29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसंपादकीयरुग्णालये की मृत्यूचे सापळे ?

रुग्णालये की मृत्यूचे सापळे ?

एकमत ऑनलाईन

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती झाल्याने या रुग्णालयात कोविड महामारीशी झुंजत जीवन-मरणाची लढाई लढत असलेल्या २४ रुग्णांना श्वास कोंडून तडफडून जीव सोडावा लागला. आपल्या डोळ्यासमोरच रुग्णांना तडफडून प्राण सोडावा लागल्याने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या नातेवाईकांचा माणुसकीला सुन्न करून टाकणारा आक्रोश अद्याप थांबलेला नसताना व या अपघाताच्या वृत्ताची शाई अद्याप वाळलेली नसतानाच विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याने १३ रुग्णांचा, जे या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेण्यासाठी व प्राण वाचविण्यासाठी दाखल झाले होते, अक्षरश: होरपळून मृत्यू झाला. या बातमीने आता सारे राज्यच नाही तर देश सुन्न, नि:शब्द झाला आहे. ही आग एसी संयंत्राचा स्फोट झाल्याने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे व या आगीत इतरही काही रुग्ण गंभीर जखमी झालेले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते आहे.

नेहमीप्रमाणे शासनाकडून घटनेच्या सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत व दोषींची गय केली जाणार नाही, कठोर शिक्षा दिली जाईल, वगैरे वगैरे जनतेला आता पुरते तोंडपाठ होऊन गेलेले हाकारे व इशारेही देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये देण्याच्या घोषणेचा सोपस्कारही पार पाडला गेला आहेच. कुठल्याही दुर्घटनेनंतर पार पाडली जाणारी ही शासकीय प्रक्रिया जशी लोकांच्या अंगवळणी पडली आहे तसेच अशा सखोल चौकशांमधून नंतर निष्पन्न काय होते? हे ही सर्वांनाच ज्ञात आहे. चार दिवसांची खळखळ, चर्चा यानंतर प्रकरण हळूहळू विसराळी पडते आणि मग यंत्रणा हे प्रकरण शक्य तेवढ्यांना वाचवून ते रफादफा करण्यासाठी कार्यतत्पर होते. आजवरची अशी सगळी प्रकरणे तपासली तरी यातील सत्यता निदर्शनास येईल. चार सांत्वनाचे शब्द, पुस्तकी शोकसंदेश, नेतेमंडळींच्या घटनास्थळास भेटीगाठी, त्यांच्या छायाचित्रांना मिळणारी ठळक प्रसिद्धी, घटनेवरून रंगणारे आरोप-प्रत्यारोप व काही काळ तापणारे राजकारण याशिवाय यापुढे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आजवर कधी काही घडल्याचे अपवादानेही दिसत नाही. फार फार तर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे फर्मान सुटते.

गंमत म्हणजे रुग्णालयांना परवानगी देतानाच्या निकषातच ज्या बाबींचा अत्यावश्यक म्हणून समावेश असेल तर मग त्या बाबींच्या पूर्ततेशिवाय रुग्णालयास परवानगी दिली कशी गेली? कुणी दिली? त्यात नित्याप्रमाणेच अर्थव्यवहार पार घडला होता का? अशा व्यवहाराचे लाभार्थी कोण? त्यांना सखोल चौकशीत शोधून काढून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा वा हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा होणार का? हे जे कळीचे प्रश्न आहेत त्यांना यंत्रणा अत्यंत चातुर्याने बगल देते. हे प्रश्न उपस्थितच केले जाणार नाहीत याची व्यवस्था यंत्रणा एकत्रितरीत्या करते. त्यातही हल्ली तर हे आणखी सोपे झाले आहे. कारण राजकारण्यांनी आपापली समर्थकांची फौज निर्माण केलेली आहे. कुठल्याही बाबीवरून ही मंडळी एकमेकांवर तुटून पडण्यासाठी टपूनच बसलेली असतात. त्यामुळे खेळ रंगतो तो तुमच्या काळात किती मेले, आमच्या काळात किती मेले? याचाच. यात मरणा-याला, त्याच्या जिवाला शून्य किंमत! त्याची गणती फक्त आकड्यात भर घालण्यासाठीच!

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु – दत्तात्रय भरणे

जर आपल्या रोमारोमात मृत्यूचे राजकारण रंगविण्याचा निर्लज्जपणा भिनला असेल व त्याबाबत आपल्याला जराशीही खंत, खेद, लाज वाटत नसेल तर मग राजकारण्यांना राजकारण करतात, हे कोणत्या तोंडाने म्हणावे? हाच खरा प्रश्न! तो या धुळवडीत सहभागी होणारे स्वत:च्या मनाला कधीच विचारत नाहीत, हेच दुर्दैव! हे होते कारण तोवर एकमेकांवर तुटून पडणा-यांच्या घरातील कुणी आई-बाप, भाऊ-बहीण, काका, मामा, मावशी, बायको अशा घटनेत हकनाक मेलेली नसते. त्यामुळे त्या वेदनांची व असहायतेची जाणीवच मनाला शिवत नाही. यंत्रणा नावाच्या व्यवस्थेने नेमके हे व्यवस्थित हेरले आहे. त्यामुळे व्यवस्था सुधारणार कधी? हा कळीचा प्रश्नच कुणी कुणाला विचारणार नाही, याची चोख व्यवस्थाच ही यंत्रणा करत असते आणि हेच या देशात सातत्याने घडले आहे. म्हणूनच देशात दररोज आरोग्यासारख्या अत्यंत कळीच्या व जनतेच्या जिवाशी निगडित असणा-या क्षेत्राची लक्तरे वेशीवर टांगलेली पाहणे जनतेच्या नशिबी आले आहे.

