29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसंपादकीयनौटंकी, मजबुरी की उपरती?

नौटंकी, मजबुरी की उपरती?

एकमत ऑनलाईन

भारतद्वेष याच गुणसूत्रीय आधारावर जन्माला आलेल्या पाकिस्तान नामक भारताच्या सर्वांत खोडसाळ, इरसाल, कपटी, विश्वासघातकी, कुरापतखोर वगैरे वगैरे विशेषणांनी सर्वगुणसंपन्न शेजा-याचे सध्याचे बदललेले रंग हे एकीकडे आश्चर्याचा जबरदस्त धक्का देणारे तर दुसरीकडे ‘हा कोणता नवा डाव?’ या शंकेने पोटात गोळा आणणारे आहेत. खरे तर पाकिस्तानसारख्या शेजारी राष्ट्राने भारतासोबतचे आपले हाडवैर बाजूला सारून संवादाची, सहकार्याची तयारी दर्शवित नरमाईचे धोरण स्वीकारल्यावर भारतात त्यावर आनंदाचे चित्कार उमटायला हवे होते व पाकचे नाक कसे दाबले या दाव्यांसह श्रेयवादाची अहमिका रंगायला हवी होती.

मात्र, असे काही घडत नाही, ना जनतेकडून, ना राजकीय नेत्यांकडून! कारण पाकिस्तानवर विश्वास ठेवणे म्हणजे मगरीच्या पाठीवर बसणे आहे, हे एव्हाना संपूर्ण भारताला पुरते कळून चुकले आहे! जन्मापासूनच पाकिस्तानची भारताबाबत जी वर्तणूक आहे व या देशाचे भारताबाबत जे धोरण आहे त्याचा इतका अगाध अनुभव भारताने घेतला आहे की, पाकिस्तानवर विश्वास ठेवणे म्हणजे आपण ठार वेडे झाल्याचेच लक्षण आहे, हे सर्वांनाच पुरते कळून चुकलेले आहे. त्यामुळे साहजिकच पाकिस्तानने नरमाईचा सूर लावला असला तरी भारतात त्यावर आनंदाचे चित्कार उमटण्याऐवजी शंका-कुशंकांचेच स्वर व्यक्त होत आहेत आणि त्यात काहीही चूक नाहीच!

एकीकडे चर्चेची, संवादाची नौटंकी करायची आणि त्याचवेळी अतिरेक्यांना हाताशी धरून पाक लष्कराने भारतात घातपाती कारवाया, हिंसाचार व मानवी संहार घडवून आणायचा ही पाकची नेहमीची कार्यपद्धती केवळ भारतालाच नव्हे तर जगाला तोंडपाठ झालेली आहे. त्यामुळे मागच्या महिन्याच्या अखेरीस दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीची घोषणा झाल्यावर त्यावर फारसे गांभीर्याने कोणीही लक्ष दिले नव्हते. या चर्चेत दोन देशांदरम्यान २००३ साली शस्त्रसंधीच्या वेळी निश्चित करण्यात आलेली स्थिती पुनर्स्थापित करण्याचे ठरले होते. अर्थातच त्यावर कोणी हुरळून जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भारताने या चर्चेचे सावधपणे स्वागत करणे अटळ होते व तसेच ते झालेही!

मात्र, त्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी एका चर्चासत्रातील भाषणात जे वक्तव्य केले ते अनपेक्षित धक्का देणारेच ठरले. भारतद्वेष कायम राहील किंवा वाढता राहील याचाच सातत्याने प्रयत्न करत त्या आगीवर आपल्या पोळ्या भाजत देशाची यथेच्छ लूट करायची व देशावर स्वत:चा ताबा, नियंत्रण कायम ठेवायचे हीच पाकिस्तानी लष्कराची आजवरची ठरलेली कार्यपद्धती आहे. त्यात समजा एखाद्या लोकनियुक्त सरकारने खोडा घालण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला तर असे सरकारच पदच्युत करून पाकिस्तानचे लष्करशहा देश आपल्या ताब्यात घेतात, हाच आजवरचा इतिहास आहे. पाकिस्तानी जनतेलाही तो पुरता अंगवळणी पडलाय.

‘डेमीगॉड’ रजनीकांत

त्यामुळे जनतेने निवडलेले सरकार कोणते का असेना किंवा पंतप्रधान कोणी का असेना तो पाक लष्करशहाच्या हातातील कळसूत्री बाहुलीच असतो व लष्करशहा हाच देशाचा खरा मालक असतो हे पाकिस्तानात पुरते पक्के झालेले समीकरण आहे. त्यामुळे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना हवे ते बोलायला लावणे सहज शक्य असताना स्वत: लष्करप्रमुखांनी ‘भूतकाळाला मूठमाती दिली पाहिजे’ , असे वक्तव्य करणे, हा भारतासह जगासाठी अनपेक्षित धक्का तर आहेच पण जनरल बाजवा असे का बोलतायत? हा प्रश्न निर्माण करणारेच होते. बाजवा एवढे बोलून थांबले नाहीत तर त्यापुढे जाऊन त्यांनी तत्त्वचिंतनही केले. ‘दोन देशांतील सततच्या कलहाने दक्षिण आशियात चिरंतन गरिबी निर्माण झाली आहे. दक्षिण आशिया व मध्य आशियात व्यापाराचा मार्ग खुला झाल्यास ती समृद्धीची नांदी ठरेल, ही नांदी आपण सततच्या संघर्षाच्या दावणीला बांधू शकत नाही,’ हे जनरल बाजवा यांचे तत्त्वचिंतन!

