23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसंपादकीयमी पुन्हा येईन!

मी पुन्हा येईन!

एकमत ऑनलाईन

नाही.. शीर्षकाचा कुठल्याही राजकीय आरोळीशी अजिबात संबंध नाही! ही आरोळी ठोकणा-या राजकीय प्रतिस्पर्ध्याला महाराष्ट्रातील तीन राजकीय पक्षांनी एकत्र येत स्वप्नवत वाटणा-या महाविकास आघाडीच्या प्रयोगाने पुरते चितपट केले व त्याला आता तब्बल अडीच वर्षांचा काळ उलटून गेल्याने ही स्वप्नवत वाटणारी बाब ढळढळीत वास्तव बनून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या ताकदवान मानल्या जाणा-या नेत्यांची झोप उडवून टाकणारी ठरली आहे. असो! तथापि, या शीर्षकाचा कुठल्या राजकीय पक्ष वा त्याच्या नेत्याशी संबंध नाही तर ही आरोळी मागची दोन वर्षे देशाचेच नव्हे तर जगाचे जगणे हराम करून टाकणारा कोरोना विषाणू पुन्हा एकवार देतो आहे.

देशातली तिसरी लाट तुलनेने पहिल्या दोन लाटांपेक्षा कमी तीव्रतेची तसेच कमी नुकसान करणारी आणि अल्पकाळाची ठरली. त्यामुळे देशाने समाधानाचा श्वास घेतला होता व देशातील राजकीय नेत्यांनाही ‘आम्ही कोरोनास रोखले’ असे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची संधीही मिळाली होती. दोन लाटांच्या तडाख्याने शहाणपण आलेल्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत निर्माण झालेली जागरूकता हे कारण तिसरी लाट सौम्य ठरण्याच्या कारणात सर्वांत जास्त पटणारे वैज्ञानिक कारण असायला हरकत नसावी. असो! मात्र, तिसरी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाल्यावर जसे देशातील नागरिक बिनधास्त झाले तसेच सरकार व प्रशासन यंत्रणाही बिनधास्त झाली. ‘कोरोना कायमचा संपला’ असेच काहीसे चित्र देशात निर्माण झालेले आहे. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष, मुखपट्टीचा वापर व सोशल डिस्टन्सिंगबाबतची बेफिकिरी वाढली. ती केवळ नागरिकांच्याच नव्हे तर सरकार व प्रशासनाच्या पातळीवरही ठळकपणे दिसते आहे. बूस्टर डोसबाबत तो आवश्यक की अनावश्यक? इथपासून कधी व कोणाला द्यायचा? इथपर्यंत पुन्हा घोळ घालण्यात आला! आणि या अनुकूल स्थितीची संधी साधत दडून बसलेल्या कोरोना विषाणूने आता ‘मी पुन्हा येईन’ची आरोळी ठोकली आहे. देशासह जगभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूचा जन्मदाता ठरलेल्या चीनमध्ये राजधानी शांघायसह अनेक प्रमुख शहरांत पुन्हा कडकडीत टाळेबंदी लावण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत.

चीनने जगात सर्वांत अगोदर कोरोनावरील लस विकसित केल्याचा दावा केला व लसीकरणात आघाडी घेतल्याच्या फुशारक्याही मारल्या ख-या पण प्रत्यक्ष त्यात किती दम आहे हेच आता त्या देशातील सध्याच्या स्थितीतून स्पष्ट होते आहे. भारतातही राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या महानगरांतील कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा उचल खाल्ली आहे. १९ व २० एप्रिल या दोन दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक दुपटीने वाढ झाल्याचे पहायला मिळाले. राजधानीतील रुग्णसंख्येतील वाढ हा देशासाठी धोक्याचा इशारा ठरतो, याचा अनुभव देशाने यापूर्वीच्या लाटांमध्ये घेतलेलाच आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतील या वाढीकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाहीच. भारतासारख्या देशात कोरोनाचे संकट हे निव्वळ आरोग्य संकट ठरत नाही तर ते सामाजिक व आर्थिक संकटही ठरते. शासन-प्रशासनाचे बंद-निर्बंधांवर असणारे अलोट प्रेम आणि त्यांनी बंद-निर्बंध हाच कोरोनावरचा एकमेव ‘अक्सीर इलाज’ ही निश्चित केलेली कार्यपद्धती यामुळे देशाच्या अर्थकारणाची व समाजकारणाची कशी वाट लागते याचा पुरेपूर अनुभव देश दोन वर्षांपासून घेतोच आहे. कोरोनाचे साईड इफेक्ट्स हे प्रत्यक्ष कोरोनाच्या आरोग्य संकटापेक्षा महाभयंकर ठरले आहेत.

