Saturday, September 23, 2023

शुभ संकेत!

भारताने श्रीलंकेत कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामन्यात यजमान संघाचा दारुण पराभव करून आशिया चषक जिंकला आणि पाच वर्षांपासून चालत आलेला जेतेपदाचा दुष्काळ संपविला. पुढील महिन्यात भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आशिया चषक विजेतेपद भारतासाठी शुभसंकेत ठरू शकतो. हे जेतेपद म्हणजे एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या दृष्टीने रंगीत तालीमच ठरू शकेल. विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने भारताची जय्यत तयारी झाली आहे. मात्र अजूनही चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार हे कोडे सुटलेले नाही.

तिस-या क्रमांकावर कोहली आणि पाचव्या क्रमांकावर के. एल. राहुल खेळणार हे निश्चित झाले आहे. प्रश्न आहे तो चौथ्या क्रमांकाचा. या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळणार की सूर्यकुमार यादव की इशान किशन ते अजून निश्चित नाही. श्रेयस अय्यरचा दुखापतीचा तिढा कायम आहे. सूर्यकुमारवर टी-२० ची छाप पडली आहे. त्याला अनेक वेळा संधी देऊनही ५० षटकांच्या क्रिकेटशी जुळवून घेता आलेले नाही. त्यामुळे त्याच्यावर विसंबून राहता येत नाही. इशान किशनची मानसिकता सलामीत खेळण्याची आहे. त्यामुळे ती चौथ्या क्रमांकाला मजबूती देऊ शकेल असे वाटत नाही. जसप्रीत बुमराच्या पुनरागमनामुळे आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताचा गोलंदाजी विभाग भक्कम बनला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराला अनेक महिने विश्रांती घ्यावी लागली परंतु संघात परतल्यानंतर त्याच्या गोलंदाजीतील भेदकता कायम आहे, फलंदाजांचे होश उडवणारी आहे हे दिसून आले. त्यामुळे चिंता नाही. मात्र भारतीय संघाला क्षेत्ररक्षणात अजून सुधारणा दाखवावी लागली.

कर्णधार रोहित शर्माला फिटनेस सतावत होता, त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर जाणवत होता. परंतु अलीकडे त्याचा फिटनेस सुधारल्याने तो आत्मविश्वासाने नेतृत्व करताना दिसला. त्याला युक्तीच्या चार गोष्टी सांगताना विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल दिसले. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत एकसंधतेने खेळताना दिसेल यात शंका नाही. उरला तो प्रश्न दुखापतींचा. ही समस्या सा-याच संघांसमोर आहे. शिवाय दुखापती या खेळाचाच एक भाग आहे, त्यावर तुम्हाला उपाय शोधावेच लागतील. अखेर ‘क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स’ हेच खरे. तुम्हाला घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांच्या अपेक्षापूर्तीच्या प्रचंड दबावाखाली खेळावे लागणार आहे. हा दबाव सहन करीत तुम्ही तुमची कामगिरी कशी फुलविणार यावर यश अवलंबून राहील. त्यामुळे विश्वचषक कोण जिंकणार ही चर्चा निरर्थक ठरते. जो संघ चांगला खेळेल तोच जिंकेल हे विविध प्रश्नांचे सोपे उत्तर आहे. असो. भारतीय संघाने गत काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरी त्यांना जेतेपदाने सतत हुलकावणी दिलेली आहे. एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मोठी स्पर्धा जिंकण्यात भारत अपयशी ठरला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ चा आशिया चषक जिंकला होता. त्यानंतर २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०२२ मध्ये टी-२० विश्वचषकाची उपान्त्य फेरी पार करण्यात भारतीय संघाला अपयश आले होते. त्यानंतर २०२१ आणि २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत भारताचा दारुण पराभव झाला होता. म्हणजे गत पाच वर्षांत भारतीय संघाला एकही स्पर्धा जिंकता आली नव्हती. त्यामुळे श्रीलंकेतील यंदाची आशिया चषक स्पर्धा जिंकून जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याची नामी संधी होती. ही संधी भारतीय संघाने साधली. खरे तर यंदाची स्पर्धा पावसानेच गाजविली, असे म्हणावे लागेल. कारण श्रीलंकेतील बहुतेक सामन्यांत स्पर्धा पाहण्यासाठी पावसाने हजेरी लावली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. साखळीतील पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर नेपाळ संघाला पराभूत करून भारताने ‘सुपर फोर’ फेरी गाठली. या फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला.

