23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home संपादकीय शुभ संकेत!

शुभ संकेत!

एकमत ऑनलाईन

२०२० देशासाठीच नव्हे तर अवघ्या जगासाठी व मानवजातीसाठी अत्यंत वेदनादायक व दहशतीचेच वर्ष ठरले. कोरोना विषाणूने मानवजातीचा थरकाप उडवून दिला. संपूर्ण वर्ष कोरोनाच्या सावटाखाली व जीव मुठीत घेऊनच गेले. त्यामुळे जगाचे कैक अंगाने प्रचंड नुकसानही झाले. उपचारच ज्ञात नसणा-या या रोगापासून बचावासाठी जगाने टाळेबंदीचा मार्ग स्वीकारला. या मार्गाने कोरोनाला रोखण्यात कितपत यश आले याबाबत उलटसुलट दावे होत राहिले. मात्र, ते वैज्ञानिक निकषांवर आधारित नव्हे तर राजकीय अंगावर आधारितच होते. यथावकाश वैज्ञानिक निकषांवर टाळेबंदीच्या उपयुक्ततेबाबत माहिती येईलच आणि अशी माहितीच सत्याचे प्रमाण असेल. तोवर नेहमीप्रमाणे आपल्या सोयीने टाळेबंदीवर दावे-प्रतिदावे होत राहतीलच पण त्याला फारसे महत्त्व व अर्थ असण्याचे कारण नाहीच! असो!! मात्र, टाळेबंदीच्या बचावात्मक मार्गालाच उपचार समजून अत्यंत आकलनशून्यतेने या मार्गाचा जो अघोरी वापर देशात करण्यात आला त्याने देशाच्या अर्थकारणाची पुरती वाट लावली याबाबत मात्र दुमत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याची आकडेवारीही जाहीर झालेली असल्याने हे नुकसान सप्रमाण सिद्ध झालेले आहे व ते इच्छा असो की नसो पण सर्वांना मान्य करण्याशिवाय पर्यायच नाही.

टाळेबंदीमुळे देश जवळपास सहा महिने ठप्प होता. साहजिकच औद्योगिक व आर्थिक चक्रच ठप्प झाले होते. त्यातून जसा लाखो-करोडो लोकांचा रोजगार हिरावला गेला तसेच हजारो-लाखो उद्योगधंदे, व्यवसायांचे आर्थिक नुकसानीमुळे कंबरडेच मोडले. या नुकसानीतून सावरूच न शकणारे अनेक उद्योग, व्यवसाय कायमचे बंद झाले आहेत. तर ज्यांची नुकसानीतून सावरण्याची क्षमता आहे ते आपली पूर्ण शक्ती पणाला लावून सावरण्याची व पूर्वस्थितीवर येण्याची धडपड करतायत. या धडपडीतूनच २०२१ साल उजाडताना शुभ संकेत आपल्यासोबत घेऊन आले आहे. अर्थात हे शुभ संकेत आहेत, निष्कर्र्ष नव्हे, याचे भान ठेवायलाच हवे अन्यथा त्यातून होणारी फसगत अटळ आहेच! २०२१ च्या शुभारंभी जसे कोरोनावर लस प्राप्त झाल्याचे शुभ वर्तमान मिळाले तसेच या विषाणूने कोमात घातलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत धुगधुगी आल्याचे व तिची प्रकृती सुधारत असल्याचे शुभ वर्तमानही आले आहे, ही देशासाठी आणि देशातील जनतेसाठी दिलासादायक बाब! त्यामुळे या दोन्ही शुभ वर्तमानांचे मनापासून स्वागत करायलाच हवे.

देशातील अर्थकारणाच्या प्रकृतीची स्थिती दर्शविणारी चाचणी म्हणजे वस्तू व सेवा करापोटी प्राप्त होणा-या महसुलाची आकडेवारी! टाळेबंदी ब-यापैकी शिथिल झाल्यावर त्याचा परिणाम जीएसटी संकलनात दिसायला लागला होताच व तो तसा दिसणे साहजिकच! त्यातूनच डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलनाचा आकडा हा एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा व आजवरचा विक्रमी आकडा ठरला. देशासाठी हे शुभ संकेतच तर सरकारसाठी ही बाब हर्षोल्हासाचीच! सरकारी पातळीवरून हा हर्षाेल्हास सध्या चढाओढीने व्यक्तही होतोय. त्याला आक्षेप असण्याचे कारणही नाही. मात्र, जर हर्षोल्हासात पुढील वाटचालीचे भानच सुटणार असेल तर तो धोका टाळण्यासाठी या शुभ संकेताचे योग्य व वास्तविक आकलन होणे आवश्यक ठरते. अन्यथा योग्य उपाययोजनांच्या अभावी रुळावर येऊ घातलेली अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावरून घसरण्यास वेळ लागणार नाही! डिसेंबरमध्ये झालेले करसंकलन नक्कीच शुभ संकेत आहेत पण ते निष्कर्षच भासवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची आत्ममग्नता फसवी आणि धोकादायक, याचे भान सरकार नामक यंत्रणेला ठेवावेच लागेल.

