23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसंपादकीयशुभ वर्तमान!

शुभ वर्तमान!

एकमत ऑनलाईन

देशात महागाईने कळस गाठला असताना आणि उष्णतेच्या लाटांनी माणूस करपून जात असताना शुभ वर्तमान ते काय असणार? महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्यांची होरपळ महिन्यागणिक वाढतच चालली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरात गत एप्रिलमध्ये १५.०८ टक्के वाढ नोंदविली गेली. अन्नधान्य, इंधनापासून ते खाद्य वस्तूंपर्यंत सर्वच जिनसांच्या किमतीच्या उडालेल्या भडक्याने महागाई दराने १७ वर्षांपूर्वीचा उच्चांक मोडित काढला. महागाईच्या झळा रोखण्यासाठी सरकार आणि पर्यायाने राजकीय क्षेत्र काही उपाययोजना करीत आहे काय हा संशोधनाचा विषय आहे. सद्यस्थिती पाहता महागाईसारख्या समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचेच उद्योग सुरू आहेत. अर्थातच त्यासाठी वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेतला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत ‘बस हुई महंगाई की मार…’ अशा घोषणा देण्यात आल्या. नंतर देशात सत्तांतर झाले. ‘शंभर दिवसांत महागाई कमी करणार’ असे सांगून जनतेला गाजर दाखविले गेले. मात्र आठ वर्षे लोटल्यानंतर जनतेचे ‘अच्छे दिन’ हवेत विरले आहेत. जगणे कठीण झाले आहे. देशावर आधीच आर्थिक मंदीचे सावट होते, त्यात कोरोना संकटाची भर पडली. त्यात केंद्र सरकार वा राज्य सरकार जनतेवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.

सरकारची तिजोरी रिकामी असल्याचे निमित्त पुढे करून जनतेवर बेसुमार आर्थिक बोजा टाकला जात आहे. संकट गंभीर आहे, तरी देखील देशाचे अर्थमंत्री विचारतात, कुठे आहे महागाई? वास्तव स्वीकारून आणि जनतेला विश्वासात घेऊन महागाईवर प्रामाणिक विचार होणे गरजेचे असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र वेगळेच वादग्रस्त मुद्दे उकरून काढून भांडताना दिसतात. राजकारण्यांचे प्राधान्य नेमके कोणत्या मुद्यांना आहे असा प्रश्न पडतो. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे अशुभ वर्तमानच म्हणावे लागेल… शुभ वर्तमान पुढेच आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोसमी पावसाचे मोठे महत्त्व आहे. मोसमी पावसावर देशाची कृषि व्यवस्था अवलंबून असल्याने दरवर्षी कृषीराजा आणि जनता त्याची चातकासारखी वाट पाहात असते. यंदा मोसमी पावसाचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतक-यांच्या दृष्टीने हे शुभ वर्तमान आहे. बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमल्यानंतर कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने मोसमी पावसाची वाट सुकर झाली. त्यामुळे दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात वेळेपूर्वीच मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला. दरवर्षी मोसमी पाऊस अंदमानात १८ ते २० मे दरम्यान दाखल होतो. यंदा अनुकूल स्थितीमुळे मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाला. त्यामुळे केरळात तो २५ ते २७ मे तर तळकोकणात २ जूनपर्यंत दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईत ६ जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे.

तसे झाल्यास उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि अन्य भागात ११ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होऊ शकेल. गतवर्षी महाराष्ट्रात जुलैमध्ये मान्सून बरसला होता. यंदा मात्र एक महिना आधीच दाखल होईल असा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने म्हटले आहे की, महाराष्ट्रात ७ ते ८ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होऊ शकते. १२ ते १५ जून दरम्यान संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. १७ ते २१ मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २६ मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. मान्सूनची नेमकी तारीख सांगणे शक्य नाही असे हवामान विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. मोसमी पावसाचे आगमन भौगोलिक स्थितीमुळे कळते. वायव्य भारतातील कमीत कमी तापमानाची नोंद तसेच भारतीय पठाराच्या दक्षिण भागातील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण यावरून मोसमी पावसाचा अंदाज बांधला जातो. या अंदाजांना उपग्रहाद्वारे दिल्या जाणा-या संदेशाची जोड असते. काही वर्षांपूर्वी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. परंतु अलीकडे हे अंदाज तंतोतंत खरे ठरू लागले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गही या अंदाजानुसार आपली कामे उरकताना दिसतो आहे.

यापूर्वी भारतीय हवामान विभाग व शास्त्रज्ञ अमेरिका आणि अन्य देशांकडून दिल्या जाणा-या मोसमी पावसाबाबतच्या संदेशावर अथवा संकेतावर विसंबून राहत होता. परंतु २०१५ मध्ये मोसमी पावसाने चकवा दिला. त्यापासून धडा घेत भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन सुरू केले आणि अचूक अंदाज बांधण्यात सुधारणा झाली. भारतीय शास्त्रज्ञांनी स्वत:चे मॉडेल विकसित केल्याने हे शक्य झाले. देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. यंदा ९८ टक्के पाऊस पडेल असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा गुजरातमध्ये नेहमीपेक्षा कमी पाऊस पडेल तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस होईल. यंदा सुमारे १८ राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम १६ मे रोजी दिल्लीत जाणवला. दिल्लीत त्या दिवशी ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील काही वर्षांतील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण पाहता यंदा महाराष्ट्रात ७८ टक्के तूट निर्माण झाली तर काही राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला. विशेषत: आसामला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे तर कोची व तिरुअनंतपूरममध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यंदा महाराष्ट्राला तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. सोमवारी अंदमानात मोसमी पावसाचे आगमन झाल्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा नैऋत्य मोसमी वारे लवकर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंगळवारी उस्मानाबादमध्ये जोरदार वा-यासह पावसाने हजेरी लावली. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सोसाट्याच्या वा-यासह काही ठिकाणी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले. निलंगा तालुक्यात औराद शहाजानी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी येथे वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक बंद झाली. तगरखेडा, हालसी गावांना वीजपुरवठा करणारे विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंबा बागांचे मोठे नुकसान झाले. निसर्ग मोठा विचित्र आहे. काही भागावर तो मेहेरबानी करतो तर काही भागावर वक्रदृष्टी करतो. सध्या देशात काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पावसाचे असमान वितरण हा चिंतेचा विषय असला तरी ‘आलिया भोगासी असावे सादर’ असे म्हणत वाटचाल करावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या