22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसंपादकीयवाढते अपघात रोखणार कसे?

वाढते अपघात रोखणार कसे?

एकमत ऑनलाईन

गत काही महिन्यांपासून राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही.एखाद्या अपघातात सारे कुटुंबच नाहीसे झाल्याचे दिसते तेव्हा तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त केली जाते. नंतर जगाचे, जगण्याचे रहाटगाडगे सुरूच राहते. परंतु अपघातात ज्यांचे प्राण गेले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबियांचे काय? एखादा भयानक अपघात घडला की थेट पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत शोक व्यक्त केला जातो, दोन-चार लाखांची मदत जाहीर होते.

वरचेवर माणूस असंवेदनशील होत चालल्याचे हे चित्र आहे. अपघातांचे प्रमाण वाढत जाते तेव्हा मात्र असे अपघात रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना राबविण्यात आल्याचे दिसून येत नाही. अपघात झाला की मदतीचे सोपस्कार पूर्ण करायचे आणि नंतर सारे काही विसरून जायचे हा आता प्रघातच बनला आहे. अपघातांच्या आकडेवारीच्या खेळात मूळ विषयात हात घातला जात नसल्याने अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अपघातांच्या संदर्भात महाराष्ट्र देशात पहिल्या पाच क्रमांकात आहे. ही काही अभिमानाची गोष्ट नव्हे परंतु आमच्या राज्यकर्त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. उलट ते आपली खुर्ची मजबूत ठेवण्यात मश्गुल असलेले दिसतात. राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्ते खराब असल्याने हे प्रमाण वाढले आहे का तर तसेही नाही कारण सध्या सर्वत्र समृद्धी महामार्गाचा बोलबाला आहे.

रस्ते दुहेरी, चार पदरी, सहा पदरी, आठ पदरी असे प्रशस्त झाले आहेत, होत आहेत. त्यावरून सुसाट अगदी वायुवेगाने जाता येते. मुंबई-पुणे अंतर अवघ्या अडीच तासांत कापता येते. म्हणजे अफाट प्रगती झाली आहे. कदाचित तीच गोतास काळ ठरत असावी! वाहन उद्योगाला देशात मोठी चालना मिळाली, त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणेवर आधारित वाहने बाजारात आली. ती खरेदी करण्यासाठी बँका, खासगी आणि सहकारी पतसंस्था कर्ज देण्यासाठी उत्सुक होत्याच. मात्र ही वाहने सुरळीत धावण्यासाठी रस्ते सुस्थितीत नव्हते, त्यांचे काम सुरू होते. त्यामुळेही रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले. थोडा रस्ता चांगला मिळाला की वेगाने वाहन चालवण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे अपघातांना आयते निमंत्रण मिळाले. राज्यात गतवर्षी तीस हजारांहून अधिक लहान-मोठे अपघात झाले. त्यात हजारो जणांचे जीव गेले, अनेक जण जखमी झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सतत गंभीर अपघात होत आहेत. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळता सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले होते मात्र गत सहा महिन्यांत अपघातांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे.

या महामार्गावर गत चार वर्षांत सुमारे एक हजार अपघात झाले त्यात ३७४ जणांचा बळी गेला. महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत तरीही हा महामार्ग वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा ठरत आहे. म्हणजेच रस्ते अपघाताला प्रशस्त रस्ते कारणीभूत आहेत असे नाही तर वाहनचालक अधिक जबाबदार आहेत. अतिवेग, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, हायवेवरील सूचनांचे पालन न करणे, नादुरुस्त वाहने रस्त्यात कशीही उभी करणे, अवजड वाहनांची लेन कटिंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी गोष्टी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणा-या दळणवळणाच्या वेगवान सोयी निर्माण करण्यासाठी देशभरात रस्त्यांचे जाळे विणले गेले. मात्र दुस-या बाजूला त्याच रस्त्यावर चालणारी वाहने ही अपघातग्रस्त होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली.

२०२० च्या आकडेवारीनुसार देशात रस्ते अपघातांत सुमारे १ लाख ३१ हजार लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे अपघात केवळ अत्याधुनिक महामार्गाने होतात असे नाही तर लहान-मोठ्या रस्त्यावरही होतात. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण सर्वाधिक उत्तर प्रदेशात आहे. तेथे सर्वाधिक १९ हजार मृत्यू झाले. त्यानंतर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. महाराष्ट्रात सुमारे साडेअकरा हजार लोकांचा बळी गेला. प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने होणा-या अपघातांत अनेकांचे आणि अनेकांच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. या अपघातांचे सर्वांत मोठे कारण म्हणजे अमर्याद वेग. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे अनेक अपघात झाले. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे दुचाकी वाहनचालकांचे झाले. त्यांचे प्रमाण सुमारे ४४ टक्के आहे. चुकीच्या बाजूने चालणा-या पादचा-यांचे मृत्यूचे प्रमाण १८ टक्के आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे घट झाल्याचे दिसून आले मात्र २०१९ व २०२० मध्ये महामार्गावरील अपघातांत १५ हजारपेक्षा अधिक पादचारी आणि सुमारे तीन हजार सायकलस्वार मृत्युमुखी पडले. महामार्गालगतच्या गावांमध्ये अपघात टाळण्यासाठी संरक्षक कठडे आहेत मात्र अनेकदा शहरातून जाणा-या महामार्गावर वाहने अनियंत्रित झाल्याने पादचा-यांना प्राण गमवावे लागतात. बैलगाडी आणि सायकल रिक्षा यांचे प्रमाणही साडेपाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

कार, टॅक्सी यांचे प्रमाण १४ टक्के तर मोठ्या ट्रक्सच्या अपघातांचे प्रमाण साडेसात टक्के आहे. बस आणि इतर वाहनांचे प्रमाण सुमारे ५ टक्के आहे. अपघात आणि वय यांचाही जवळचा संबंध दिसतो. २५ ते ३५ वयोगटातील वाहनचालकांकडून सर्वाधिक म्हणजे २६ टक्के अपघात झाले आहेत. १८ ते २५ वयोगटाकडून २२ टक्के अपघात घडले. १० टक्के अपघात हे महिला वाहनचालकांकडून घडले आहेत. संध्याकाळी ६ ते ९ या काळात सर्वाधिक अपघात घडल्याचे दिसून आले आहेत. रात्री १२ ते पहाटे ६ दरम्यान अपघातांचे प्रमाण कमी आहे. गावक-यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी पर्यायी रस्त्याची सोय असते परंतु ब-याच वेळा त्याचा वापर टाळला जातो. सायंकाळच्या सुमारास पादचा-यांच्या अपघाताची शक्यता अधिक असते. म्हणून महामार्गालगतच्या गावक-यांनी खबरदारी घ्यायला हवी. रहदारीचे नियम पादचा-यांनीही पाळले पाहिजेत. अनेकवेळा अपघाताला वाहनचालकच कारणीभूत असतात असे नाही. खरे तर रस्ते अपघात हा मानवी चुकांचा परिणाम आहे. वाहन चालवताना शरीर आणि मन हे सजग ठेवले तर निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या