23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeसंपादकीयवाढता... वाढता... वाढे!

वाढता… वाढता… वाढे!

एकमत ऑनलाईन

वाढता वाढता वाढे महागाई, वाढता वाढता वाढे इंधनदर ही आपली नेहमीची डोकेदुखी ठरली आहे. महागाई, वाढते इंधनदर या रोजच्या समस्यांनी सर्वसामान्य माणसाच्या डोक्याचे खोबरे झाले आहे. याच चालीवर वाढता वाढता लोकसंख्या वाढे असे म्हणता येईल. महागाई आणि खिशाचा मेळ कसा घालायचा या विचाराने माणूस चिंताग्रस्त बनला आहे पण या सर्वांचे मूळ कशात आहे याचा विचार आपण करत नाही. तो विचार करण्याची वेळ आता आली आहे. खरे तर हा विचार फार पूर्वीपासूनच करावयास हवा होता. वाढती लोकसंख्या हे चिंतेचे मूळ कारण आहे. या चिंतेने देशाला आणि जगाला ग्रासले आहे. ११ जुलै हा जागतिक लोकसंख्यादिन म्हणून पाळला जातो तो त्यासाठीच. ११ जुलै १९८७ रोजी जगात पाच अब्जावे बालक जन्माला आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक लोकसंख्यादिन म्हणून पाळला जातो. जागतिक लोकसंख्यादिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या विभागाकडून ‘जागतिक लोकसंख्या अंदाज २०२२’चा अहवाल जारी करण्यात आला आहे.

त्यात भारतासह जगभरातील देशांमधील लोकसंख्येत होणा-या वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानुसार चीन हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे परंतु २०२३ मध्ये या संदर्भात भारत चीनला पिछाडीवर टाकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार सध्या भारताची लोकसंख्या १.४१२ अब्ज तर चीनची १.४२६ अब्ज आहे. पुढील वर्षी हे चित्र बदलून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरेल. भारताची लोकसंख्या २०५० पर्यंत १.६६८ अब्ज तर चीनची लोकसंख्या १. ३१७ अब्ज इतकी होऊ शकते. १९८७ ते २०११ या २४ वर्षांत जगाची लोकसंख्या दोन अब्जांनी वाढून ती ७ अब्जांवर पोहोचली. म्हणजेच जगाची लोकसंख्या तुफान वेगाने वाढत आहे. भारतात लोकसंख्यावाढीचा वेग सर्वाधिक आहे. सध्या भारताची लोकसंख्या १४० कोटींच्या आसपास आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताची लोकसंख्या ३० कोटी होती. म्हणजे गत ७० वर्षांत देशाची लोकसंख्या ११० कोटींनी वाढली. लवकरच भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

अर्थात ही बाब काही भूषणावह नाही. देशाच्या सर्व समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येतच आहे. झपाट्याने वाढणा-या लोकसंख्येमुळे देशात अन्न, वस्त्र, निवारा, रोगराई आणि दारिद्र्य या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशाच्या प्रगतीत वाढती लोकसंख्या मोठा अडसर ठरत आहे. ‘सबका साथ सबका विकास’ होताना दिसत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे सरकारला कठीण होत आहे. लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु या प्रयत्नांना समाजाकडून म्हणावी तशी साथ मिळत नाही. कुटुंब नियोजनाची मोहीम सरकारी स्तरावर प्रभावीपणे राबवली जात आहे आणि जनताही त्याला चांगला प्रतिसाद देत आहे. तरीही मुलगा व्हावा म्हणून तीन-चार अपत्यांना जन्म देणारे काही महाभाग आहेतच. अशा लोकांमुळे कुटुंब नियोजनाची मोहीम वेग घेताना दिसत नाही. पूर्वी या मोहिमेला मुस्लिम समाजाचा प्रतिसाद मिळत नव्हता परंतु आता हा समाजही प्रतिसाद देताना दिसतो आहे. त्यांच्या मानसिकतेत बदल झाला आहे ही दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. लोकसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर नव्या पिढीमध्ये लोकसंख्येविषयी योग्य दृष्टिकोन आणि जाणीव निर्माण करावी लागेल.

