22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeसंपादकीयबरसल्या आनंदसरी!

बरसल्या आनंदसरी!

एकमत ऑनलाईन

मागचे दीड वर्ष राज्याला, देशाला कोरोना संकटाने पुरते जखडून टाकले आहे. या आरोग्य संकटाने सर्वसामान्यांना जसा जिवाचा घोर लावला तसाच घोर जीविताचा म्हणजेच जिवांच्या पोषणाचाही लावला आहे कारण कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी टाळेबंदीच्या अघोरी उपचारापुढे अद्याप सरकार व शासकीय यंत्रणांची आकलनशक्ती सरकायला काही केल्या तयार नाहीच. त्यामुळे मागचे दीड वर्ष देशात व राज्यात जनजीवन व व्यवहार उघडझापीच्याच चक्रव्यूहात पुरते अडकलेले आहे आणि अगदी अभिमन्यूप्रमाणेच हे चक्रव्यूह भेदून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्या देशाला व राज्याला सापडलेलाच नाही. भरीस भर म्हणून सरकार व यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी टाळेबंदीच्याच उपचारावर भिस्त ठेवून असल्याने देशात व राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा जास्त प्रमाद घडवत अक्षरश: थैमान घातले. कितीही मलमपट्ट्या केल्या तरी या लाटेने सर्वसामान्यांना दिलेल्या भळभळत्या जखमा भरून निघणे व निर्माण झालेली भयाची काजळी दूर होणे नजीकच्या काळात तरी शक्य नाही.

सरकारे व यंत्रणा आम्ही लोकांचे जीव वाचवले म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न असली व आनंद मानत असली तरी टाळेबंदीने कोरोना उद्रेकातून बचावलेल्या जिवांच्या पोषणाचा जो अक्राळविक्राळ प्रश्न निर्माण केला आहे त्याचे उत्तर काय? हे कोणतेही सरकार सांगायला तयार नाहीच! जीव वाचवणे हे जसे महत्त्वाचे तेवढेच वाचलेल्या जिवांचे पोषणही महत्त्वाचे! ते होत नसेल तर वाचलेल्या जिवांची अवस्था ‘आगीतून निघून फुफाट्यात’ अशीच होणे अटळ! मात्र, अद्याप तरी सरकार व यंत्रणेला ही आपलीच जबाबदारी असल्याचे भान गांभीर्याने आलेले असल्याचे जाणवत नाहीच! परिणामी सामान्यांमध्ये जेवढी भीती कोरोनाने निर्माण केली आहे त्यापेक्षा कैकपटींनी जास्त चिंता उपजीविकेच्या शाश्वततेबद्दल निर्माण केली आहे आणि जसजसा कोरोना काळ वाढतोय तसतशी ही चिंता प्रचंड मोठ्या नैराश्यात रुपांतरित होताना दिसते आहे. जनसामान्यांना ग्रासून टाकणा-या या नैराश्याच्या काजळीवर उपाय काय? याचे सध्याच्या घडीचे उत्तर एकच ते म्हणजे ‘रामभरोसे’! अशा या काळवटलेल्या वातावरणात निसर्गानेच दयावान होत सामान्यांवर कृपादृष्टी दाखविली आहे.

जीवनचक्राच्या रुतलेल्या व कोमेजलेल्या गाड्याला नवसंजीवनी देऊन चैतन्याची पालवी देणा-या आनंदसरी राज्यात अगदी वेळेवर, भरपूर व सर्वदूर बरसल्या आहेत. मान्सूनच्या आगमनाच्या तोंडावर अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात एकापाठोपाठ आलेल्या तौक्ते व यास चक्रीवादळांनी मोठा विध्वंस तर घडविलाच पण मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या बळिराजाच्या काळजाचा ठोकाही चुकविला होता. या वादळांमुळे मान्सून लांबणार व हवामान खात्याच्या या वर्षीच्या ‘उत्तम मान्सून’ या अंदाजालाही चकवा मिळणार का? अशी आशंका निर्माण झाली होती. ती काही प्रमाणात सुरुवातीस खरे ठरण्याची चिन्हेही निर्माण झाली होती व मान्सूनचे केरळातील आगमन काही काळ लांबलेही होते. मात्र, दयाघनाने सामान्यांची परीक्षा न घेता आपली कृपादृष्टी कायमच ठेवली नाही तर हवामान खात्यातील तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का देत जोरदार बॅटिंग केली. तळकोकणात दाखल झाल्यावर अवघ्या २४ तासांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकण्याचा विक्रमच मान्सूनने यावेळी नोंदविला आहे. तसेही मान्सूनचे आगमन नवचैतन्याची पालवी फोडणारेच.

