29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home संपादकीय मी पुन्हा येईन...!

मी पुन्हा येईन…!

एकमत ऑनलाईन

कोरोना विषाणू मानवाची पाठ सोडायला तयार नाही. जगभरात त्याचा हैदोस सुरूच आहे. त्याला अटकाव करण्यासाठी जगभर शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. विविध लसींची निर्मिती करण्यात आली आणि विस्तृत प्रमाणात लसीकरणही सुरू झाले. पण जणू काही अमरपट्टा घेऊन आल्याच्या तो-यात तो हार मानावयास तयार नाही. ‘तो मी नव्हेच’ या नाटकात लखोबा लोखंडे या बदमाशाने विविध रूपे घेऊन जसा उच्छाद मांडला होता त्याचीच पुनरावृत्ती कोरोना विषाणू साकार करतोय. कोरोना विषाणूला राजकीय इंगळी डसली आहे असे दिसते, कारण त्याने ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला आहे! लोकांना ही महामारी कधी एकदा जाईल असे वाटते परंतु त्याला माणसाचा पिच्छा सोडवेनासा झालाय. दक्षिणेकडील राज्यांत हा विषाणू ‘एन ४४० के’ या रूपात वेगाने पसरतोय म्हणे. त्यामुळे या विषाणूवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे. जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूमध्ये सातत्याने बदल होत असल्याने वैज्ञानिकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

जगभरात विषाणूच्या अनेक स्वरूपांची ओळख पटली आहे. पण त्यांचे जास्त प्रमाण भारतात तरी आढळले नाही. कदाचित विषाणूच्या जनुकीय अनुक्रमणामध्ये पुरेसे बदल झाले नसल्यामुळे असे घडले असावे. दक्षिणेकडील राज्यांत विषाणूच्या ‘एन ४४० के’ स्वरूपाच्या वेगाने प्रसार होत असल्याचे पुरावे सापडल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या नव्या स्वरूपाच्या प्रसाराची स्थिती समजून घेण्यासाठी त्यावर बारीक नजर ठेवावी लागणार आहे. स्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच नवीन स्वरूपाचा शोध घेण्याची गरज आहे. कोरोना विरोधातील लढाईत लस अत्यंत उपयुक्त ठरत आहे पण मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे यांसारख्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. इतर देशांप्रमाणे आपल्याकडे कोरोनाचे नवे घातक स्वरूप आढळले नसले तरी या दिशेने आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. कोरोना नियमांची शिस्त मोडून चालणार नाही. महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोके वर काढण्याच्या प्रयत्नात आहे.पाश्चिमात्त्य देशांतही पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळावा लागेल. कोरोनाविरुद्धचे युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही त्यामुळे मास्क हीच ढाल वापरून लढायचे आहे.

लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क ‘मस्ट’ आहे. कोरोनाची लाट राज्यात आली की नाही हे राज्यकर्त्यांनाच माहित नाही. त्यामुळे ते ८-१५ दिवस त्या संबंधीचा कानोसा घेणार आहेत. पर्यायाने जनतेला काही बंधनांना सामोरे जावे लागणार आहे. सोमवारपासून सर्व राजकीय, सामाजिक,धार्मिक मिरवणुका, मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे. जनतेला मास्क घालणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी करव्याच लागतील. लॉकडाऊन नको असेल तर या गोष्टी पाळाव्याच लागतील. येत्या ८-१० दिवसात परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली होती. ही मोहीम यशस्वी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांनी ‘मी जबाबदार’ही मोहीम हाती घेतली आहे. राज्यात अनलॉकचा निर्णय घेतल्यानंतर मागील आठवड्यापासून अचानक कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय प्रशासनाला दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे, नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात निर्बंध आणखी वाढवण्यात आले आहेत. कोरोना नव्याने सक्रीय झाल्यानंतर विदर्भात रुग्णवाढीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

पुण्यात २८ फेबु्रवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. हे निर्बंध प्राथमिक पातळीवर असून रुग्णसंख्या वाढत राहिल्यास त्यावर पुनर्विचार केला जाईल. महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ता वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदलण्याची गरज आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे.त्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे. राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. आरोग्य व आघाडीच्या कर्मचा-यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे आता आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे. पाश्चात्य देशांप्रमाणे राज्यातही निर्बंध पाळण्याबाबत शिथिलता आल्याने कोरोना विषाणूला डोके वर काढण्याची संधी मिळाली असावी.

ब्रिटन, कुवैत, दुबई, ब्राझीलमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात हे टाळायचे असेल तर मास्कचा वापर आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. काही पाश्चिमात्य देशात गत दीड महिन्यापासून तर ब्रिटनमध्ये वर्षभरापासून लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात संपर्काची साखळी तोडणे हाच कोरोनावरचा उपाय आहे. त्यासाठी जनतेला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. राजकीय क्षेत्रात ‘मी पुन्हा येईन’ अशी आरोळी ठोकणा-यांचा राज्य-सरकारने बंदोबस्त केला आहे. आता अशीच आरोळी ठोकणा-या कोरोनाचाही बंदोबस्त करावा लागेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या