23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeसंपादकीयअटळ गच्छंती!

अटळ गच्छंती!

एकमत ऑनलाईन

भाजपला दक्षिणेत जनाधार मिळवून देत सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचविणारे व सत्तेच्या वर्तुळात रुजवणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक! या राज्यात भाजप रुजविण्याची किमया एकहाती करून दाखविणारा नेता म्हणजे येडियुरप्पा! ते भाजपचे नेते आहेत म्हणून लौकिकार्थाने त्यांचा पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडला जात असला तरी भाजपच्या हिंदुत्वासह कुठल्याही अजेंड्याचा आधार येडियुरप्पा यांना कर्नाटकात स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करताना घ्यावा लागला नाही हेच त्यांच्या स्वयंभू नेतेपदाचे लक्षण! त्यामुळे वाजपेयी-अडवाणी यांच्या काळातील राममंदिर आंदोलनापासूनही ते पक्षाच्या या राष्ट्रीय अजेंड्याचा आधार न घेताही राज्यातील आपले राजकारण व सत्ताकारणही स्वबळावर निर्धोक पार पाडत राहिले.

तीन वेळा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही ते पुन्हा चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले व त्यासाठी त्यांनी राज्यात जे ‘ऑपरेशन लोटस’ राबविले त्यासाठीही त्यांना केंद्रीय नेतृत्वाची मदत घ्यावी लागली नाही, हाच त्यांच्या स्वयंभूपणाचा पुरावा! मोदी-शहा या जोडीलाही त्यांचे हे राज्याच्या राजकारणावरील वर्चस्व मान्यच करावे लागले म्हणूनच वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्यांनी सत्तेचे पद घेऊ नये, या पक्षाच्या नियमाला अपवाद मान्य करून या जोडीला येडियुरप्पा यांचे चौथ्यांदा राज्याचा मुख्यमंत्री होणे मान्य करावे लागले! येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले व त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले तरी त्याचा त्यांच्या राज्यातील राजकारणावर अजिबात परिणाम झाला नाही की, पक्षातील स्थानावरही परिणाम झाला नाही. ‘पार्टी विथ डिफरन्स’चे बिरूद मिरवणा-या भाजपला त्यांच्यावरील आरोपांकडे दुर्लक्ष करून राज्यात त्यांचेच नेतृत्व मान्य करणे भाग पडावे, ही बाबच येडियुरप्पांचे राज्यावरील वर्चस्व व पकड सिद्ध करणारी आहे.

अशा या येडियुरप्पांनी स्वबळावर कर्नाटकात जेडीयू व काँग्रेस आघाडी सरकार या पक्षाचेच आमदार फोडून सत्तेवरून खाली खेचले व स्वत:ची सत्ता स्थापन केली. एवढेच नाही तर विरोधी पक्षातील आमदारांना अनुपस्थित रहायला लावून आपले बहुमत सिद्ध केले. या आमदारांना भाजपची उमेदवारी देऊन निवडूनही आणले आणि त्यांना मंत्रीही केले. मात्र, तरीही त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असतानाच्या समारंभातच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला! मात्र, हा राजीनामा देताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले तरी त्यांनी मोदी-शहा यांचे आभार मानत आपण केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले. येडियुरप्पांनी केंद्रीय नेतृत्वाची दिल्लीत जाऊन भेट घेतल्यावरच त्यांचे राजीनामा देणे जसे अटळ मानले जात होते तसेच त्यांचा यासाठी केंद्रीय नेतृत्वाबरोबर समझोता झाल्याचेही स्पष्ट होते. राज्यात खांदेपालट अटळ आहे, हे येडियुरप्पांच्या गळी उतरवण्यात केंद्रीय नेतृत्व यशस्वी ठरले व स्वत: येडियुरप्पांनीही वास्तव परिस्थिती मान्य केली, असाच काय तो याचा अर्थ!

राज्यातील भाजपमध्ये निर्माण झालेली दुफळी, स्वपक्षियांचा असंतोष व येडियुरप्पांच्या धाकट्या मुलाने, बी. वाय. विजयेंद्र यांनी, सत्ताबा केंद्र निर्माण करून केलेले प्रचंड प्रताप यामुळे राज्यात येडियुरप्पांची सत्ता टिकणे आणि त्यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा सत्ता प्राप्त करणे अवघड असल्याचे भाजपने व स्वत: येडियुरप्पांनीही मान्य केल्यानेच ही खांदेपालट झाली असल्याचे सुस्पष्ट आहे. याचाच अर्थ असा की, ही अटळ बनलेली गच्छंती होती, जी भाजप नेतृत्व व येडियुरप्पांनीही मान्य केली आहे. सत्य हेच की, भलेही येडियुरप्पा यांनी स्वबळावर ‘ऑपरेशन लोटस’ राबवून राज्यात भाजपला सत्ता मिळवून दिली असली तरी त्यांच्या कार्यपद्धतीवर स्वपक्षीय आमदारच प्रचंड नाराज झाल्याने ते आपल्या या चौथ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अप्रिय बनले. एवढे की, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेऊन ते आमच्या खात्यात हस्तक्षेप करत असल्याची थेट तक्रार केली.

