26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसंपादकीयशिक्षणाचा ‘घो’!

शिक्षणाचा ‘घो’!

एकमत ऑनलाईन

आपल्या देशातील शिक्षण पद्धती कारकून तयार करणारी व आता तर बेरोजगारांच्या फौजा निर्माण करणारी आहे, अशी तक्रार शिक्षण क्षेत्रात काही बदल घडवू इच्छिणा-या, प्रयोग करू इच्छिणा-यांकडून वारंवार होते. विशेष म्हणजे वेळोवेळी होणा-या सरकार पातळीवरील पाहण्या, सर्वेक्षण, अभ्यास अहवालातूनही या तक्रारीची सत्यता दर्शविणारी आकडेवारीही येत असते. अशी आकडेवारी आली की प्रसार माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या येतात, त्यावर जोरदार चर्चा झडतात, चिंता व्यक्त केली जाते. मात्र, त्यावर पुढे काही ठोस उपाययोजना होताना व झाल्याच तर त्याची गंभीर अंमलबजावणी होताना खचितच दिसते. विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना व देशाला विश्वगुरू बनविण्याच्या आरोळ्या ठोकल्या जात असताना दुसरीकडे देशातील प्रत्येक मुलाला किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळावे यासाठी देश झगडतो आहे, हेच वास्तव चित्र पहायला मिळते.

अशा स्थितीत शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल, काळानुरूप आवश्यक असणारे प्रयोग आणि शिक्षण विद्यार्थ्यांसाठी परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनविण्याचे साधन होणे, ते रटाळ वा कंटाळवाणे न होता आनंददायी बनविणे या व अशा अनेक बाबी आपल्या देशात अवतरणे म्हणजे दिवास्वप्नच ठरते! जग झपाट्याने बदलत असताना व सध्याच्या शिक्षणातून निर्माण होणारे रोजगार वा नोक-या तेवढ्याच झपाट्याने नामशेष होत असतानाही आपण अद्याप पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीतील मूलभूत समस्यांशीच झगडत आहोत, हे देशातील शैक्षणिक चित्र या क्षेत्राबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचे, गांभीर्याचे आणि इच्छाशक्तीच्या अभावाचे विषण्ण वास्तव दर्शविणारेच आहे. याचाच पुरावा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) ताजा अहवाल व त्यातून बाहेर आलेली आकडेवारी! देशातील सुमारे ९८ हजार शाळा, ३.७६ लाख शिक्षक आणि १९.५० लाख विद्यार्थी यांची पाहणी करून या अहवालात निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. देशातील तिसरीतील विद्यार्थ्यांची वाचन व गणन क्षमता तपासणे हा या सर्वेक्षणाचा हेतू होता. महाराष्ट्रात ५७८ शाळा, १०९१ शिक्षक आणि ५३०८ विद्यार्थ्यांची पाहणी या सर्वेक्षणांतर्गत करण्यात आली. अक्षरांचे व शब्दांचे वाचन, ऐकलेल्या बाबींचे आकलन, अंकाची ओळख, मोठा-लहान अंक ओळखणे, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार करता येणे, घड्याळाचे वाचन, दिनदर्शिकेचे वाचन याबाबतची चाचणी या पाहणीत घेण्यात आली. राज्यातील मराठी माध्यमाच्या १७ टक्के व इंग्रजी माध्यमाच्या १५ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचा निष्कर्ष या पाहणीतून प्राप्त झाला.

बेरीज व वजाबाकी करता येऊ शकणा-यांचे प्रमाण अनुक्रमे ५५ व ३५ टक्के आहे. याचाच अर्थ गणित विषय मुलांना अवघड वाटतो व आकलन न झाल्याने विद्यार्थी बेरीज किंवा वजाबाकी करताना गडबडतात. विशेष म्हणजे सरकारी शाळांबरोबरच खाजगी शाळांमध्येही ही पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे उगाच खाजगी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा फु गा फुगविण्याचा जो जोरदार ट्रेंड सध्या राज्यात आणि देशातही आहे, त्याचे नेमके वास्तव पालकांच्याही लक्षात यावे. सर्वच भाषांमधील माध्यमांच्या शाळांचा या पाहणीत समावेश करण्यात आला होता हे विशेष! त्यामुळे या पाहणीची आकडेवारी ही देशातील सर्वंकष शैक्षणिक स्थितीचे वास्तव दर्शन घडविणारीच आहे. असे अहवाल आले की त्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दुर्दशेसाठी शाळा व शिक्षकांवर खापर फोडण्याचा ट्रेंडही आपल्याकडे रूढ झाला आहे. दुर्दैवाने त्यामुळे शैक्षणिक सुविधांच्या सज्जतेचा व उपलब्धतेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मात्र अत्यंत चातुर्याने अडगळीत सारला जातो कारण हा मुद्दा राज्यकर्त्यांसाठी (मग ते कुठल्याही राजकीय पक्षांचे असोत) अडचणीचा असतो.

