25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeसंपादकीयमोकाट पाऊसधारा!

मोकाट पाऊसधारा!

एकमत ऑनलाईन

निसर्गाचा खेळच न्यारा. तो प्रतीक्षा करायला लावतो आणि पुरे-पुरे म्हणायलाही लावतो. त्याचे अस्तित्व जाणवत नाही तेव्हा तो करुणा भाकायला लावतो आणि तो प्रगटतो तेव्हा नतमस्तक व्हायलाही भाग पाडतो. माणसाच्या जीवनात बहार आणतो आणि दु:खही पेरतो. ‘जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम’ हेच खरे. राज्यात मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. बळिराजाने धरणीमातेची ओटी भरली आणि धरणीमाता आनंदाने डोलू लागली. आनंदाची पेरणी झाल्यानंतर निसर्गाला दडी मारण्याची हुक्की आली आणि जगाच्या पोशिंद्याच्या काळजाला घरे पडू लागली. धरणीमाता हिरमुसली, कोवळी पाती माना टाकू लागली. माणसासमोर समस्यांचा काळोख दाटू लागला. अखेर सारी काळजी जगन्नियंत्यालाच! सजल घन गर्जत आले अन् बरसत राहिले. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा कायम राहिला.

महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा कर्नाटकपर्यंत पोहोचला. या पट्ट्यामुळे कोकणात घनघोर पाऊस सुरू झाला. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. मुंबईत बुधवारी सुमारे १०० मि. मी. पाऊस झाला. उपनगरे, ठाणे, अलिबाग, रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यातही मोठा पाऊस झाला. मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस झाला. ४-५ दिवसांपासून पावसाने खूपच मनावर घेतले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, विदर्भात मुसळधार झाला. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातही काही भागात मुसळधार पाऊस झाला. अनेक नद्यांना पूर आले, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफसह अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ‘ये मौसम बडा बेइमान है’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राज्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून अनेक इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेल्याने शेकडो लोक पुरात अडकले आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला. बुधवारी रात्रभर झालेली अतिवृष्टी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती यामुळे चिपळूण शहर जलमय झाले. कोकण विभाग व मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. काही भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने दोन्ही प्रकारची वाहतूक ठप्प झाली. लोणावळा-खंडाळा घाट विभागात ३०० मि. मी. हून अधिक पाऊस झाल्याने पुणे-मुंबई लोहमार्गावर मंकी हिल-पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.कर्जत-खोपोली लोहमार्गही ठप्प झाला. कोल्हापूर-रत्नागिरी, नेरळ-कळंब मार्ग पाण्याखाली गेल्याने बंद झाला. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. राज्यातील पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी हलका-मध्यम ते मुसळधार स्वरूपात पाऊस सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊसधारा सुरू आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावे, शहरे व परिसर पाण्याखाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पाच जणांचे जीव गेले. कोल्हापूर, सांगली यासारख्या नदीकाठच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाड शहरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफचे जवान तेथे पोहोचले असून त्यांचे मदतकार्य सुरू आहे. या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नागरिकांना अन्न पाकिटे पुरवली आहेत. येथे अनेक घरांच्या दुस-या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. ज्या ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तेथे एनडीआरएफसह कोस्ट गार्ड, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील अनेक नद्यांची पातळी वाढली असून प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे.

कोल्हापूरच्या पंचगंगेने दुस-यांदा धोक्याच्या पातळीपर्यंत मजल मारली. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करण्याच्या तसेच जेथे कोविड रुग्ण असतील त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटरवरून वाहत आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटरवरून वाहत आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटरवरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्याही धोका पातळीवरून वाहत आहेत. भातसा धरण ६३ टक्के, सूर्या धरण ६३ टक्के, बारावी धरण ६२ टक्के तर मोरबे धरण ७१ टक्के भरले आहे.

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली आहे. ब-याचवेळा निसर्ग रौद्ररूप धारण करतो त्यामागे मानवी चुका कारणीभूत असतात. हवामानाबदल, तापमानवाढ याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच आपत्तींना आमंत्रण मिळते. हवामानबदलातून उद्भवणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्यहानी तर होतेच शिवाय वित्तहानी होऊन सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही परिणाम होतो. पॅरिस करारानुसार पृथ्वीची वार्षिक तापमानवाढ २ अंश सेल्सियसपेक्षा कमी व्हावी यासाठी काही उद्दिष्टे ठरवली गेली.

परंतु काही विकसित राष्ट्रांनी त्याकडे डोळेझाक करून बेजबाबदार भूमिका घेतली. त्याचे परिणाम विकसनशील राष्ट्रांना भोगावे लागत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून तात्पुरती माघार घेतली होती. खरे तर हवामानबदलाचा फटका बड्या राष्ट्रांनाही बसला. शीत कटिबंधात येणा-या कॅनडा आणि अमेरिकेतही उष्णतेची लाट आली. युरोपमध्ये जर्मनी, बेल्जियम, लग्झेनबर्ग, हॉलंडच्या सीमावर्ती भागात पुराने थैमान घातले. उष्णतेच्या लाटेमुळे कोरड्या जंगलात वणवे पेटले. चीनमध्येही पूर आला. भारतासारख्या देशात नैसर्गिक आपत्तींना हवामानबदलाइतकीच अंतर्गत अनास्थाही कारणीभूत आहे. नैसर्गिक आपत्ती टाळायची असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

गूढ नि गहिरे… रंग पावसाचे!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या