23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसंपादकीयदे धक्का...कुणाकुणाला?

दे धक्का…कुणाकुणाला?

एकमत ऑनलाईन

राज्यातील राजकीय नाट्याचा तिसरा अंक उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने व महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने पूर्ण झाल्यावर तेथून पुढे ठरल्याप्रमाणे घडेल अशी अटकळ बांधून असलेल्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना, राजकीय विश्लेषकांना, निरीक्षकांना आणि या नाट्याचे प्रेक्षक असणा-या सर्वसामान्यांना केंद्रातील भाजपश्रेष्ठींनी आपल्या आवडत्या धक्कातंत्राचा वापर करत जोरदार धक्के दिले. धक्क्यांची ही मालिका एवढी जबरदस्त की पहिल्या धक्क्यावर प्रतिक्रिया येण्यापूर्वीच त्यापेक्षा दुसरा मोठा धक्का असेच काहीसे घडले. या धक्कातंत्राने एवढे जबरदस्त धक्के दिले की, दे धक्का… कुणाकुणाला? हे शोधणा-यांची मतीच गुंग होऊन गेली. या धक्क्यांचा अन्वयार्थ शोधण्यासाठी आता राजकीय निरीक्षकांना, विश्लेषकांना व ज्यांनी थेट धक्के सोसले त्यांनाही बराच काळ चिंतन-मनन करावे लागेल, असेच दिसते.

एकंदर जिथे पहिल्या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स घडला त्या बिंदूपासून लगेच नव्या नाट्याची पटकथा केंद्रातील भाजपश्रेष्ठींनी सुरू केली आहे आणि या नव्या नाट्याचा क्लायमॅक्स काय? अशी नवी उत्सुकता सर्वांच्याच मनात निर्माण केलीय. अर्थात पटकथा जसजशी पुढे सरकेल त्यावरच क्लायमॅक्सबाबतचे अंदाज बांधले जातील. त्यासाठीचा जो काळ लागणार आहे तो देणे व प्रतीक्षा करणे एवढेच सध्या प्रेक्षकांच्या हाती! असो!! तूर्त राज्यातील राजकीय नाट्य संपुष्टात येत असतानाच क्लायमॅक्सच्या वेळी बसलेल्या धक्क्यांचे विश्लेषण करावे लागेल. पहिला धक्का होता तो अत्यंत अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करण्याचा! पाठोपाठ फडणवीस यांनी आपण नव्या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी असणार नाही, असे जाहीर करत दुसरा धक्का दिला. भाजपच्या या मास्टरस्ट्रोकवर चर्चेचे वादळ उठलेले असतानाच ते किंचितसेही कमी होण्याची वाट न पाहता भाजपश्रेष्ठींनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होण्याचे व जबाबदारी पार पाडण्याचे थेट निर्देश जाहीरपणे देत ‘महामास्टरस्ट्रोक’ मारत तिसरा धक्का दिला.

त्यामुळे महाराष्ट्राला स्वत:च्या तोंडून दोन जबरदस्त धक्के देणारे देवेंद्र फडणवीस यांचीच बोलती श्रेष्ठींनी दिलेल्या तिस-या धक्क्याने बंद झाली आणि भाजपश्रेष्ठींच्या मनात महाराष्ट्राबाबत नेमकी पटकथा आहे तरी काय? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. थोडक्यात या धक्क्यांमधून सावरल्यानंतरच या नव्या नाट्यात सहभागी जुनीच पात्रं आपापल्या भूमिका वठवत पटकथा पुढे सरकवतील खरी पण ताजा अनुभव पाहता त्यांना या नव्या नाट्याचा क्लायमॅक्स कळेल का? ही शंकाच! असो!! भाजपने जो पहिला व दुसरा धक्का महाराष्ट्राला दिला त्याचे काही ठोकताळे नक्कीच सांगता येतात. मुख्यमंत्रिपदावरून भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रिपदावर स्वत: विराजमान झालेल्या व आपल्या सुपुत्राला पहिल्या आमदारकीच्या टर्ममध्येच थेट कॅबिनेट मंत्री करत त्यालाच आपला उत्तराधिकारी ठरविणा-या उद्धव ठाकरे यांना भाजपकडून देण्यात आलेला चेकमेट म्हणजे एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून घोषणा! हा चेकमेट उद्धव ठाकरेंचे प्रतिमाहनन, शिवसैनिकांमध्ये बंडखोरांविरुद्धचा रोष कमी करणे, सेनेकडून भाजपवर होणा-या सत्तालोलुपतेच्या जहरी टीकेला उत्तर एवढ्यापुरता मर्यादित नाहीच तर तो प्रचंड ताकदवान प्रादेशिक संघटन म्हणून ओळखल्या जाणा-या शिवसेनेच्या वारसा हक्काने ठाकरेंकडेच राहिलेल्या नेतृत्वाला दिले गेलेले आव्हान आहे.

सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा ख-या अर्थाने त्यांच्या पुत्राने नव्हे तर भाजपनेच पूर्ण केली व तीही स्वेच्छेने, मजबुरी म्हणून नाही, असाच संदेश या भाजपच्या खेळीतून सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचविला गेला. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यापेक्षाही उद्धव ठाकरेंसाठी भाजपची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याची खेळी जास्त जिव्हारी लागणारी आहे. त्याचे प्रत्यंतर उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी त्वरेने पत्रकार परिषद घेऊन हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, हे जाहीर करण्यातून आलेच. याचाच अर्थ भाजपचा बाण मर्मावर लागला आहे. एकनाथ शिंदेंनाच पुढे करून भाजप शिवसेनेचा काट्याने काटा काढण्याचा पूर्ण प्रयत्न करणार व संपूर्ण देशात हिंदुत्वाच्या मुद्यावर मोठी भागीदारी सांगणारा एकमेव पक्ष असलेल्या शिवसेनेत उभी-आडवी फूट पाडून त्यावर स्वत:चा कब्जा करणार! या घडीला तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपच्या या खेळीला उत्तर नाहीच कारण खरी शिवसेना कुणाची? असा वेदनादायक ठरलेला व ठरणारा प्रश्न भाजपने शिंदेंना हाताशी धरून ठाकरेंसमोर उभा केला आहे. या प्रश्नाचे आपल्याला हवे तेच उत्तर मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

त्यात ते कितपत यशस्वी होतात, हे येणारा काळच सांगेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे कारण स्वत: बंडखोरांनीच हिंदुत्वाच्या मुद्यावरून आघाडी सरकारमध्ये राहायला नको, अशीच भूमिका लावून धरली आहे आणि घडामोडींच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाचे हित व हिंदुत्व यापेक्षा महाविकास आघाडी प्रिय असल्याचा आरोप लावला आहे. हे आरोप खोडून काढण्यासाठी ठाकरेंना आक्रमक हिंदुत्व दाखवावे लागेल. त्यांनी तसे केल्यास सध्याची महाविकास आघाडी तर संपुष्टात येईलच पण भविष्यात पुन्हा असा प्रयोग होऊ शकणार नाही. भाजपचा मूळ हेतू तोच कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी घडविलेला महाविकास आघाडीचा प्रयोग भाजपच्या जिव्हारीच लागलेला नाही तर देशपातळीवर असा प्रयोग यशस्वी ठरणे भाजपसाठी मोठी डोकेदुखी असेल. भाजपने शिवसेनेला टार्गेट करत महाविकास आघाडीचा प्रयोग तर मोडित काढलाच आहे पण हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत भविष्यात पुन्हा असा प्रयोग होणार नाही अशी स्थिती निर्माण करत शरद पवार यांनाही शह दिला आहे. सेना हिंदुत्वावर जेवढी आक्रमक होईल तेवढी काँग्रेस अस्वस्थ होईल. काँग्रेसने सेनेची साथ सोडली तर राष्ट्रवादीला नाइलाजाने काँग्रेससोबतच जाणे भाग पडेल आणि महाविकास आघाडीचा प्रयोग इतिहासजमा होईल.

राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या मोसमात ही बाब भाजपसाठी लाभदायक ठरणार, हेच निवडणुकीचे गणित! तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेवरचे वर्चस्व! सेनेचा जीव राज्याच्या सत्तेपेक्षाही मुंबई महापालिकेत जास्त अडकला आहे. मागच्या निवडणुकीत भाजप-सेनेत काट्याची लढत होऊन सेनेने हा सामना कसाबसा जिंकला होता. यावेळी मुंबई मनपावरील सेनेचे वर्चस्व संपविण्याची ‘हीच ती वेळ’ असे भाजपला वाटते. त्याकामी शिंदेंच्या बंडखोरीने सेनेत पडणारी फूट व भाजपला मनसेची मिळत असलेली साथ यामुळे मुंबई मनपा सेनेकडून हिसकावून घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणे शक्य होईल, हाच भाजपचा कयास व प्रयत्न आहे. भाजपच्या सेनेचे खच्चीकरण करण्याच्या या दीर्घ रणनीतीतील प्रमुख सोंगटी ही एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आहेत आणि म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री करून भाजपने त्यांना आपल्या बुद्धिबळातील वजीर बनवले आहे. आता दुस-या धक्क्याविषयी. खरं तर हा धक्काच नाही कारण मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणे अप्रतिष्ठेचेच. त्यामुळे त्यांनी बाहेर राहण्याचा निर्णय करणे योग्यच होते.

खरा धक्का पक्षश्रेष्ठींनी त्यांना हा निर्णय फिरवून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे निर्देश देण्याचा आहे. शिंदेंना मुख्यमंत्री करून ठाकरेंना धक्का देण्याची रणनीती एकटे फडणवीस भाजपात नक्कीच ठरवू शकत नाहीत. त्याला पक्षश्रेष्ठींची मान्यता असणारच. त्याचवेळी फडणवीस सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होणे ओघाने आलेच. मग श्रेष्ठींनी हा निर्णय अचानक व तो ही जाहीरपणे बदलून फडणवीसांची गोची करण्याचा अर्थ काय? पक्षश्रेष्ठींच्या या कृतीचे दोन ढोबळ अर्थ हेच की, फडणवीसांचे पंख कापून त्यांना पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही याची जाणीव करून देणे किंवा भाजपअंतर्गत सर्व अलबेल नसणे! तिसरी शक्यता भाजपने फडणवीसांसाठी वेगळी योजना आखल्याची पण ती धूसरच कारण तसे असते तर फडणवीस यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला असता. पक्षशिस्तीचा बडगा तो ही जाहीरपणे उगारला गेला नसताच कारण देवेंद्र हे भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत. तरीही हा धक्का का? हेच खरे रहस्य आहे आणि म्हणूनच हा धक्का गुरुवारच्या धक्क्यांच्या मालिकेतील ‘महाधक्का’ आहे, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या