29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home संपादकीय नवोदयाची आशा !

नवोदयाची आशा !

एकमत ऑनलाईन

अनेक लाजिरवाण्या व वेदनादायक घटनांची अनुभूती जागतिक महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकी जनतेला देणारे डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्व बुधवारी अखेर संपुष्टात आले. नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन व त्यांच्या सहकारी उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचा शपथविधी पार पडला आणि ‘ट्रम्पवादा’ने त्रस्त अमेरिकेनेच नव्हे तर संपूर्ण जगाने नि:श्वास सोडला! अर्थात सत्ता सोडण्यास अजिबात तयार नसणा-या व त्यासाठी कॅपीटॉलवरील हल्ल्यासह सर्व प्रमाद घडविणा-या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडतानाही ‘मी पुन्हा येईन’ची गर्जना करत अमेरिकेत सुरू झालेला ‘ट्रम्पवाद’ एवढ्यात संपणार नाहीच याची अप्रत्यक्ष धमकी दिलेली असली तरी त्यांना ही धमकी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किमान चार वर्षे वाट पहावीच लागणार असल्याने तोवर तरी अमेरिका व जगातील जनता या ‘ट्रम्पवादा’पासून मुक्तता मिळाल्याचे समाधान नक्कीच मानू शकते, हे निश्चित! ट्रम्पवाद आपोआप संपणार नाही हे सत्यच! तो नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उपाध्यक्ष कमला हॅरीस यांना प्रचंड सकारात्मक प्रयत्न करून संपवावा लागेल तरच आज या जागतिक महासत्तेची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येऊ शकेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संकुचित दृष्टिकोनातून व त्याला जोड मिळालेल्या त्यांच्या विक्षिप्त स्वभावातून मागच्या चार वर्षांत जे निर्णय घेतले ते केवळ अमेरिकेची महासत्ता म्हणून असणारी जागतिक प्रतिष्ठा व दबदबा धुळीस मिळवणारेच नाहीत तर देश म्हणूनही अमेरिकेसाठी प्रचंड नुकसानदायक ठरलेले आहेत. याच उथळपणातून व कोत्या, संकुचित मनोवृत्तीतून ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांतून अमेरिकेने आपले कैक पारंपरिक मित्र गमावले आहेतच. शिवाय देशातील जनताच नव्हे तर जागतिक समुदायाचेही प्रचंड नुकसान केले आहे. यातून शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जे जागतिक समीकरण व राजकीय स्थिती निर्माण झाली होती त्यातही प्रचंड उलथापालथ झाली आहे. हेकेखोर व उथळ ट्रम्प यांच्या नेतृत्वाने अमेरिकेचे अर्थकारण अडचणीत आले आणि त्याचा सुयोग्य फायदा उचलत चीनने आपला जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. मुत्सद्दीपणा हे जागतिक राजकारणाचे प्रमुख सूत्र आहे. मात्र, तो कशाशी खातात हेच माहीत नसलेल्या ट्रम्प यांच्या हाती अमेरिकी महासत्तेची सूत्रे असल्याने त्यांनी चीनच्या वाढत्या वर्चस्वाला मुत्सद्दीपणे शह देण्याऐवजी चीनसोबत थेट व्यापारयुद्धच सुरू केले. याचा प्रचंड फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसणे तर अटळच होते पण त्यात संपूर्ण जग भरडले गेले.

चीनचे आर्थिक वर्चस्व व्यापारयुद्धाने संपविण्याचा अट्टाहास हा स्वत:च्या पायावर कु-हाड चालविण्याचाच प्रकार पण ट्रम्प यांना हे उमगणे व पचविता येणे त्यांच्या स्वभावानुरूप केवळ अशक्यच! त्यातून त्यांनी जे उलटसुलट निर्णय घेतले त्याने केवळ चीनलाच नाही तर रशिया, जर्मनी, युरोपीय युनियन यांनाही स्वत:चे वर्चस्व वाढविण्याची आयती संधी प्राप्त झाली. त्यात कोरोना संकटाची भर पडली. ट्रम्प यांनी अत्यंत उथळपणे व विक्षिप्तपणे हे संकट हाताळल्याने अमेरिकेत अक्षरश: मानवसंहारच घडला. बायडन यांचा शपथविधी पार पडत असताना अमेरिकेत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार लाखांवर गेलेली आहे व कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा अडीच कोटींवर पोहोचला आहे. ट्रम्प यांच्या बेफामपणामुळेच हा अंगावर शहारे निर्माण करणारा मानवसंहार अमेरिकेला पहावा व भोगावा लागतो आहे. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या प्रचंड धक्क्यातून अमेरिकेला सावरण्यासाठी जो बायडन यांना किमान दोन ते अडीच वर्षे अत्यंत कठोर प्रयत्न करावे लागणार आहेत.