सुशासनाच्या सत्वपरीक्षेचा काळ

पण त्यातल्या त्यात आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था व अर्थचक्र मान्सूनवरच अवलंबून असल्याने त्याचे आगमन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कोरोना संकटात सगळे व्यवहार व जनजीवनच ठप्प झाल्याने घट्ट रुतलेल्या अर्थगाड्याला वंगण घालून दिलासा देण्याचे काम मागच्या वर्षीही फक्त कृषी क्षेत्रानेच केले होते. यावर्षीही सध्याची परिस्थिती फारशी वेगळी नाही. भलेही दोन महिन्यांच्या प्रदीर्घ टाळेबंदीतून महाराष्ट्राचा श्वास मोकळा होण्यास सुरुवात झालेली असली तरी ही प्रक्रिया अंशत: आहे, पूर्णत: नाही! शिवाय या प्रक्रियेचे भवितव्यही कोरोनाच्या ‘जर-तर’ स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे मोकळा होत असलेला श्वास कितपत व किती कालावधीपर्यंत मोकळा राहील याची शाश्वती नाही. राज्य सरकारने तर टाळेबंदी शिथिल करतानाचे नियम व निकष सांगताना ‘तुमचे स्वातंत्र्य ही तुमचीच जबाबदारी’ हे स्पष्टपणे ध्वनित केलेलेच आहे. त्यामुळे आज उघडलेली बाजारपेठ व सुरू होऊ घातलेले उद्योगधंदे, व्यवसाय कितीकाळ सुरू राहतील, सामान्यांना रोजगार देतील, हे ईश्वरच जाणो! अशा स्थितीत हमखास रोजगाराचे व उत्पादनाचे देशातील एकमेव क्षेत्र म्हणजे शेती!

ती बहुतांश मान्सूनच्या मूडवरच अवलंबून असणारी आणि म्हणूनच मान्सूनचा मूड देशातील सामान्यांसाठी, देशासाठी व देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कळीचाच! त्या दृष्टीने यावर्षी केवळ वेळेवरच नव्हे तर समाधानकारक बरसणा-या आनंदसरींचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित व्हावे! हवामान खात्याचा यंदाचा अंदाज १०० टक्के खरा ठरेल, असा विश्वास निर्माण करत मान्सूनचे राज्यात जोरदार आगमन झाले आहे. सलामीलाच वरुणराजा महाराष्ट्रावर सर्वत्र धो-धो कृपादृष्टी दाखवतो आहे. मुंबई आणि उपनगरांची तर पहिल्याच पावसाने पुरती दैना उडवून टाकली. बहुधा राजधानीत मान्सूनपूर्व नालेसफाई व इतर कामे करणा-यांचा मान्सूनच्या कृपादृष्टीपेक्षा लहरीपणा आणि अवकृपेवरच गाढा विश्वास असावा. त्यामुळेच त्यांच्या कामाचा अत्युच्च दर्जा व कामातील प्रामाणिक तळमळ या दोन्ही बाबी पहिल्याच पावसात पुरत्या वाहून गेल्या आणि बिचा-या मुंबईकरांना अक्षरश: तळमळावे लागले! असो!! हा सगळा विषय ‘नेमेचि येतो पावसाळा’ प्रमाणेच ‘नेमेचि होते नालेसफाई’ असाच. त्यावर वर्षानुवर्षे भाष्य होऊनही त्यात सुधारणा होण्याची आशा वेडीच! त्यामुळे त्यावर नव्याने भाष्य निरर्थक व जागेचा अपव्ययच! त्याने मुंबई महापालिकेची गेंड्याची कातडी थरथरणे अशक्य. त्यामुळे असे भाष्य टाळणेच सुज्ञपणा!

मुंबईकरांची पावसाने दैना केली तरी ती त्यांनी आनंदाने सोसावी कारण मान्सूनची कृपादृष्टी राज्यावर अशीच कायम राहणे हे राज्याच्या व पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मे महिन्यात वाढलेला बेरोजगारीचा टक्का जूनमधील वरुणराजाच्या कृपादृष्टीने आटोक्यात राहील, किमान वाढत जाणार नाही, अशी आशा निर्माण झाली आहे. बळिराजा मागचे सगळे मागे टाकून भविष्य पेरण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. कोरोना संकटाने त्यालाही पुरते कोमेजून टाकले होते. आनंदसरी बरसल्याने त्याच्या मनात आशेची पालवी फुटली आहे, चैतन्य निर्माण झालेय. त्याचा सकारात्मक परिणाम अर्थगाड्यावर नक्कीच होईल व मरगळून पडलेल्या अर्थव्यवस्थेतही मान्सून कृपेने चैतन्य निर्माण होईल, हीच आशा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या