पाकविरुद्धच्या सामन्यात कोहली आणि राहुलने शतके ठोकून भारतीय संघाला साडेतीनशे पार नेले. दुखापतीनंतर राहुलचे शतकी पुनरागमन ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. कोहलीने ४७ वे एकदिवसीय शतक ठोकून सचिनचा ४९ शतकांचा विक्रम टप्प्यात आणला. कुलदीपचे पाच बळी ही उत्साहवर्धक बाब होत.ी. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताचे सारे गडी फिरकीसमोर नतमस्तक झाले ही चिंतेची बाब ठरली. श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत यजमान संघाला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर पराभूत करणे भारतीय संघाला जड जाईल असे वाटले होते परंतु घडले भलतेच! अंतिम सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि पुन्हा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा ४० मिनिटे उशिरा खेळ सुरू झाला आणि अघटित गोष्टी घडण्यास प्रारंभ झाला. बुमराने पहिल्याच षटकांत कुसल परेराला भोपळा दिला. दुस-या बाजूने मोहम्मद सिराजने निर्धाव षटक टाकले. तिस-या षटकांत बुमराने एक धाव दिली. चौथ्या षटकांत सिराजने क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ कसा आहे ते दाखवून दिले. पहिल्याच चेंडूवर त्याने निसांकाला रवींद्र जडेजाकडे झेल देणे भाग पाडले, तिस-या चेंडूवर समीर विक्रमाला पायचित पकडले. चौथ्या चेंडूवर असलंकाला बाद केले. आता सिराज हॅटट्रीकवर होता परंतु धनंजय डिसिल्वाने ती होऊ दिली नाही.

हा चेंडू त्याने मिडविकेटला वळविला आणि तो पकडण्यासाठी स्वत: गोलंदाज सिराज सीमा रेषेपर्यंत धावला परंतु तो चौकार रोखू शकला नाही. असे दृश्य क्रिकेटमध्ये सहसा दिसत नाही परंतु सिराजची जिद्द मात्र दिसली. अखेरच्या चेंडूवर त्याने धनंजयला तंबूचा रस्ता दाखविला. एक षटकात चार बळी! सिराजसाठी हे षटक स्वप्नवत ठरले. सिराजने २१ धावांत ६ बळी घेतल्याने अवघ्या १५.२ षटकांत श्रीलंकेचा ५० धावांत खुर्दा उडाला. हार्दिक पांड्यानेही ३ धावांत ३ बळी घेत सिराजला सुरेख साथ दिली. ५ बाद १२ अशा स्थितीतून श्रीलंकन संघ सावरूच शकत नाही. ६.१ षटकांत भारताच्या सलामी जोडीने विजयी लक्ष्य गाठले. सिराजने स्विंग गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन केले. नशिबात जे असते ते मिळतेच हे त्याचे उद्गार खरेच आहेत. त्याने सामनावीर पुरस्काराची रक्कम श्रीलंकेच्या मैदान कर्मचा-यांना देऊन मनाचा मोठेपणा दाखविला. मैदान कर्मचा-यांच्या मेहनतीमुळेच ही स्पर्धा पार पडू शकली. एसीसीने ग्राऊंड स्टाफला ५० हजार डॉलर्सचे (सुमारे ६० लाख श्रीलंकन रुपये) बक्षीस दिले. अंतिम सामन्यात विक्रमांचा एव्हरेस्ट रचला गेला. श्रीलंकन संघाला उपविजेत्याचे ७५ हजार डॉलर्सचे तर भारतीय संघाला जेतेपदाचे १.५० हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. टॉस झाल्यानंतर रोहित म्हणाला, टॉस जिंकला असता तर फलंदाजीच घेतली असती. म्हणून सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला, गुड टॉस टू लूज! एकूण काय… अनिश्चितते, तुझे नाव क्रिकेट!

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या