त्यामुळे एकवेळ कोरोना झाला तरी चालेल पण तो रोखण्याच्या नावावरचा सरकार-प्रशासनाचा बंद-निर्बंधांचा खेळ नको, अशीच भारतातील सर्वसामान्य, गोरगरीब व कष्टकरी जनतेची दृढ भावना झाली आहे. कोरोनाच्या तडाख्यातून मागच्या दोन वर्षांत कुठलेही क्षेत्र व त्यात काम करणारी व्यक्ती सुटलेली नाही. अपवाद फक्त राजकीय क्षेत्राचा व प्रशासनात कार्यरत लोकांचा! त्यांच्यासाठी तशीही देशात कायम सुगीच असते. कोरोनासारखे संकट तर त्यांच्यासाठी बंपर लॉटरीच! असे लॉटरीचे तिकिट विनासायास हाती आल्यावर ते नाकारणारा व्यवहार्यदृष्ट्या कर्मदरिद्री व कपाळकरंटाच! असो!! मूळ मुद्दा हा की, देशातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकवार उसळी घेते आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे सामान्य माणसांना सगळ्याच अंगाने परवडणारे नाही. कारण आताशा आपली मागच्या दोन वर्षांत रसातळाला गेलेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची धडपड सुरू झालेली आहे. त्यातच कोरोना विषाणूने ‘मी पुन्हा येतोय’चा दिलेला इशारा हा सामान्यांना धडकी भरवणारा आहे.

जगातील तमाम तज्ज्ञ व वैज्ञानिक, संशोधक एका सूरात हेच सांगतायत की, कोरोनाचे समूळ उच्चाटन इतक्यात अशक्यच. तो वेगवेगळी रूपे धारण करत वारंवार मानवजातीवर हल्ले चढवत राहणारच! त्यामुळे सतर्कता बाळगणे व प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करत राहणे, लसीकरणाचा वेग वाढवत ते पूर्ण करणे, हाच शाश्वत उपाय! या उपायाने जीवितहानी तर कमी होईलच पण त्यासोबत कोरोना लाटेचा साईड इफेक्ट म्हणून होणारी सामाजिक-आर्थिक हानी टाळता येईल. भारताला व भारतातील सर्वसामान्यांना आता कोरोनाच्या अनुषंगाने येणारे बंद-निर्बंधांचे सत्र अजिबात परवडणारे नाही. अगोदरच बंद-निर्बंधांनी सर्वच क्षेत्रांचे एवढे प्रचंड नुकसान केलेले आहे की, आता नुसत्या बंद-निर्बंधांच्या धास्तीनेही देशातील अनेक क्षेत्रे कायमची कोलमडून पडू शकतात. हा धोका टाळायचा तर सामान्यांनाच शहाणपणाची कास धरावी लागेल. स्वयंशिस्त हाच घोंघावणारे हे संकट थोपविण्याचा खात्रीशीर उपाय आहे. दिल्ली व मुंबईतील वाढता संसर्ग इतरत्र पसरायला फारसा वेळ लागत नाही, याचा देशाने अनुभव घेतलेलाच आहे.

विशेष म्हणजे अशी स्थिती निर्माण झाल्यावर छोटी शहरे व ग्रामीण भागातील जनता ही आरोग्य सुविधांपासून पूर्णपणे वंचितच राहते. देशाने कोरोनाच्या दोन लाटा पचविल्यानंतरही ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये फार मोठ्या सुधारणा झाल्या आहेत, असे अजिबात नाही. सरकार याबाबतची आकडेवारी सांगून पाठ थोपटून घेत असले तरी त्यात प्रचारकी थाट किती व वास्तव काय? हे देशाला वेगळे सांगण्याची गरजच नाही कारण जनता रोजच त्याचा अनुभव घेते आहे. ‘मी पुन्हा येईन’च्या राजकीय आरोळीचा राजकीय बंदोबस्त करता येऊ शकतो पण कोरोनाच्या अशा आरोळीचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा व राज्यकर्ते नापासच झालेले आहेत. तेव्हा त्यावर भिस्त ठेवून फसगत करून घेण्यापेक्षा वेळीच सावधगिरी बाळगणे कधीही शहाणपणाचे ही खूणगाठ आता तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना पक्की करावी लागेल. तेच आपल्या सगळ्यांच्या हिताचे ठरेल, हे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या