26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeसंपादकीयएकीच्या बळाचा महाझटका!

एकीच्या बळाचा महाझटका!

एकमत ऑनलाईन

राज्यात आगळा-वेगळा व स्वप्नवत वाटणारा राजकीय प्रयोग घडवत सत्तेवर आलेल्या व भाजपला १०५ आमदार असूनही सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवणा-या शिवसेना-काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यातील तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करत एकीच्या बळाचा महाझटका दाखवून दिला. खरे तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच सत्तेवर आले ते एकीच्या बळावर! एकी असेल तर विरोधक कितीही बलवान असला तरी त्याला लोळवता येतेच, हेच या राजकीय प्रयोगाने सिद्ध केले होते. भाजपने त्यातून आवश्यक तो बोध घ्यायला हवा होता. मात्र, डोळ्यावर अहंकाराचा पडदा आला की, माणसाची सारासार विचाराची शक्ती चरायला जाते, असे म्हणतात. त्यामुळेच की काय, जे मतदारसंघ परंपरागत भाजपचे बालेकिल्ले म्हणून वर्षानुवर्षांपासून ओळखले जातात तेथे भाजपला सपाटून मार खावा लागला! भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘गिरे तो भी टांग उपर’ या उक्तीप्रमाणे पक्षाच्या पराभवाची भलावण करताना ते तिघे एक झाले म्हणून आम्ही हरलो, हिम्मत असेल तर एकएकटे लढून दाखवा, असे प्रतिआव्हान देऊन आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांनी आपल्या वक्तव्यावरून एकीच्या बळाचा महिमा मान्य केला आहे, मात्र, राजकारणात ही भाषा समजणे व समजावून घेणे अवघडच!

त्यामुळे चंद्रकांत दादांना त्यांना समजणा-या भाषेतच त्यांचा पराभव समजावून सांगावा लागणे अपरिहार्य ठरते! भाजपकडे १०५ आमदारांचे बळ असतानाही पक्षाचा सत्तेचा घास का हिरावला? तर त्याचे उत्तर एकीचे बळ हेच! सरकार आज पडणार, उद्या पडणार, अशी हाकाटी दररोज पिटली जात असताना सरकारने झोकात वर्षपूर्ती केली कशी ? तर एकीच्या बळावरच! हे सरकार निष्क्रिय आहे, सरकारमध्येच विसंवाद आहे, केवळ सत्तेसाठीची ही अनैसर्गिक युती आहे., तीन चाकी रिक्षा धावणार नाहीच., जनतेत सरकारबाबत प्रचंड असंतोष आहे, हे सरकार सर्व बाबतीत फेल आहे, वगैरे वगैरे असंख्य आरोप झाल्यावरही या सरकारने सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करण्याचा भीम पराक्रम केला. कसा? तर एकीच्या बळावर! सुजाण व सुशिक्षित मतदारांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत आजवर कायम वरचष्मा असणा-या भाजपला मतदारांनी साफ नाकारले व वर्षपूर्ती करणा-या सरकारला वर्षपूर्तीची दणदणीत भेट दिली का? तर मतदारांचाही एकीच्या बळावरच विश्वास आहे. मग आपल्या अहंकारात या एकीच्या बळाला आव्हान देत स्वबळाची भाषा करणा-या भाजपला व या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आता तिघे एक झाले म्हणून… हे आठवण्याचे कारण काय? उलट त्यांचा तर दावा होता की, तिघे एक झाले तरी भाजप त्यांना पुरून उरेल कारण जनता भाजपसोबत आहे.

ती सत्तेसाठीचा हा प्रयोग नक्की नाकारेल! आपल्याला एक झालेल्या तिघांविरोधात लढायचे आहे, हे चंद्रकांतदादांना सपाटून मार खाल्ल्यावर कळले काय? या तिघांमध्ये एकी नाहीच, हाच दादांचा दावा असताना आता ही एकी दिसल्यावर त्यावर गळे काढण्यात अर्थ काय? की, भाजपचे या एकीत ‘बेकी’ निर्माण करण्याचे प्रयत्न फसल्याचीच ही कबुली आहे? चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा सध्या तरी हाच ‘कबुली’ अर्थ निघतो आणि जर हे असेच आहे तर मग त्यांनी ‘तिघे एकत्र झाले म्हणून’चे गळे काढण्याऐवजी एकीचे बळ दाखविणा-या तीन पक्षांचे अभिनंदनच करायला हवे! अभिनंदन करण्यासाठी मनाचा मोठेपणा व सच्चेपणा लागतो. आताशा राजकारणाचा पोत पाहता तो लुप्तच झालाय! त्यामुळे चंद्रकांतदादांकडून अभिनंदनाची अपेक्षा नाहीच पण किमान या महाझटक्याने ताळ्यावर येऊन त्यांनी आत्मचिंतन तरी करावे, एवढीच माफक अपेक्षा! मात्र, चंद्रकांतदादांनी ही अपेक्षाही फोलच ठरवली आहे. त्यामुळे भाजप पक्ष म्हणून या महाझटक्यापासून बोध घेईल का? याबाबत साशंकताच! असो!! या महाझटक्याने जरी दादांना ताळ्यावर आणले नसले तरी देवेंद्र फडणवीस यांचे डोळे मात्र उघडल्याचे संकेत त्यांच्या प्रतिक्रियेतून मिळाले आहेत. ‘तीन पक्षांच्या एकत्रित ताकदीचे आमचे आकलन चुकले,’ अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. एकीच्या बळाची ही बोधकथा त्यांना कळली, हे ही नसे थोडके! अर्थात हे कळलेले ते किती वळवून घेतात यावरच भाजपचे राज्यातील भवितव्य ठरणार आहे.

लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या

कारण भाजपला येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुकीत याच एकीच्या बळाचा सामना करावा लागणार आहे. भाजप सरकारमध्ये एकोपा नसल्याचा कितीही दावा करो पण शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या गावागावांतील नेते-कार्यकर्त्यांनी मात्र या निवडणुकीच्या निकालातून ‘एकी’वर शिक्कामोर्तब केले आहे. ही बाब लक्षात घ्यायलाच हवी व त्यावर राजकीय आत्मचिंतनही व्हायला हवे. मोदींच्या करिष्म्यावर व सत्तेचा वापर करून, विभाजनवादाचे राजकारण करून यश मिळाल्याने भाजपच्या राज्यातील विद्यमान नेतृत्वाला आपल्यालाच प्रचंड जनाधार असल्याचा कैफ चढला आहे. यातूनच त्यांनी विरोधकांना तर कस्पटासमान लेखण्याचा पायंडाच पाडलाय मात्र, पक्षातील आपल्या जुन्याजाणत्या नेत्यांनाही अत्यंत अन्यायकारक वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपने अत्यंत शिस्तबद्धपणे बांधलेल्या त्यांच्या परंपरागत मतपेढीतही याबाबत नाराजी उफाळून आली आहे, हाच नागपूर व पुणे या बालेकिल्ले मानल्या जाणा-या मतदारसंघातील भाजपच्या दणदणीत पराभवाचा अर्थ आहे. भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला तो कळणार का? आणि कळले तरी ते हे वळवून घेणार का? हे अलहिदा! एक मात्र निश्चित की, मतदारांनी जसा एकीच्या बळाचा धडा भाजपला शिकवला आहे तसाच सत्तेवर असणा-या तीन पक्षांनाही ही एकी कायम ठेवण्याचा संदेश दिला आहे.

या निवडणुकीत तीनही पक्षांनी जास्तीच्या जागांचा मोह सोडून परस्पर सामंजस्याने जागावाटप केले. त्याचा योग्य संदेश या तीनही पक्षांच्या गावागावांतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये गेला आणि त्याच्या परिणामी भाजपने प्रतिष्ठेच्या बनवलेल्या या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकदिलाने भाजपला टक्कर देऊन विजय खेचून आणला. सरकारमध्ये असणा-या तीनही पक्षांच्या शीर्ष नेतृत्वास कार्यकर्त्यांनी दिलेला हा संदेश आहे. तो यापुढेही कायम लक्षात ठेवायला हवा. तीन पक्षांचे सरकार असल्याने भांड्याला भांडे लागणारच! मात्र या छोट्या-छोट्या कुरबुरी घर फुटण्यास कारणीभूत ठरू नयेत, याची शीर्ष नेतृत्वाने कायम दक्षता घ्यायलाच हवी! ती घेतली गेली तर राज्यातील भाजप नेत्यांना चढलेला कैफही उतरेल व सत्ताप्राप्तीसाठीचे त्यांचे कारनामेही उधळून लावता येतील! निवडणूक निकालाच्या वेळीच योगायोगाने या सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुस्तिका प्रकाशनाचा समारंभही होता. त्यात तीनही पक्षांच्या नेत्यांना या विजयाने मिळालेल्या आत्मविश्वासाचे दर्शन तर घडलेच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षांच्या सहकार्यावर मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळून आघाडीतील ऐक्य अभेद्य आहे, यावर शिक्कामोर्तबच केले! राज्यातील जनतेला स्थिर सरकारबाबत आश्वस्तच केले. कार्यकर्त्यांमध्येही योग्य संदेश दिला आणि सरकारमध्ये फूट पडावी म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजपलाही स्पष्ट इशारा दिलाय! असो!! एकंदर या निवडणूक निकालाने राज्यातील राजकीय प्रयोगाच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब झाले आहे आणि या प्रयोगात सहभागी तीनही पक्षांचा आत्मविश्वास वाढवला आहे, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या