उठवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर व त्यासाठी ठरवलेल्या निकषांवर भाष्य करण्यापूर्वी सरकारने टाळेबंदीच्या रोगापेक्षा भयंकर ठरलेल्या उपचारापासून फारकत घेण्याची मानसिक तयारी केली त्याबद्दल प्रथम सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन! कोरोनाच्या दोन लाटांनी राज्यात मोठी जीवितहानी केली व अनेक कुटुंबांत होत्याचे नव्हते झाले हे मान्यच!

त्याची रात्रंदिवस चर्चा मागच्या दीड वर्षापासून देशात सुरू आहे. आताशा तर या चर्चेने ‘नकोसा भडिमार’ असे रूप घेतले आहे व बहुतांश लोक ती सोसवत नसल्याचे उघडपणे बोलून दाखवत आहेत. मात्र, कोरोनावरचा उपचार म्हणून सरकारकडून होत असलेल्या टाळेबंदीचे विपरीत परिणाम हे कोरोनातून बचावलेल्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त करणारे आहेत. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक अशा सर्व पातळ्यांवर टाळेबंदीच्या उपचाराने प्रचंड खोलवर आघात केले आहेत. शिवाय परिस्थितीबाबत काहीच शाश्वती राहिलेली नसल्याने लोकांच्या मनात अस्थिरतेचे भय व नैराश्य दाटले आहे. याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जगण्यावर व जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरच झाला आहे. ही मानसिक अवस्था इतर झालेल्या सर्व नुकसानीपेक्षाही भयंकर कारण या अवस्थेने माणसाचा स्वत:वरचा आत्मविश्वासच डळमळीत होऊन जातो व नैराश्य त्याला ग्रासते. सरकारने टाळेबंदी उठवताना जरी या स्वातंत्र्याची जबाबदारी जनतेवर टाकली असली तरी मी माझी जबाबदारी पार पाडली तर सरकारी टाळेबंदीचा उपचार माझ्यावर आघात करणार नाही, याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण होईल, हे ही नसे थोडके!

मुळात कोरोनाच्या आजवरच्या स्थितीचे अवलोकन केले तर हे संकट हाताळण्याचा अंतिम निष्कर्ष हाच निघतो की, जनतेने आपल्या जबाबदारीचे भान योग्य पद्धतीने बाळगले तर आपण कोरोनाचे संकट थोपवूही शकतो व परतवूही शकतो! त्यासाठी रोगापेक्षा भयंकर ठरणा-या सरकारी उपायांची गरजच नाही. थोडक्यात कोरोनाविरुद्धचा लढा हा कुणाही एकट्या-दुकट्याचा नाही व कुणी एकटा-दुकटा ती जबाबदारीही पेलू शकत नाहीच तर हा लढा सामूहिक जबाबदारीचा व संकल्पाचा आहे. या निष्कर्षाप्रत पोहोचायला व तो मान्य करायला सरकारला व यंत्रणेला दीड वर्षापेक्षा जास्त काळ लागला, हे सत्यच पण किमान आता तरी सरकारने हे अप्रत्यक्षरीत्या का होईना मान्य केले, हे ही नसे थोडके! तेव्हा ‘देर आये दुरुस्त आये’ हे समाधान मानून झालेले नुकसान मागे टाकत आता ते भरून काढण्यासाठी दुप्पट जोमाने तयार व्हायला हवे!

त्यात नक्कीच यश मिळू शकते फक्त आपण सर्वांनी ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार’ ही आपली झालेली गल्लत दूर करायला हवी. कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. ‘स्वातंत्र्य हवे तर जबाबदारीचे भान हवे. जबाबदारीशिवाय स्वातंत्र्य टिकवता येत नाही व टिकतही नाही,’ या जुन्याच धड्याची नव्याने उजळणी करायचे भान आणून दिले आहे. हे भान आपण प्रत्येकाने मनाशी पक्के केले तर टाळेबंदीतून मुक्ततेचे लक्ष्य नक्कीच प्राप्त होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यामुळे सरकारने टाळेबंदीतून मुक्ततेसाठी जी नियमावली ठरवली आहे, जी मानांकने निश्चित केली आहेत, जे नियम ठरवले आहेत त्यात असंख्य त्रुटी, संशयकल्लोळ व संभ्रम असले तरी जनतेने ठरवले तर जनतेची टाळेबंदीतून मुक्तता होईल, सरकार किंवा यंत्रणा त्यात पाय घालणार नाही, हा निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचा!

त्यावरच जनतेने आता संपूर्ण लक्ष केंद्रित करायला हवे. त्यातून टाळेबंदीतून मुक्ततेचा मार्ग तर प्रशस्त होणारच आहे पण हे जबाबदारीचे भान आपल्याला तिस-या, चौथ्या अशा अनेक कोरोना लाटांच्या भयापासून व प्रकोपापासून वाचविणार आहे. याच्या परिणामी महाभयंकर ठरलेल्या टाळेबंदीच्या सरकारी उपचाराची सामान्यांच्या डोक्यावरची सध्या कायमची ठरलेली टांगती तलवारही आपण आपल्या हातांनी कायमची दूर करू शकतो. सरकारने आपल्या नियमावलीतून तेच ध्वनित केले आहे. ते आता महाराष्ट्रातील जनतेने पक्के ध्यानात घ्यायला हवे. महाराष्ट्राने आजवर कायम देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. कोरोना संकटातही जबाबदारीचे भान राखत स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयोग महाराष्ट्रातील जनतेने यशस्वी करून दाखवला तर देशातील इतर राज्यांतील जनतेलाही स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठीची दिशा प्राप्त होईल व ते ही आपापल्या राज्य सरकारांना योग्य मार्गावर आणू शकतील.

राज्य सरकारे योग्य मार्गावर आली तर केंद्र सरकारही योग्य मार्गावर यायला व कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी टाळेबंदीचा उपचार सोडून वेगवान लसीकरण, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण या उपायांवर विचार सुरू व्हायला हरकत राहणार नाही, ही आशा! शेवटी जग आशेवरच चाललंय. कोरोना संकटाने निराशेचे मळभ गडद केलेत. आपण सर्वांनी एकत्रितरीत्या हे मळभ दूर करण्याची आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडायला हवी! आपले स्वातंत्र्य कायम राखण्याचा, टाळेबंदीतून मुक्ततेचा व कोरोना युद्धात विजय प्राप्त करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर स्वातंत्र्यासाठी जबाबदारीचे भान, हेच प्रत्येकाने मनाशी पक्के केले पाहिजे, हे निश्चित!

देशी खा, ‘इम्युनिटी’ वाढवा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या