दिल्लीत येडियुरप्पा व त्यांच्या पुत्राच्या कारभाराची तक्रार गेली नाही, असा एक आठवडाही अपवादाने गेला नाही. स्वत: येडियुरप्पाही आपल्या चिरंजीवांचे सत्ताबा निर्माण झालेले केंद्र अमान्य करू शकले नाहीत. माझ्या वयामुळे मला आता काम झेपत नाही म्हणून माझा मुलगा मला कामात मदत करतो, या शब्दांत त्यांनी मुलाच्या सत्ताबा केंद्राची कबुली दिली. थोडक्यात पुत्रप्रेमानेच येडियुरप्पांचा या टर्ममध्ये घात केलाय व तो त्यांनी मनातून मान्य केलाय म्हणूनच मुख्यमंत्रिपद सोडले आहे., हे स्पष्टच! मात्र, तेवढ्याने या राज्यात भाजपचे सगळे काही अलबेल होईल, असे मात्र अजिबात नाही. येडियुरप्पांनी जरी मुख्यमंत्रिपद सोडले असले तरी ना त्यांचा राज्यातील राजकारणावरचा प्रभाव कमी होणार आहे, ना वर्चस्व! ते आपल्या मर्जीतील व्यक्तीलाच मुख्यमंत्रिपदावर बसविण्याचा प्रयत्न करणार, हे सुस्पष्ट आहे.

अशा वेळी मुख्यमंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसलेले राज्यातील जे इतर स्वपक्षीय नेते आहेत, ते गप्प बसणार का? हा प्रश्नच! कारण या नेत्यांना केंद्रीय नेतृत्वानेच मौन धारण करत येडियुरप्पांच्या विरोधात अप्रत्यक्ष बळच दिले आहे. शिवाय ज्या लिंगायत समाजावर येडियुरप्पांचे वर्चस्व आहे, त्याच समाजाचे हे नेते असल्याने त्यांना डावलणेही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी सोपे निश्चितच नाही. त्यामुळे राज्यातील गोंधळ नव्या नेत्याच्या निवडीनेही कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता जास्त! अशावेळी आता केंद्रीय नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे. केंद्रीय नेतृत्व भलेही यावेळी येडियुरप्पांचे पंख छाटण्यात यशस्वी ठरलेले असले तरी राज्यात त्यांच्या तोडीचे सर्वमान्य नेतृत्व भाजपकडे सध्याच्या घडीला नाही, हेच सत्य आहे व भाजपला असे नेतृत्व तयार करण्यात अपयश आलेले आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे दक्षिणेत हाती असलेल्या या एकमेव राज्यात भाजपचे भविष्य काय? हा प्रश्न येडियुरप्पांचे भविष्य काय? या प्रश्नापेक्षा जास्त महत्त्वाचा व गंभीर ठरतो! त्यावर भाजपचे नेतृत्व कोणता उपाय काढणार? यावरच राज्यातील पक्षाचे भवितव्य ठरणार आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे कर्नाटकमधील राजकीय स्थिती पुन्हा एकदा प्रचंड अस्थिर बनलेली आहे, हे मात्र निश्चित! एक तर कोरोनाने राज्यातील जनतेचे प्रचंड हाल केले आहेत. राज्यातील भाजप सरकार याबाबतच्या उपाययोजनांबाबत सर्वच अंगांनी व सर्वच पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यातच नुकताच महापुराने या राज्याला प्रचंड दणका दिला आहे. संकटात सापडलेल्या राज्यातील जनतेला सध्या सरकारच्या मदतीची प्रचंड गरज आहे. अशावेळी जर राज्यात राजकीय गोंधळ माजला तर संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात कोण देणार? हाच यक्ष प्रश्न! त्याचे उत्तर देण्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वास काहीएक रस आहे, हे त्यांच्या सध्याच्या वर्तनातून अजिबात दिसत नाही. त्यामुळे या राज्यात ‘राजकारण जोमात, जनता कोमात’, हीच दुर्दैवी स्थिती आहे, हे मात्र निश्चित!

पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या