23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसंपादकीयशुभ वर्तमान... ऋतू हिरवा !

शुभ वर्तमान… ऋतू हिरवा !

एकमत ऑनलाईन

गत आठवड्यात राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. काही भागात विजांच्या कडकडाटासह वळवाचा किंवा मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती, नेमके तसेच झाले. राज्यावर कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार तापमानात वाढ झाल्याने कमीअधिक प्रमाणात बाष्पीभवन होत राहिले. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदी भागात विखुरलेल्या स्वरूपात ढग जमत गेले. वा-याने हे ढग एकीकडून दुसरीकडे जात राहिल्याने एका भागात पावसाळी तर दुस-या भागात कोरडेपणा अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण राज्यात पाऊस न होता विखुरलेल्या स्वरूपात झाला. मराठवाड्याच्या काही भागाला त्याचा फटका बसला. राज्याच्या काही भागात वादळी पाऊस झाला. सातारा, बीड, सोलापूर, उस्मानाबाद आदी भागात गारपीट आणि वादळी पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवर गारांचा खच पडला, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महाबळेश्वर परिसरात गारांचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे स्ट्रॉबेरीसह शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. परिसरात गारांचा खच पडल्याने रस्त्यावर, शेतात, जंगली भागात गारांची पांढरी चादर निर्माण झाली.

पाऊस थांबल्यानंतर गारा बाजूला करून वाहतूक संथगतीने सुरू झाली. बीड जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट झाल्याने फळबागांसह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. बीड, अंबाजोगाई, पाटोदा, गेवराई आदी भागात गारपीट झाली. या अवकाळी पावसाचा सर्वांत मोठा फटका आंबा, उन्हाळी कांदा, भुईमूग पिकांना बसला. अवकाळी पावसाचा तडाखा उस्मानाबाद जिल्ह्यालाही बसला. वादळी वा-यासह पावसात वीज पडल्याने एका शेतकरी महिलेला प्राण गमवावा लागला. आंबा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, ज्वारी, कांदा, हरभरा पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाले, गोठ्यांचेही नुकसान झाले. उस्मानाबादसह कळंब, उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यासह अनेक भागात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. महाराष्ट्रासह देशाच्या निम्म्याहून अधिक भागात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या भागापासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशाच्या विविध भागात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. कमी दाबाचा पट्टा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि केरळमार्गे गेल्याने राज्याच्या विविध भागात पाऊस झाला.

विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला होता तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण कोकणात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पावसाळी स्थितीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन काही प्रमाणात दिलासा मिळाला खरा पण रात्री ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला. मराठवाड्याला अलीकडे अवकाळी पावसाची सवय झाली आहे, मात्र त्याला गारपिटीचा तडाखा अस झाला आहे. माणसाचे जीवन हवामानाच्या लहरीपणावर अवलंबून आहे एवढे मात्र खरे! अवकाळीतून सुटका व्हावी असे मराठवाड्यातील जनतेला वाटत असले तरी त्याची आणखी काही काळ ‘कृपा’ राहणार असे दिसते. कडक उन्हामुळे जनता परेशान आहे परंतु आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १८ ते २१ मार्चदरम्यान मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्याच्या अन्य भागात वादळी वा-यासह अवकाळी येऊ शकतो. १८ मार्च रोजी नागपूर, पुणे शहरात पावसाने हजेरी लावली होती. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली. त्यामुळे या भागात फळबागांसह रबी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अवकाळीचा फटका बसला तरी बळिराजाचे डोळे मान्सूनचा वेध घेत असतात. देशात सुमारे ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिना जवळ आला की जनतेचे डोळे मान्सूनकडे लागतात. यंदा देशात मान्सून सामान्य राहील असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. यंदा सुमारे ९८ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे म्हणजेच मान्सून सामान्य राहणार आहे. ९६ ते १०४ टक्क्यांचा पाऊस सामान्य मानला जातो. गत दोन वर्षांपासून ही मान्सूनची सरासरी आहे. सध्या राज्य कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे हैराण आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूनची ही सरासरी सकारात्मक आहे. या आधी १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये मान्सून सामान्य होता. २०१९, २०२० आणि २०२१ ही सलग तीन वर्षे मान्सून सामान्य राहणे ही अर्थव्यवस्थेसाठी चांगली चिन्हे आहेत. यंदा पावसाळ्यात ला निनो कमी राहील असा अंदाज आहे. चांगला पाऊस झाला की चांगले उत्पादन होते. ग्रामीण उत्पन्नात सुधारणा झाली की देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागतो.

दरवर्षी अनेक संस्था मान्सूनसंबंधी वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात. ते पाहून अनेकवेळा ‘उदंड झाल्या संस्था’ असे म्हणावेसे वाटते. काही संस्थांचे अंदाज मात्र तंतोतंत खरे ठरतात. महाराष्ट्रासह देशात यंदा मोसमी पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असून दीर्घकाळ सरासरीच्या १०३ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर दरम्यान होईल असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टी आणि गोव्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहील मात्र मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात सर्वसाधारण पाऊस होईल असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात कमी पाऊस होईल. कर्नाटकच्या अंतर्भागातही कमी पाऊस पडेल. जूनच्या प्रारंभी आणि सप्टेंबरमध्ये देशभरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वा-यांमुळे देशात ७५ टक्के पाऊस पडतो. भारतीय हवामान खाते पुढील चार महिने मान्सूनचा अंदाज वर्तवणार आहे. हवामानातील ला निना आणि एल निनो या घटकांवर मान्सूनची वाटचाल अवलंबून असते. ला निनामुळे चांगला पाऊस पडतो तर एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होते. यंदा एल निनोचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. देशातील १९६१ ते २०१० या कालावधीत पडलेल्या पावसाचे मोजमाप करून दीर्घकालीन सरासरी काढण्यात आली आहे. ८८ सेंटीमीटर ही सध्याची दीर्घकालीन सरासरी आहे. सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज म्हणजे दुष्काळाची भीती असते.

मोहोळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या