23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeसंपादकीयद्वेषाने द्वेष वाढतो!

द्वेषाने द्वेष वाढतो!

एकमत ऑनलाईन

आज देशात धार्मिक आणि जातीय तेढ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माचा, जातीचा आदर ठेवल्यास तेढ निर्माण होण्यास खत-पाणीच मिळणार नाही. कोणताही धर्म एकमेकांचा द्वेष करा असे सांगत नाही. अहिंसा, सत्य, संयम, संतोष, सहकार इ. यम-नियमांची निष्ठा दृढ झाली की बाकीचे आपोआप सुरळीत होते. मुलाला दूध पाजावे हे आईला आणि भूक लागली की रडावे हे बाळाला शिकवावे लागत नाही. निष्ठा ही अशी असते. रात्री शांत झोप लागली की चित्त प्रसन्न होते. सत्वगुण प्रकट होतो. दुपारी भूक लागली की रजोगुण जागा होतो आणि जेवण झाले की झोप येते म्हणजे तमोगुण दिसतो.

थोडक्यात योग्य परिस्थिती असली की तिला साजेसा गुण प्रकट होतो. माणसाचे मन जे आहे ते आहे. ते काही केले तरी पशुचे मन होणार नाही आणि ते देवासारखेही बनणार नाही. ते आपल्या मर्यादेत राहते. परिस्थिती सुधारली की ते थोडेफार सुधारते आणि ती बिघडली की बिघडते. असो. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणा-या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाज माध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे उदयपूरमध्ये तणाव निर्माण झाला. कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे. या हल्ल्याची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर उदयपूर शहरात तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी आंदोलन करून रस्त्यावर जाळपोळ सुरू केली. आता उदयपूर हत्येचा तपास ‘एनआयए’कडे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) देण्यात आला आहे. कन्हैयालालची हत्या हे एक दहशतवादी कृत्य असल्याने त्यात कोणती संघटना अथवा आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे का याचा तपास केला जाणार आहे. उदयपूरसारखीच एक घटना अमरावती येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली. त्यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित केल्यामुळेच ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला ही हत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे नाकारले होते. परंतु राज्यात सत्ताबदल होताच पोलिसांनी घूमजाव केले आहे. पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून ही हत्या झाल्याचे प्रारंभी पोलिसांनी म्हटले होते. आता मात्र ते हत्येचा संबंध नुपूर शर्मा प्रकरणाशी जोडू पाहत आहेत. कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या दोन प्रकरणांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कन्हैयालालची हत्या दोघा धर्मवेड्या माथेफिरूंनी केली होती. कारण कन्हैयालालने इस्लामचे संस्थापक पैगंबरांविषयी अनुद्गार काढले होते. समाज माध्यमाद्वारे त्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला होता. म्हणजे गुन्हा केला नुपूर शर्माने पण सजा मिळाली कन्हैयालाल तेलीला! मुळात अभिव्यक्तीस्वातंत्र्य ही संकल्पना अर्धवट स्वीकारता येत नाही. ते पूर्ण आणि निरंकुश असेच असावे लागते. परंतु तितकी प्रौढता धर्मवेड्या व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या धर्मामध्ये नाही. प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

नुपूर शर्मा यांच्या बेलगाम जिभेने संपूर्ण देशभर वणवा पेटवला. देशात जी अशांतता निर्माण झाली त्याला केवळ नुपूर शर्माच जबाबदार आहेत. त्यांनी त्याचवेळी त्वरित संपूर्ण देशाची माफी मागावयास हवी होती असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. वादग्रस्त मुद्यावर चर्चासत्र घेतल्याबद्दल वृत्तवाहिनीला आणि एफआयआर दाखल होऊनही नुपूर शर्मावर कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांना कानपिचक्या दिल्या आहेत. प्रेषितांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यानंतर शर्मा यांच्यावर अनेक राज्यांत ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते दाखल खटले एकत्रित करून दिल्लीत स्थानांतरित करण्याची मागणी करणारी याचिका न्या. सूर्यकांत आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठाने फेटाळली. खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. यावेळी खंडपीठाने नुपूर शर्माला खडे बोल सुनावताना म्हटले की, तुम्ही सवंग लोकप्रियतेसाठी किंवा राजकीय हेतूने पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. लोकांच्या भावना भडकवण्यासाठीच अशी वक्तव्ये केली जातात. तुम्ही केलेली वक्तव्ये अस्वस्थ करणारी आणि अहंकारी आहेत. असे लोक इतरांच्या धर्माचा आदर करत नाहीत. अशी विधाने करण्याची गरज काय होती? तुमच्या वक्तव्यामुळे देशात दुर्दैवी घटना घडल्या. देशात निर्माण झालेल्या अशांततेसाठी ही एकटी महिला जबाबदार आहे असे खंडपीठ म्हणाले तेव्हा नुपूर यांच्या वकिलांनी लेखी माफीचा उल्लेख केला.

मात्र अशा अटी-शर्तींसह माफी मागण्याऐवजी तुम्ही जाहीरपणे देशाची माफी मागायला हवी होती. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून तुम्ही कायद्याविरोधात जाऊन वाटेल ते बोलू शकत नाही असे खंडपीठाने सुनावले. नुपूर शर्मा तपासात सहभागी होण्यास तयार आहेत. परंतु त्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे सर्व खटले दिल्लीत स्थानांतरित करावेत अशी मागणी शर्मा यांच्या वकिलांनी केली. या मागणीची खिल्ली उडवताना न्यायालय म्हणाले, आम्ही काय तुमच्यासाठी लाल गालिचा अंथरायचा का? तुम्ही इतरांविरोधात तक्रार केली तर त्यांना लगेच अटक केली जाते पण तुम्हाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही. या याचिकेतून तुमचा अहंकार दिसतो. तुम्हाला कनिष्ठ न्यायालये तुच्छ वाटतात अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माला फटकारल्यानंतर काँगे्रसने भाजपला लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप, संघ यांनी देशात असंतोष, असूया आणि द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे. हे देशविरोधी कृत्य राष्ट्रहितासाठी घातक आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला आरसा दाखवला असून त्यांना लाज वाटली पाहिजे असे जयराम रमेश म्हणाले. उदयपूरमध्ये झालेल्या हत्येने देशात धार्मिक आणि जातीय तेढ किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे ते लक्षात येते. गत काही वर्षांपासून देशातील मुस्लिम समाज प्रचंड तणावाखाली आहे. सध्याचे वातावरण जणू काही त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. तरीही मुस्लिम समाज शांत आहे पण सतत कुरघोडी होत राहिल्यास या शांततेला कधी तडा जाईल हे सांगता येत नाही. हिंदुत्ववाद्यांनीही संयम दाखवायला हवा. सर्व धर्म मानवनिर्मित असल्याने त्यात दोष असणे स्वाभाविक आहे. दोषांची चिकित्सा करणे म्हणजे ईश्वरनिंदा असे समजणे हा मूर्खपणा आहे. असा मूर्खपणा दोन्ही बाजूचे धर्मांध नेहमीच करतात. गत आठ वर्षांत अशा घटना अधिक वाढल्या आहेत. गोमांस तस्करीच्या शंकेवरून झुंडबळी घेणारे हिंदुत्ववादी धर्मांध आणि पैगंबरांची चिकित्सा केल्यामुळे अथवा चिकित्सेचे समर्थन केल्यामुळे बळी घेणारे धर्मांध एकाच माळेचे मणी आहेत. यातून धर्मांध मंडळी काही धडा घेणार काय? द्वेषाने द्वेष वाढतो हे या लोकांनी लक्षात घ्यायला हवे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या