36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसंपादकीयआरोग्य व्यवस्थेची लक्तरे!

आरोग्य व्यवस्थेची लक्तरे!

एकमत ऑनलाईन

कोरोना विषाणूने भारतासह सा-या जगात हाहाकार माजवला आहे. कोरोनाला रोखताना राज्य आणि केंद्र सरकारचे प्राण कंठाशी आले आहेत. सरकारच अडचणीत आले असले तरी लोकांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात कोरोनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे उडताना दिसत आहेत. राज्यातील बहुतेक रुग्णालयांत रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी आक्रोश होताना दिसत आहे. इंजेक्शनसाठी तर संबंधित जिवाचा आटापिटा करत आहेत. शहरी भागापासून ग्रामीण भागातही कोरोना विषाणूने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याने आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड कमी आणि रुग्ण जास्त अशी अवस्था आहे. डॉक्टरांची कमतरता, बेडचा अभाव, आरोग्य कर्मचा-यांची वानवा, रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा अशी स्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन संजीवनी मानली जात असल्याने या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. मागणी वाढली की ओघाने काळाबाजार आलाच. माणसाला प्रेताच्या टाळूवरचे लोणीही खाण्याची सवय जडली की प्रत्येक गोष्टीचा काळा बाजार हा होतोच. देशभरासह राज्यातही लसीकरण सुरू असले तरी आता लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस पुरवठ्याबाबतही केंद्राने दुजाभाव दाखवला आहे. लसीअभावी राज्यातील अनेक केंद्रे बंद पडली. जादा लस पुरवठा करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला विनंती केली तर केंद्राने हात वर केले आणि राज्यातील लसीकरण प्रक्रियेलाच दूषणे दिली. कित्येक लसी वाया घालवल्याचा आरोपही केला. थोडक्यात लसीकरण प्रक्रियेतही राजकारण आडवे आले.

राजकारण्यांचा खेळ होतो परंतु इथे लोकांचा जीव जातो त्याचे काय? लसीकरण मोहिमेबाबत केंद्राने ‘आपला तो बाळ्या आणि दुस-याचं ते कारटं’ असा प्रकार केला याबाबत शंका नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे गुजरात! कोरोनाने गुजरात राज्यातही धुमाकूळ घातला आहे. तेथील आरोग्ययंत्रणा साफ उघडी पडली आहे. भाजपचे नेते महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबद्दल, ऑक्सिजनच्या तुटवड्याबद्दल आणि रेमडेसिवीरच्या काळा बाजार व तुटवड्याबाबत सरकारवर तुटून पडत आहेत तर तिकडे गुजरात राज्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराबाबत गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फैलावर घेतले आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये गुजरात प्रारूप आदर्श मानले जाते परंतु आता तेथेही प्रारूपाचे खरे स्वरूप उघड झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात गुजरात राज्य किती मागासलेले आहे हे स्पष्ट झाले.

देशभरात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असताना गुजरातमध्ये हे इंजेक्शन कसे काय मोफत वाटले गेले? या इंजेक्शनचे वाटप कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयातून होणे ही कोणती ‘आरोग्य यंत्रणा’? लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाद्वारे केवळ राजकीय फायदा मिळवण्याचे चाललेले हे प्रयत्न औषधांच्या तुटवड्याचे कारण नाही तर सडलेल्या मनोवृत्तीचे प्रतीक आहे. न्यायालयाचे झापणे आणि तुटवडा असलेल्या औषधाचे मोफत वाटप या घटना गुजरातमधील कोरोनाग्रस्त आरोग्य व्यवस्थेची लक्तरे चव्हाट्यावर आणण्यास पुरेशा आहेत. देशात उफाळून आलेल्या दुस-या लाटेवर परिणामकारक अशी जी मोजकी औषधे आहेत त्यापैकी एक रेमडेसिवीर. देशातील सर्वच राज्यांत या औषधाचा तुटवडा आहे. या औषधाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्याची निर्यातही थांबवण्यात आली आहे. हेच औषध गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्षांनी सुरतमध्ये मोफत वाटले. मुळात हे औषध वैद्यकीय निर्देशपत्राशिवाय विकले जाऊ नये अशा स्पष्ट सूचना देशभर लागू आहेत. ते गरजूंना मिळायला हवे.

गरजू कोण ते राजकीय पक्ष नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य यंत्रणा ठरवतात. मग हे औषध मोफत कसे काय वाटले गेले? म्हणजेच त्याचा काळा बाजार झाला. अधिकृत दवाखान्यात जे औषध मिळत नाही ते एखाद्या राजकीय पुढा-याकडे कसे काय उपलब्ध झाले? म्हणूनच न्यायालयाने गुजरातच्या कोरोनाग्रस्त आरोग्य यंत्रणेची चिरफाड केली आहे. औद्योगिक क्षेत्रात गुजरात आदर्श असेल परंतु औषध कंपन्या आणि वितरकांचे जाळे असलेल्या या राज्यात आरोग्यविषयक स्थितीची लक्तरे निघाली आहेत. नाहीतरी आता हे औषध जीवरक्षक नसल्याचा खुलासा राज्य कोरोना कृति दलाने केला आहे. हे औषध दिले नाही तर रुग्ण वाचणार नाही असे नाही असे राज्य कोरोना कृति दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीर ही जादूची कांडी नाही असे कृति दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. हे इंजेक्शन जीवरक्षक औषध नाही. या औषधामुळे रुग्णांचा मृत्यू थांबवता येत नाही. त्यामुळे उगाच धावपळ करू नका असेही राज्य कोरोना कृति दलाने स्पष्ट केले आहे.

म्हणजे आजवर रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली धावपळ व्यर्थच म्हणायची! असो. गत २४ तासांत देशात दोन लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. आता देशभरात बाधितांची एकूण संख्या सुमारे १ कोटी ४० लाख ७४ हजारांवर गेली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या सुमारे १४ लाख आहे. तर मृतांची संख्या सुमारे १ लाख ७३ हजारांवर आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये कारण आता भारताच्या लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे. रशियाच्या ‘स्फुटनिक ५’ या लसीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने भारताच्या औषध महानियंत्रकांना केली आहे. या लसीची परिणामकारकता ९१.६ टक्के आहे. राज्यात कोरोना लस जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईच्या हाफकीन संस्थेला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन बनवण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. कोरोनाला नैसर्गिक आपत्ती घोषित करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या