सातत्याने वाढत असलेली लोकसंख्या ही भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. ज्या देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असते त्या देशामध्ये कमी लोकसंख्या असलेल्या देशांच्या तुलनेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपजीविकेच्या साधनांची नेहमीच कमतरता जाणवते. वाढत्या लोकसंख्येच्या ओझ्याखाली सेवासुविधा आणि पायाभूत संरचना दबून जातात. वाढत्या लोकसंख्येचा सर्वाधिक संबंध अशिक्षितता आणि गरिबीशी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हेनुसार भारताच्या प्रजनन दरात घट नोंदविण्यात आली आहे. हा दर २.२ वरून २ वर आला आहे. ग्रामीण भागात प्रजनन दर फक्त बिहार आणि झारखंडमध्ये जास्त आहे. मेघालय, मणिपूर आणि मिझोरामसारख्या छोट्या राज्यांत ग्रामीण भागातील एकंदर प्रजनन दर अधिक आहे. एकूण प्रजनन दर म्हणजे एका महिलेकडून एकूण मुलांना जन्म देण्याची सरासरी संख्या. जम्मू-काश्मीरमध्ये प्रजननदर १.४ आहे. सर्वांत कमी म्हणजे १.१ एवढा प्रजननदर सिक्कीमचा आहे.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचे असेल तर शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षणात कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. लोकसंख्यावाढीत अशिक्षितपणा आणि अंधश्रद्धा यांचा मोठा वाटा आहे. काही धार्मिक समुदायांमध्ये नसबंदी ही धर्मविरोधी मानली जाते. परंतु सुशिक्षित लोक कोणत्याही धर्माचे असले तरी ते वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे असतात. त्यामुळे वैज्ञानिक चेतनेचा प्रचार करणे ही प्राथमिक गरज बनते. नव्या पिढीला अभावग्रस्त जीवन द्यायचे की सुखद आरामदायी जीवन द्यायचे याचा विचार लोकांनीही केला पाहिजे. पूर्वी भारतात अनेक लोक कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करत नव्हते. असे करणे देवाच्या आणि धर्माच्या विरोधात आहे असे मानत असत. मुलांची वाढती संख्या ही परमेश्वराची देणगी आहे आणि म्हातारपणी त्यामुळे आपल्याला आधार मिळेल असे काही लोक मानत असत. ही धारणा आता हिंदू समाजात कमी झाली असली तरी बहुतांश मुस्लिम समाज अजूनही हीच धारणा योग्य मानतो. अशिक्षितपणा, अज्ञान यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

कुटुंब नियोजनाचे अधिकृत धोरण जाहीर करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. परंतु नेहरू युगापासून आजवर भारताला या क्षेत्रात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. याचा अर्थ चीनसारखे सक्तीचे कुटुंबनियोजन हाच मार्ग आहे असे नाही. आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती झाली की छोट्या व सुखी कुटुंबाचे वेध लागणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पूर्वी ‘हम दो-हमारे दो’ हा नारा लोकप्रिय झाला होता, आज ‘हम दो-हमारा एक’ हा नारा लोकप्रिय होताना दिसत आहे. अल्पवयीन विवाह हे लोकसंख्यावाढीचे एक महत्त्वाचे कारण मानले जाते. भारतात बालविवाहांचे प्रमाण अपेक्षेइतके कमी झालेले नसले तरी संतती प्रतिबंधक साधने वापरणा-या जोडप्यांचे आणि त्यातही महिलांचे प्रमाण वाढले आहे. आज लोकशाहीचे रक्षण आणि लोकसंख्येचे नियंत्रण आवश्यक बनले आहे. लोकसंख्या स्थिरावणे याचा एक अर्थ आपल्या लोकशाहीच्या प्रवासाची वाट अधिक प्रकाशमय करणे होय!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या