दिल्लीतील शेतक-यांच्या ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारली

अमेरिका आर्थिक महासत्ता असल्याने व जो बायडन यांचे नेतृत्व अत्यंत संयमी, परिपक्व असल्याने या आर्थिक संकटातून देश यशस्वीपणे बाहेर येईलही पण त्यासाठी देशात शांतता, स्थैर्य व ऐक्य आवश्यक ठरते. याबाबतीत ट्रम्पवादाने अमेरिकेत जे पेरून ठेवले आहे त्याचे प्रत्यंतर सत्ताहस्तांतरणा दरम्यान देशात घडलेल्या लांच्छनास्पद व क्लेशदायक घटनांमधून आलेच आहे. विभाजनवादाच्या या विषवल्लीमुळे राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीवेळी अप्रिय प्रकार टाळण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागते की काय? अशीच स्थिती अमेरिकेत निर्माण झाली होती. सुदैवाने अशी वेळ आली नाही पण त्यामुळे स्थिती सुधारली, असा निष्कर्ष काढणे चूकच! बायडन-हॅरीस या जोडीसमोर अमेरिकेत फोफावलेली विभाजनवादाची विषवल्ली उपटून टाकण्याचे सर्वांत कठीण काम ‘ट्रम्पवादा’ने वाढून ठेवले आहे. बायडन यांना त्वरित हे काम सुरू करावे लागेल तरच अमेरिकेत नवोदयाची आशा निर्माण होईल. जो बायडन यांनाही त्याची पूर्ण जाणीव आहेच. त्यामुळेच त्यांनी ट्रम्प यांचे जे निर्णय तातडीने फिरवायचे, दुरुस्त करायचे किंवा रद्दबातल करायचे आहेत त्याची यादीच जाहीर केली आहे.

या यादीवर नजर टाकली तर ट्रम्प यांनी अमेरिकेत व जगात मागच्या चार वर्षांत काय धुडगूस घातला याची स्पष्ट कल्पनाच यावी. मेक्सिकोच्या सीमेवर महाकाय भिंतीचे काम थांबविणे, मुस्लिमबहुल देशांतील पर्यटकांवर लादलेली बंदी उठवणे, जागतिक पर्यावरण संरक्षणासाठीच्या पॅरिस करारात पुन्हा सहभागी होणे, जागतिक आरोग्य संघटनेला बंद केलेली मदत पुन्हा सुरू करणे, देशात मास्क वापरणे सक्तीचे करणे, कोरोना लसीकरणाची देशातील मोहीम सर्वोच्च प्राधान्याने राबविणे, घसरती अर्थव्यवस्था सावरणे असे अनेक निर्णय या यादीत आहेत व ही यादी प्रचंड मोठी आहे. थोडक्यात बायडन यांना आपल्या कार्यकाळात अमेरिकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी देशाच्या नवनिर्माणाचेच काम हाती घ्यावे लागणार आहे व त्याची कोरोनानंतर झालेल्या जागतिक रचनेतील फेरबदलांशी सांगड घालावी लागणार आहे. तरच महासत्ता हे बिरूद अमेरिकेला टिकवता येईल. बायडन यांनी उपाध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना अनुभव आहे व त्यांच्या संयमी, परिपक्व कार्यशैलीचा जगालाही अनुभव आहेच. त्यांच्या हाती आता महासत्तेची सूत्रे आल्याने जगातील गरीब व विकसनशील राष्ट्रेही त्यांच्याकडे आशेने पाहतायत! या राष्ट्रांना अमेरिकेकडून उदार धोरणांची व वडीलकीच्या आधाराची अपेक्षा आहे व बायडन यांना महासत्तेचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी ही अपेक्षा पूर्ण करावीच लागेल अन्यथा चीन या सगळ्यांना आपल्या कह्यात घेऊन मांडलिक बनविणार, हे उघड आहे.

चीनने सध्याच्या स्वत:च्या विखारी साम्राज्यवादी विस्तार धोरणातून ही बाब जगजाहीर केलीच आहे. त्यामुळे विखारी चीनला रोखायचे तर महासत्ता म्हणून प्रबळ अमेरिका उभी राहणे व अमेरिकेने जगातील लोकशाहीवादी राष्ट्रांचे नेतृत्व समर्थपणे सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. राहता राहिला भारताचा प्रश्न! तर बायडन-हॅरीस भलेही भारत समर्थक नसले तरी त्यांना कारभार हाकताना मोठी शक्ती म्हणून भारताला दुर्लक्षितही करता येणार नाही की, भारतविरोधी धोरणेही राबविता येणार नाहीत. त्यांना भारताशी सहकार्याचेच धोरण राबवावे लागेल! असो!! एकंदर बायडन-हॅरीस जोडीवर केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगात नवनिर्माणाची जबाबदारी आहे. ही जोडी त्यांचा आजवरचा अनुभव पाहता परिपक्वतेने ही जबाबदारी पार पाडेल, ही आशा व अमेरिकेसह जगभर फोफावलेला ‘ट्रम्पवाद’ निपटून काढेल, ही अपेक्षा! या जोडीला यात यश मिळावे, हीच शुभेच्छा!!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या