21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसंपादकीयभाजपला ‘दे धक्का’!

भाजपला ‘दे धक्का’!

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रात शिवसेनेत फोडाफोडी करून भाजपने नवे सरकार अस्तित्वात आणले. मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. अखेर ‘जैसी करनी वैसी भरनी’ या न्यायाने भाजपला बिहारमध्ये दे धक्का मिळाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राज्यपाल फग्गनसिंह कुलस्ते यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यात आता राजद काँग्रेसला सोबत घेऊन जदयू महागठबंधन सरकार स्थापन करणार आहे. नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रीय जनता दलाच्या साथीने नव्याने बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा भाजपला फार मोठा धक्का मानला जात आहे. बिहारमध्ये भाजप आणि जदयू युतीचे सरकार होते. मात्र, दोन्ही पक्षांत धुसफू स सुरू होती. त्यामुळे नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला.

आता युती तुटल्यानंतर बिहारमध्ये जदयू आणि लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्या सहकार्याने नवीन सरकार स्थापन करीत आहे. राज्यातील नव्या सरकारमध्ये जदयूचा मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री राजदचा आहे. राजदचे नेतृत्व लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा असेल. काँग्रेसचा एक उपमुख्यमंत्रीदेखील असण्याची शक्यता वर्तवली जात होती. भाजपबरोबरची युती तोडण्याआधी नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. नितीश कुमारांनी गत अनेक दिवसांपासून भाजपपासून अंतर राखले होते. महिनाभरापूर्वी त्यांनी सुमारे ५० मिनिटांहून अधिक काळ जनगणनेच्या मुद्यावर तेजस्वी यादवांशी चर्चा केली होती. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार यांच्याबाबतचा सूर बदलला.

जदयू आणि राजद मिळून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करणार हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप यांच्यातील संबंध तुटण्याएवढे ताणले गेल्याने राज्यात राजकीय वादळ घोंघावत होते. नितीश कुमार यांनी माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. बिहारमध्ये एनडीएचा मित्र असल्याने भाजपने केंद्र सरकारमध्ये जदयूला मंत्रिपद देताना आरसीपी सिंह यांना केंद्रीय मंत्री केले होते. मात्र सिंह यांचा राज्यसभेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुन्हा जदयूकडून वरिष्ठ सभागृहात पाठवण्यात आले नाही. याच कारणामुळे सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अलीकडे नितीशकुमार नाराज असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. तीन आठवड्यांत चार वेळा ते केंद्राच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. दिल्लीत रविवारी झालेल्या निती आयोगाच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली होती. कोरोनातून बरे होत असल्याने दिल्लीचा प्रवास त्यांनी टाळला असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले होते. गत तीन आठवड्यांत केंद्र सरकारच्या चार महत्त्वाच्या कार्यक्रमांना नितीशकुमार गैरहजर राहिले होते. नितीशकुमार यांचा संयुक्त दल व भाजप या मित्रपक्षांदरम्यान संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

राष्ट्रीय ध्वजाबाबत १७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. त्यालाही नितीशकुमार यांची उपस्थिती नव्हती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीला तसेच २५ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीलाही ते गैरहजर होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पाटणा येथे ३०-३१ जुलै रोजी समविचारी पक्ष संघटनांच्या बैठकीत जी वक्तव्ये केली त्यावर नितीशकुमार नाराज असल्याचे संयुक्त जनता दलाच्या सूत्रांनी म्हटले होते. अर्थात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी भाजप २०२४ ची लोकसभा निवडणूक तसेच २०२५ ची बिहार विधानसभा निवडणूक जनता दलाशी आघाडी करूनच लढेल असे जाहीर केले आहे. भाजप अध्यक्ष नड्डा यांनी प्रादेशिक पक्षासह विरोधी पक्ष नामशेष होईल आणि फक्त भाजपच एकमेव पक्ष राहील असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते वक्तव्य नितीश कुमार यांच्या जिव्हारी लागले असावे. दुसरे म्हणजे जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरून नितीशकुमार यांचे भाजपशी मतभेद आहेत. जनगणना करणे इष्ट ठरणार नाही असे भाजपचे मत आहे तर नितीश कुमार यांनी जनगणना झाली पाहिजे असे जाहीर केले आहे. भाजपचे दुस-या फळीतील नेतेसुद्धा प्रक्षोभक भाषा वापरत असल्याची नितीश यांची भावना बनली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्यातूनही नव्या राजकीय आघाडीचे संकेत मिळाले होते.

दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या बैठका बोलावल्या जाणे, ही राजकीय परिस्थिती सर्वसाधारण नाही असे सूचक विधान तिवारी यांनी केले होते. नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडणार असतील तर आमचा पक्ष त्यांना भाजपच्या विरोधात लढण्यासाठी मदत करेल असेही तिवारी म्हणाले होते. तेजस्वी यादव यांनीही मंगळवारी राजदच्या आमदारांची बैठक बोलावली होती. अखेर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांना राजीनामा सादर करण्यासाठी ते निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर तेजस्वी यादवही होते. त्याआधी नितीश कुमार यांनी राबडीदेवींशी चर्चा केली होती. जातनिहाय जनगणना, लोकसंख्या नियंत्रण, अग्निपथ योजना आदी मुद्यांवरून भाजप आणि जदयू यांच्यात मतभेद होतेच पण जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांना बळ देऊन भाजप पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय नितीशकुमार यांना होता. त्यामुळे सावध झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपशी फारकत घेतल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते रविशंकरप्रसाद म्हणाले, गत निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिल्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकवार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले मात्र आता त्यांनी भाजपची साथ सोडली खरी पण बिहारचे मतदार त्यांना माफ करणार नाहीत. भाजपने आधी चिराग पासवान आणि नंतर आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून जदयूला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याने एनडीएतून बाहेर पडण्याची भूमिका नितीश कुमार यांनी घेतली असावी.

गत नऊ वर्षांत नितीश कुमार यांनी दुस-यांदा भाजपची साथ सोडली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अनेक नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कदाचित या नेत्यांना धक्कातंत्र ही आपलीच मक्तेदारी आहे असे वाटत असावे! आता नितीश कुमार हे सात पक्षांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणार आहेत. सात पक्षांची ही मिसळ बिहारी जनतेला कितपत आवडते याचे उत्तर आगामी काळच देईल. मजेशीर योगायोग असा की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार संकटात होते तेव्हा राज्यपाल कोश्यारी कोरोनाने आजारी होते परंतु शिवसेनेचा बंडखोर गट आणि भाजपचे मेतकूट जमले तेव्हा राज्यपाल खडखडीत बरे झाले. नितीश कुमारांना कोरोना झाला. तसे त्यांनी घोषित केले आणि दुस-याच दिवशी निगेटिव्हही झाले. कारण भाजपला धक्का द्यायचा होता! बिहारमध्ये नवे सरकार अडीच दिवसांत तयार झाले असे नाही तर त्याबाबतची प्रक्रिया अडीच महिन्यांपासून सुरू होती असे सांगितले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या