23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसंपादकीयआमुचा रामराम घ्यावा...!

आमुचा रामराम घ्यावा…!

एकमत ऑनलाईन

एकनाथ शिंदेंसह पक्षातील आमदारांनी बंड पुकारल्याने बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोड्याच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार २७ नोव्हेंबर २०१९ रोजी स्थापन झाले होते.

हे सरकार ३१ महिने चालले. गत दहा दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या ३९ तर ११ अपक्ष अशा ५० आमदारांना आपल्या गोटात घेत बंडाचे निशाण फडकावले. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात विकासकामांना निधी कमी दिला तसेच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत बंडखोर शिंदे गटाने आघाडी सरकारला जय महाराष्ट्र केला. या दहा दिवसांच्या कालावधीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे मन वळवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कधी धमकी देऊन तर कधी चुचकारून ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे आपुल्या’ अशी भावनिक सादही दिली. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला, तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेनाप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते. समोर येऊन बोला. आपण मार्ग काढू, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र बंडखोर गट बधला नाही.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर गटावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे यांनी परत फिरा असे म्हणणा-या आणि भावनिक आवाहन करणा-या उद्धव ठाकरे यांना सवाल करताना म्हटले होते की, तुमचे पुत्र आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आमचा बाप काढतात आणि आपण समेटाची हाक देता याचा अर्थ काय? काँगे्रस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवायला बसली आहे म्हणून त्या दोघांची साथ सोडा आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपबरोबर युती करा, अशी एकनाथ शिंदे यांची मागणी होती. ‘हमे तो लूट लिया अपनेही घरवालोंने’ अशी आज शिवसेनेची गती झाली आहे. अलिकडे दोन-चार दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीत खूप फरक दिसत होता. आपण बहुमत सिद्ध करू शकणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणूनच ते निरोपाच्या तयारीत दिसत होते. निव्वळ डोकी मोजण्याच्या खेळात मला रस नाही. ज्यांना शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी राजकीय जन्म दिला त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचल्याचे पुण्य त्यांना मिळू द्या. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, हे माझे पाप आहे अशी खंत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गत काही दिवसांत वेगवान अनपेक्षित घडामोडी घडल्या. मी ही मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितच आलो होतो. आता अनपेक्षितपणे जात आहे.

त्याबाबत मला अजिबात खंत नाही असे ठाकरे म्हणाले. शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेताना जे माझ्यासमवेत असायला हवे होते ते दूर होते आणि ज्यांचा विरोध होईल असे सांगितले जात होते ते माझ्यासोबत होते. विशेष म्हणजे मी विनंती केल्यानंतर त्यांनी एका अक्षरानेही विरोध न करता साथ दिली. जे दगा देतील अशी भीती सतत घातली गेली ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष अखेरपर्यंत सोबत राहिले. म्हणजेच उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातून दगाफटका झाला. असे काही होईल याबाबत ठाकरे गाफील राहिले. बहुमत चाचणीदरम्यान काही गोंधळ होऊ नये म्हणून केंद्र सरकारने मुंबईत केंद्रीय राखीव दलाचे तसेच सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात केले परंतु उद्धव ठाकरे यांनी ती वेळच येऊ दिली नाही. ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशी सध्या शिवसेनेची स्थिती झाली आहे. शिवसेनेची पुन्हा उभारणी करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे मंत्रिमंडळात सामील झाल्यापासून शिवसेना संघटनेला चेहराच राहिला नाही. शिवसेनेतले नेते आणि सैनिकांमधला संवादच तुटला. त्यामुळे हे सरकार ‘आपलं’ आहे अशी भावना राज्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये कधी दिसलीच नाही.

कोरोनाचा फारसा बाऊ न करता सामान्य शिवसैनिकांसाठी मंत्रालयाची दारं उघडायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनीही ‘वर्षा’च्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यामुळे हे सरकार ‘शिवसेनेचे नाही’ ‘ठाकरें’चे आहे अशी विचित्र भावना शिवसेनेत पसरत गेली. शिवसेनेत पसरलेल्या अस्वस्थतेचा फायदा भाजप घेणार हे उघड होते. २०१९ मध्ये शिवसेनेला भाजपपासून दूर नेणारे कोण हे हेरून भाजपने त्यांना लक्ष्य केले. गत काही दिवस उद्धव ठाकरे बंडखोरांना जशी साद घालत होते तशीच साद भाजप दोन वर्षांपूर्वी शिवसेनेला घालत होता. आज बंडखोरांनी जसे दुर्लक्ष केले तसेच त्यावेळी शिवसेनेनेही केल्यामुळे भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य करायला सुरुवात केली. त्याचे दिशादिग्दर्शन किरीट सोमय्यांकडे तर तोफखान्याची जबाबदारी ईडी, सीबीआय, एनआयए आदी तपास यंत्रणांकडे देण्यात आली आणि शिवसेनेतले एकेक नेते भाजपला शरण जाऊ लागले. असो. शिवसेनेत आता उभी-आडवी फूट पडली आहे. शिवसेना संघटनेचा पूर्वीसारखा दबाव असता तर एवढ्या मोठ्या संख्येने बंड करण्याची आमदारांची हिंमत झालीच नसती. भाजप संधीची वाटच पाहत होता.

एकनाथ शिंदे गटाने ती संधी दिली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ची इच्छा पूर्ण होईल, असे बोलले जात असतानाच पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण दिले. फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. असे त्यांनी स्वत: जाहीर केले. मात्र अवघ्या तासभरात पुन्हा सुत्रे हालली आणि पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला सांगितले. आता शिंदे गटाची शिवसेना खरी की उद्धव ठाकरे यांची सेना खरी? असा वाद सुरू होईल. सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन विरक्तीचा मार्ग पत्करला आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपदावरून दूर करणा-याला पुण्य मिळू दे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला हे माझे पाप. त्याचे फळ भोगायला मी तयार आहे असे म्हटले आहे. एक मात्र खरे, एक आदर्श मुख्यमंत्री कसा असावा ते उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून लक्षात येते. ते आदर्श व सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहतील… आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या