अमेरिका भारतीय नौदलाला देणार शक्तिशाली बंदुका

जीएसटीच्या विक्रमी संकलनामागे विविध कारणे असू शकतात व ती तत्कालीन असतात. त्यामुळे त्यावरून थेट निष्कर्षावरच येणे व ‘झाले आता सर्व काही सुरळीत झाले’, असा प्रचारकी दावा करणे चूकच! कारण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठीच आपल्याला आणखी खूप मोठी मजल मारावी लागणार आहे. तिला उभारी आल्याचे चित्र व त्याचा आनंद तर कोसो दूर आहे. कोरोनाचे लसीकरण हे जसे प्रचंड मोठे आव्हान आहे व जसे ते पेलण्यासाठी देशाला मोठा कालावधी लागणार आहे तसेच किंबहुना त्याहूनही कठीण आव्हान हे कोरोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे केलेले महाप्रचंड नुकसान भरून काढत तिला पूर्वपदावर आणण्याचे, उभारी देण्याचे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर आल्याचा दावा करायचा तर त्याचा निकष हा ज्यावेळी अर्थव्यवस्था उभारीत होती त्या काळातील आकडेवारीशी सध्याच्या स्थितीची तुलना करणे हाच आहे. याचाच अर्थ असा की, सध्याच्या आकडेवारीची तुलना कोरोनापूर्व काळाशी करून आनंद व्यक्त करण्यात अर्थ नाही तर या आकडेवारीची तुलना अर्थव्यवस्था उभारीत असलेल्या म्हणजे एप्रिल २०१७ च्या कालावधीतील आकडेवारीशी व्हायला हवी.

कारण कोरोनापूर्व काळातही देशाची अर्थव्यवस्था घसरणीवरच होती. आपल्याला अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून काढून तिला उभारीत आणायचे असेल तर त्याचे उद्दिष्ट २०१७ च्या उभारीच्या काळातील आकडेवारीशी तुलना करूनच निश्चित करावे लागेल. यादृष्टीने तपासून पाहिले तर डिसेंबरमधील जीएसटीचे १ लाख १५ हजार कोटी रुपयांचे महसूल संकलन ही स्वागतार्ह बाब ठरते. मात्र, त्यावर समाधान मानून उद्दिष्ट साध्य झाल्याचा आनंद व्यक्त करता येणार नाहीच. जीएसटी संकलनात सप्टेंबर महिन्यापासून होत असलेली वाढ ही टाळेबंदी शिथिल झाल्याने जशी आहे तशीच हा देशातला सणासुदीचा काळ असल्यानेही आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. तसेच देशात यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने कृषी क्षेत्राला उभारी आली आहे व ग्र्रामीण अर्थव्यवस्थेत तेजी आलेली आहे. तसेच जवळपास सहा महिने घरातच कोंडून पडल्याने वैतागलेल्या ग्राहकांनी सणासुदीच्या निमित्ताने खरेदीची ऊर्मी दाखवत स्वातंत्र्य पुन्हा अनुभवण्याचा मार्ग शोधला, हे ही एक कारण यामागे आहेच.

यापेक्षाही एक प्रमुख कारण म्हणजे आयात मालावरील जीएसटीत झालेली या कालावधीतील वाढ! ही वाढ तब्बल २७ टक्के आहे. डिसेंबर २०१९ मध्ये आयात मालावरील जीएसटी २१,२९५ कोटी होता. डिसेंबर २०२० मध्ये तो २७,०५० कोटी रुपये इतका नोंदविला गेला. शिवाय सरकारकडून जीएसटी वसुलीसाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व करबुडव्यांना बजावल्या जाणा-या नोटिसांची संबंधितांना निर्माण झालेली धास्ती याचाही महसूल संकलनावर सकारात्मक परिणाम होतो आहेच. अशा सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे डिसेंबर महिन्यात झालेले विक्रमी करसंकलन! हे स्वागतार्हच पण हीच स्थिती सदोदित कायम राहील, असा निष्कर्ष काढून अर्थव्यवस्थेच्या सुधारणांच्या उपायांकडे दुर्लक्ष करणे चूकच! उलट सरकारने या शुभ संकेतातून प्रेरणा घेऊन आपले अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न अधिक व्यापक व गतिमान करायला हवेत. त्यादृष्टीने देशाचा आगामी अर्थसंकल्प ख-या अर्थाने ऐतिहासिक ठरायला हवा. तरच अर्थमंत्र्यांची अभूतपूर्व अर्थसंकल्पाची घोषणा प्र्रत्यक्षातही सत्यात उतरेल. सरकारने केलेल्या मोठ्या घोषणा व प्रयत्नांचे दृश्य परिणाम अद्याप तरी अर्थव्यवस्थेवर दिसलेलेच नाहीत. एकीकडे कंपन्यांची नफ्याची आकडेवारी वाढताना दिसते मात्र त्या तुलनेत रोजगार वाढतच नाहीत. हे सत्य लक्षात घेत सरकारने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तर ख-या अर्थाने अर्थव्यवस्थेची वाढ सुरू होईल. भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी यायची असेल तर ग्राहकांची मागणी वाढायला हवी कारण हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. सरकारी पातळीवर अद्याप त्याबाबत प्रयत्न झालेले नाहीत, हेच वास्तव आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या