शिक्षणासारख्या कळीच्या क्षेत्राच्या उत्थानाच्या गरजेवर सर्वच पक्षांची नेतेमंडळी तारस्वरात लांबलचक भाषणे झोडत असतात पण प्रत्यक्षात या उत्थानासाठी स्वत: भिडण्याची तीव्र इच्छाशक्ती अपवादानेच दाखवितात हेच वास्तव! अमुक शिक्षणमहर्षी नेत्याने शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत नेली वगैरे गौरव ठीक आणि अशा नेत्यांच्या शिक्षणसंस्थेचा झालेला विस्तार व अर्थार्जनाचा प्रसार हे ही ठीक. मात्र, या प्रचार-प्रसार-विस्तारातील शिक्षणाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत मिठाची गुळणी का? त्यावर आपल्या देशात चर्चाच होणार नसेल तर मग हा प्रचार-प्रसार-विस्तार हा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असाच प्रकार ठरत नाही का? यातून फक्त शिक्षण क्षेत्राचे व्यावसायीकरण म्हणजेच धंदा झाल्याचे सध्या पहायला मिळते. त्यातूनच सध्या गावोगावी खाजगी शिकवण्यांचा समांतर बाजार ‘फु लो फलो दुधो नहाओ’ असा गडगंज झालेला पाहायला मिळतो आहे. मोठमोठ्या जाहिरातींचा सदोदित मारा,

बक्षीस योजना वगैरेचे जोडीला दिले जाणारे आमिष हा शिक्षणाची गुणवत्ता वा दर्जा सुधारण्यासाठीचा सध्याच्या विद्यमान शिक्षण सुधारकांचा क्रांतिवादी लढा आहे का? मात्र, सध्या अशा जाहिरात तंत्राचीच चलती आहे आणि त्यालाच स्वत:ला सुशिक्षित व जागरूक म्हणवून घेणारे पालक डोळे झाकून फसतात हे दुर्दैव! त्यामुळे शिक्षणाचा धंदा झालाय, बाजार झालाय अशी तक्रार करताना हा बाजार थाटणा-यांबरोबरच या बाजाराच्या झगमगाटालाच वास्तव मानून तेथे तोबा गर्दी करणारे ग्राहक, म्हणजे पालक व विद्यार्थी तेवढेच कारणीभूत आहेत. असो. हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. तूर्त मुद्दा हाच की, सध्या उज्ज्वल यशाचा डंका पिटणा-या जाहिरातींचा महापूर आलेला असतानाच राज्यातील शिक्षणाची वास्तव स्थिती दाखविणारा सरकारी अहवाल आला आहे. त्यातील आकडेवारी सगळ्यांच्याच डोळ्यांमध्ये झणझणीत अंजन घालणारी आहे. अर्थात ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांच्यासाठी ती डोळे चुरचुरवणारी आहे मात्र ज्यांनी झापडं लावून आपले डोळे बंद करून घेतले आहेत त्यांच्यावर या अंजनाचा काय परिणाम होणार हा प्रश्नच! असो!! सरकारी पातळीवर अशा पाहण्या, सर्वेक्षणे होतात, अहवाल येतात, आकडेवारीही मिळते. मात्र, त्यावरून सुधारणांचे जे उपाय पुढे करायचे असतात ते कुठे लुप्त होतात? हे ही आपल्या देशातील आजवरचे रहस्यच आहे.

कदाचित काय सुधारणा करायला हव्यात याचेच सरकारी पातळीवर आकलन होत नसावे. त्यालाही फारशी हरकत घेण्याचे कारण नाही पण सरकार आपल्या क्षमता व मर्यादा मान्य करून तज्ज्ञांच्या किंवा या क्षेत्रात सुधारणांचे यशस्वी प्रयोग करून दाखविणा-यांची मदत घेण्याचा मदतीचा मार्ग का स्वीकारत नाही, हे दुसरे न सुटणारे कोडे आहे. हा प्रकार म्हणजे स्वत:ला काही कळत नाही म्हणून जगाला मूर्ख ठरवण्याचाच! तो आपल्याकडे सर्रास पावलोपावली पहायला मिळतो. शैक्षणिक सुधारणा हा आपल्याकडे त्यामुळेच कौतुकाचा विषय न ठरता टिंगलीचा विषय ठरतो. शिक्षणाबाबतच्या आपल्या या झापडबंद पारंपरिक विचारांनीच शिक्षणाचा पुरता घोटाळा करून टाकलाय! प्रश्न हाच की, आणखी किती पिढ्या बर्बाद केल्यावर आपल्याला हा घोटाळा कळणार आहे? तो जोवर कळणार नाही तोवर असे अहवाल ‘पालथ्या घागरीवर पाणीच’ हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या