कोरोना महामारीने तर आपल्या आरोग्य व्यवस्थेची अब्रूच जगासमोर उघडी केलीय! एवढेच नाही तर आरोग्य क्षेत्राच्या या दुर्दशेबाबत आपले आजवरचे सर्वच तारणहार, भाग्यविधाते, विकासपुरुष, दूरदृष्टीचे नेतृत्व वगैरे वगैरे किती गांभीर्याने, कळकळीने जनतेच्या जिवाची काळजी करतात, याचे सुस्पष्ट पुरावेच मिळाले आहेत. जगभरातील तज्ज्ञ पहिल्या लाटेपासून कोरोनाची दुसरी, तिसरीही लाट येऊ शकते व ती पहिल्यापेक्षा भयंकर ठरू शकते, हे कानीकपाळी ओरडून सांगत असताना राज्यकर्ते व यंत्रणेने या धोक्याचा सामना करण्यासाठी जी प्रचंड जय्यत तयारी केली, त्याचा अनुभव राज्यातील व देशातील जनता पदोपदी घेते आहेच. त्यामुळे त्यावर पुन्हा वेगळे भाष्य करून जनतेच्या वेदना वाढविण्यात अर्थ नाहीच. मात्र, यातून आता तरी आपण देश म्हणून काही शिकणार आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला, व्यवस्थेला, व्यवस्था हाकणा-यांना व ही व्यवस्था सक्षम करण्याची, सुधरवण्याची जबाबदारी असणा-यांना विचारण्याची वेळ आली आहे.

हे घडत नाही तोवर या देशातील रुग्णालये ही जीव वाचवण्याचे ठिकाण ठरण्याऐवजी मृत्यूचे सापळे ठरण्याच्या घटना थांबणार नाहीत व अशा घटनांचे आकडे मोजत राहण्याशिवाय आपल्या हाती काहीच असणार नाही. एकट्या महाराष्ट्रात नजीकच्या काळात प्राणरक्षक रुग्णालयेच जनतेच्या मृत्यूचा सापळा बनल्याची विरारची ही नववी घटना ठरली आहे. रुग्णालयांनाच हा जो रोग जडलाय त्याचे मूळ दडलेय ते आजवर आपल्या राज्यकर्त्यांनी ज्या गांभीर्याने या क्षेत्राबाबत धोरणे राबविली त्या वृत्तीत व दृष्टीत! सार्वजनिक आरोग्य सेवा हा राजकीयदृष्ट्या आतबट्ट्याचा व फुकटचे दुखणे असल्याचा तमाम राज्यकर्त्यांचा सार्वत्रिक दृष्टिकोन हे आरोग्य व्यवस्थेच्या आजच्या अवस्थेचे मूळ कारण आहे. कर्जमाफी दिली, अनुदानाची घोषणा केली, अमूक फुकट-तमूक फुकटची आश्वासने दिली तर गठ्ठ्याने मते व त्यातून सत्ता मिळते. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केल्याने अशी मते मिळत नाहीतच. मग हा आतबट्ट्याचा धंदा काय कामाचा? हाच प्रश्न! मग तो आपल्या शिरावरून ढकलण्यासाठी किंवा टोलविण्यासाठी खाजगीकरणाचा उदो उदो!

खाजगीत गुंतवणूकच एवढी मोठी की, तिच्या वसुलीसाठी व वर धंद्यातील नफ्याच्या समीकरणासाठी येणा-या रुग्णाला आर्थिकदृष्ट्या ओरबाडून काढले जाणे अपरिहार्यच! एकदा का सेवा धंदा बनली व त्यात अर्थकारण आले की, सगळेच गैरप्रकार तिथे हजर होणे अटळच! शिवाय त्यातून होणा-या अर्थलाभाच्या लाभार्थ्यांची भक्कम व मजबूत साखळी निर्माण होणेही अटळच! मग नियम मोडणे व अर्थपूर्ण व्यवहाराची पूर्तता होऊन त्या नियम मोडण्याकडे साफ दुर्लक्ष करून ते अधिकृत केले जाणे यात आश्चर्य काय? हेच दुष्टचक्र देशातील जनतेच्या नशिबी आले आहे आणि म्हणूनच प्राणरक्षक रुग्णालये मृत्यूचे सापळे बनतायत! घटना-अपघातांवर शोक व्यक्त करताना हे दुष्टचक्र संपणार कधी व कसे? हा कळीचा प्रश्न जनतेने स्मरणात ठेवणे आवश्यक, हेच या घडीचे सत्य, हे मात्र निश्चित!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या