29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसंपादकीयटाळेबंदी टाळायची तर...!

टाळेबंदी टाळायची तर…!

एकमत ऑनलाईन

साधारणपणे मार्च महिन्याच्या मध्यात टाळेबंदीला भाग पाडू नका..असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. गत ऑक्टोबरमध्ये राज्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सुमारे चार महिने संसर्ग रोखला गेल्याचे दिसून आले परंतु नंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. आरोग्यविषयक नियम धाब्यावर बसवले गेल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. कोरोना हद्दपार झाला असे समजून सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाल्याने संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. केवळ देशात, राज्यातच असे घडले नाही तर बाहेरदेशातही हेच घडले. ब्राझीलमध्ये तर भयानक स्थिती निर्माण झाली. राज्यात पुन्हा भयानक स्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

भविष्यातही आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून त्यानुसार जीवनपद्धती अवलंबावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक आहे याचे भान सर्वांनाच ठेवावे लागेल. गतवर्षी झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळून आला होता. यावेळी मात्र तो मोठ्या इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. लहान-मोठ्या शहरांची हीच कथा आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाची बेफिकीर कृती. हीच वृत्ती सर्वसामान्यातही दिसून येत आहे. शेजारच्या जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत याची माहिती असूनसुद्धा आमची बेफिकिरी काही जात नाही. जिल्हाधिका-यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून काही निर्बंध लागू केले की ते कसे मोडले जातील हेच आम्ही पाहतो. ऑटोरिक्षामध्ये चालकासह दोन प्रवासी असा नियम लागू केला की पोलिसांसमोर दोन प्रवासी दाखवायचे आणि पुढे गेल्यानंतर आणखी दोन प्रवासी कोंबायचे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील लॉकडाऊनसंबंधी चर्चा सुरू झाली की हाच रिक्षेवाला सरकारवर तावातावाने बोलू लागतो. सरकारला टाळेबंदी लावायला काय जाते? हातावर पोट असणा-यांनी जगायचे कसे? असा रोष व्यक्त करू लागतो. आपला राग व्यक्त करताना त्याच्या तोंडावर मास्क नसतो. म्हणजेच काय तर माणसाला आपल्या हक्काची जाण असते. मात्र, आपल्या कर्तव्याची जाणीव अजिबात नसते. राज्यात कुठेही जा तुम्हाला हेच चित्र दिसेल. जिल्हाधिका-यांनी हॉटेल्स, चहाटप-या, पानटप-या बंद केल्या की ठोक व्यापा-यांना भाववाढीचे कुरण मिळालेच! मानवी वृत्तीच अशी की निर्बंधातही अनिर्बंधता शोधायची! अजूनही परिस्थिती काही मोठी शहरे वगळता आपल्या हातात आहे. नियमांचे पालन नीट व काटेकोरपणे केले पाहिजे. काही नियम न पाळणा-यांमुळे धोका वाढतो आहे. सरकारने अर्थचक्र सुरू केले आहे. सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येऊ शकतो आणि टाळेबंदीही रोखता येऊ शकते. सध्या तरी तसे दिसत नाही. कारण राज्यात रुग्णसंख्येत दररोज झपाट्याने वाढ होत चालली आहे.

खाद्यतेल का महागले?

या वाढीमुळे खाटा व इतर आरोग्य सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. स्थिती अशीच राहिली तर मृत्यूसंख्याही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मर्यादित काळासाठी का होईना टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध लादण्यासाठी सरकारचे नियोजन सुरू आहे. राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर असून विविध योजना आखूनही अद्याप ती आटोक्यात आली नाही. २९ मार्च रोजी राज्यात ३१,६४३ नवे रुग्ण आढळून आले असून १०२ जणांचा मृत्यू झाला. सुमारे २१ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन नियोजनाचे निर्देश दिले असले तरी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर द्यावा असेही ते म्हणाले. यावरून लॉकडाऊनच्या मुद्यावर सरकारमध्येच विसंवाद असल्याचे दिसून येते.

आरोग्यसेवा वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नियम पाळल्यास कोरोनाचा प्रसार टाळता येईल असे नवाब मलिक म्हणाले; परंतु लोक नियम पाळत नसतील तर काय करावे ते मात्र त्यांनी सांगितले नाही. भाजपने देखील टाळेबंदीला विरोध केला आहे परंतु पंतप्रधान मोदींनी ज्यावेळी टाळेबंदीची घोषणा केली होती त्यावेळी त्या निर्णयाला समर्थन दिले होते… आपला तो बाळ्या अन् दुस-याचं ते कारटं! महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा उद्योगसमूहाचे आनंद महिंद्रा यांनी सरकारला सल्ला देताना म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजकांना सर्वाधिक फटका बसतो. लॉकडाऊन मूलत: रुग्णालये, आरोग्य सुविधा उभारणीसाठी होते. आता आरोग्यसेवा उभारणीवर आणि मृत्युदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

लॉकडाऊनचा परिणाम गरिबांवर होत असल्याने आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास त्यात आणखी भर पडेल. तेव्हा मूळ प्रश्नावर लक्ष केंद्रित करा. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि नागरिकांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यावर विविध स्तरांतून सूचना येत आहेत. क्रिकेटपटू हरभजन सिंगने एक ट्विट केले असून तो म्हणतो, लोक ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा आणि कसा हा मुद्दा गांभीर्याने घेणार ते कळत नाही. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याबद्दल हरभजनने संताप व्यक्त केला आहे. नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, इरफान पठाण, एस. बद्रीनाथ यांनाही कोरोनाने घेरले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी दिली. सिने अभिनेता आमिर खान, आर. माधवन, मिलिंद सोमण पाठोपाठ ‘दंगल’गर्ल फातिमा सना शेख कोरोनाबाधित झाली आहे. त्याआधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांनाही कोरोनाचा प्रसाद मिळाला आहे. आतापर्यंत जगभरात सुमारे १३ कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ७ कोटी २० लाख लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. सुमारे २ कोटी ८ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात गत २४ तासांत सुमारे ५६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली तर २७१ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ६ कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी किमान १४ दिवसांची टाळेबंदी आवश्यक असते. टाळेबंदी टाळायची तर लोकांनी आरोग्यविषयक नियम पाळलेच पाहिजेत.टाळेबंदी लादायची असेल तर सरकारने सामान्य व गरीब परिवाराला रोख २० हजार रु. द्यावेत असे मनसेने म्हटले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या