बाजवा यांच्या या वक्तव्यात शंभर टक्के सत्यता आहेच. भारताच्या सीमा शांत राहिल्या व सर्व शेजारी राष्ट्रांशी भारताचे मैत्रीपूर्ण सहकार्याचे संबंध प्रस्थापित झाले तर भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याकडे सुरू असलेली वाटचाल कैकपटींनी वेग धरेल. भारत आर्थिक महासत्ता बनल्यास साहजिकच शेजारी राष्ट्रांना व आशिया खंडाला त्याचा लाभ मिळेल व सर्वच देशांच्या विकासाला चालना मिळेल कारण भारताने आजवर कधीच चीनप्रमाणे विखारी साम्राज्यवादाचे धोरण अवलंबिले तर नाहीच पण तसा विचारही केलेला नाही. हे उघड असणारे सत्य पाकिस्तानला व विशेषत: पाकिस्तानी लष्करप्रमुखांना पटले असेल आणि ते त्याची जाहीर कबुलीच देत असतील तर मग ते वक्तव्य गांभीर्याने घेतले जाणे साहजिकच.

मात्र त्याचबरोबर आजवरचा इतिहास व अनुभव गाठीशी असल्याने त्याबाबत प्रश्न, शंका व कुशंकाही निर्माण होणे अपरिहार्यच! सध्या हेच घडले आहे. बाजवा यांचे हे वक्तव्य म्हणजे पाकची नौटंकी, मजबुरी की उपरती? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. जो तो आपापल्या परीने व दृष्टिकोनाने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. कोरोनाने जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडल्या आहेत. त्यात अगोदरच चीनच्या दयेवर जगणा-या पाकच्या अर्थव्यवस्थेचा तर पुरता बट्ट्याबोळ झालाय व पाकिस्तान अक्षरश: कंगाल झालाय! चीनशी मैत्रीने जगातले इतर सर्वच प्रमुख देश पाकिस्तानपासून दूर झाले आहेत. त्यात मुस्लिम राष्ट्रांचाही समावेश आहे. त्यात ३९ देशांच्या आर्थिक कार्यगटाने पाकिस्तानला ‘करड्या यादीत’ ठेवून कारवाईची टांगती तलवार पाकच्या डोक्यावर ठेवली आहे. उद्या पाक ‘लाल यादीत’गेला तर तो पुरता उद्ध्वस्त होईल.

चीन प्रत्येक मदत मोबदल्याशिवाय करतच नाही, हे पाक जनता अनुभवते आहेच. त्यामुळे पाक जनतेत चीनबाबत वाढता रोष आहे व त्याचा कधीही स्फोट होईल, अशी स्थिती आहे. अशावेळी पाकला व पाकच्या नेतृत्वाला स्वत:ला कोंडीतून सोडविण्यासाठी ही उपरती होणे व तत्त्वचिंतनाचा उमाळा येणे साहजिकच! मात्र, त्याला आता प्रामाणिक कृतीची जोड मिळाली नाही तर ही उपरती केवळ मजबुरीतील नौटंकीच ठरेल आणि त्याला कोणीही फसणार नाहीच. पाक नेतृत्वालाही कदाचित याची जाणीव झाली असावी म्हणूनच पाकिस्तान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या शुभेच्छा पत्राला इम्रान खान यांनी सप्रेम पोचपावती देताना कृतीची जोड दिली. पाकिस्तानच्या आर्थिक परिषदेने बुधवारी भारतातून सूत, साखर व कापसाच्या आयातीवरची बंदी उठवली. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

मात्र मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव नाकारत आपले ‘वाकडे शेपूट’ दाखवून दिले. ते यथावकाश नळीत घालून सरळ केले जाईलच, हे अलहिदा! शिवाय जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याबद्दलचा भारताविरुद्धचा पाकचा शिमगाही नजिकच्या काळात शमलेला दिसतो आहे. पाकिस्तान हा मुद्दा सोडणार नाही, हे सत्यच पण तूर्त प्रत्येक बाबीत प्रमुख अट म्हणून या मुद्याचा समावेश करण्याचा दुराग्रह पाकने थंडबस्त्यात टाकला असल्याचे दिसते आहे. हे सुचिन्ह आहे हे खरे पण एवढ्यावर सर्वकाही आलबेल होण्याची शक्यता नाहीच. पाकिस्तानला खरेच उपरती झाली असेल तर अगोदर आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ पाकला समूळ नष्ट करावे लागतील.

देशात दडलेल्या व आश्रयाला असलेल्या अतिरेक्यांना शिक्षा द्यावी लागेल. पाकने हे प्रामाणिकपणे केले तरच पाकला उपरती झाल्याचा विश्वास भारतासह जगाला प्राप्त होईल. अन्यथा पाकची सध्याची उपरती ही मजबुरीतून आलेली नौटंकीच ठरेल. त्याला भारताने फसण्याचे व भुलण्याचे काहीच कारण नाही. पाकला फुकाचा दुराग्रह हवा की आर्थिक शहाणपण? हे ठरवावेच लागेल. त्यांच्या पर्याय निवडीवरूनच त्यांचे सध्याचे वर्तन उपरती, मजबुरी की, नौटंकी हे ठरेल, एवढे मात्र निश्चित!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या