37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeसंपादकीयमागचा धडा नाही का पुरा?

मागचा धडा नाही का पुरा?

एकमत ऑनलाईन

अवघ्या काही दिवसांपूर्वी देशातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय घटत असल्याचे व कोरोनाने मरण पावणा-या रुग्णांचे प्रमाणही घटल्याचे सुखद वृत्त आले होते. मात्र, कोरोना अद्याप हद्दपार झालेला नाहीच याची जाणीव करून देणारी विदर्भातील नव्या रुग्णांच्या आकडेवारीची किनार त्याला होतीच. त्यामुळे कोरोनाला पराभूत करायचे तर या लढाईचा निकराचा टप्पा अत्यंत शिस्तीने, संयमाने व धैर्याने लढावा लागेल अन्यथा सगळे मुसळ केरात जाण्याची परिस्थिती उद्भवू शकते, हे आम्ही याच ठिकाणी नमूद केले होते. दुर्दैवाने कोरोनाची साथ ज्या वेगाने पसरली त्यापेक्षाही जास्त वेगाने आपण कोरोनाला पराभूत केल्याचा गैरसमज पसरला आणि मागचा धडा लक्षात न ठेवता मनमुराद वर्तन सुरू झाले. त्याच्याच परिणामी कोरोनाचा विळखा सैल झाल्याची दिलासादायक बातमी अल्पजीवीच ठरली. इनमीन दोन आठवड्यांची विश्रांती घेतलेल्या कोरोनाने पूर्ण ताजेतवाने होत राज्यात पुन्हा जोरदार कमबॅक केले आहे आणि ‘कोरोना रिटर्नस्’चा हा शो एवढा हाऊसफुल आहे की, त्याने राज्याच्या उरात प्रचंड धडकी भरवली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरलेल्या चित्रपटांचे सिक्वल म्हणजे दुसरे, तिसरे, चौथे भाग काढण्याचा ट्रेंड आला आहे. बहुधा कोरोनालाही हा ट्रेंड आवडला असावा त्यामुळे त्यानेही आपल्या धुमाकुळाचा पुढचा भाग सुरू केला आहे. खरे तर हे अनपेक्षित वगैरे अजिबात नाहीच कारण मागच्या वर्षभरापासून जगभरातील आरोग्य तज्ज्ञ, संशोधक, वैज्ञानिक कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते व ती पहिल्या लाटेपेक्षा तीव्र, जास्त नुकसानदायक व गंभीर परिस्थिती निर्माण करणारी ठरेल असे इशारे वारंवार देतायत. मात्र, मनमानी वागणे, शिस्त न पाळणे म्हणजे स्वातंत्र्य अशी नवी व्याख्या जगभरातील प्रगल्भ, विचारी मानल्या जाणा-या समाजात रुजल्याने की काय, तज्ज्ञांचे इशारे जनता अजिबात गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याचेच चित्र पहायला मिळते आहे. त्याच्या परिणामी प्रगत मानल्या जाणा-या युरोपात, अमेरिकेत ‘कोरोना रिटर्नस्’ने पहिल्यापेक्षा जास्त धुमाकूळ घातला आहे. खरे तर उर्वरित जगातील शहाण्या माणसांनी ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ची उक्ती लक्षात ठेवून या धोक्यापासून वेळीच सावध व्हायला हवे. मात्र, पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाची हौस व सवय काही केल्या आपल्याला सोडवत नाहीच.

त्यातून राज्यात व देशात ‘कोरोना रिटर्नस्’चे शो आता धडाक्यात सुरू झाले आहेत. ही कोरोनाची दुसरी लाट आहे का? कोरोनाच्या विषाणूने नवा अवतार धारण केला आहे का? याबाबत अद्याप निश्चित वा ठोस निष्कर्ष प्राप्त झालेले नसले तरी आरोग्य तज्ज्ञ व सरकार, प्रशासन दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवित आहेत. राज्यात बुधवारी २४ तासांच्या कालावधीत ४,७८७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे साहजिकच धडकी निर्माण झाली आहे आणि नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालेल्या सरकार, प्रशासनाने त्यांच्या अत्यंत प्रिय अशा बंद-निर्बंध, कडक कारवाई, दंड वसुली वगैरेचे अस्त्र उगारले आहे. खरे म्हणजे या बंद-निर्बंधांच्या आवडत्या अस्त्राचा आकलनशून्य मुक्त वापर करून सरकार व प्रशासनाने ‘क्या पाया? क्या खोया?’ हे जगजाहीरच आहे. पैसे खर्चायची वेळ आली की, सरकारला कोरोनाने कोरड्या पडलेल्या तिजोरीची चटकन आठवण येते आणि त्याबाबत उमाळ्यावर उमाळेही येतात. मात्र, वर्षभराच्या पुरेपूर अनुभवानंतरही दुस-या लाटेचा सामना करताना सरकार कोणता मार्ग निवडणार तर बंद-निर्बंधाचा!

गडकिल्ले जोपासा!

लॉकडाऊन कोरोनावरचा उपचार नाही आणि उपायही नाही, हे ठळकपणे अधोरेखित होऊनही सरकारला देशाला आरोग्य कल्लोळाबरोबरच अर्थकल्लोळातही लोटणारा हा मार्ग एवढा ‘परमप्रिय’ का आहे? हे न सुटणारे कोडेच! लोक शिस्त पाळत नाहीत, प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करत नाहीत हा सरकारचा आक्षेप काही प्रमाणात नक्कीच खरा आहे हे मान्यच. मात्र, बहुतांश नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवले म्हणूनच कोरोना देशात व राज्यातही अटोक्यात आला, हे सत्य सरकारला नाकारता येणार नाहीच. सरकार हे सत्य नाकारून सगळे खापर जनतेच्याच माथी फोडून आपली जबाबदारी झटकण्यासाठी पुन्हा बंद-निर्बंधांचाच सोयीस्कर मार्ग निवडणार असेल तर ते जनतेचे दुर्दैवच आहे. शिवाय सरकारचे हे वर्तन शिस्त पाळणा-या, जबाबदारीने वागणा-या जनतेचा अवमानच आहे. जनतेने स्वयंशिस्त पाळली पाहिजे, प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन केले पाहिजे, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे हे मान्यच! त्यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही.

मात्र, प्रचंड लोकसंख्या व गर्दी असलेल्या राज्यातील शहर व महानगरात ज्या व्यवस्था सध्या उपलब्ध आहेत त्यात जगताना सर्वसामान्य माणसाला इच्छा असूनही या प्रतिबंधात्मक उपायांचे तंतोतंत व काटेकोर पालन करणे शक्य आहे का? याचा विचार सरकारने सर्वसामान्यांवर खापर फोडताना प्रामाणिकपणे करावा. कोरोनाचे संकट आल्यावर सोशल डिस्टन्सिंग आवश्यक बनले. त्याचे पालन जनतेला करता यावे म्हणून मागच्या वर्षभरात सरकारने कोणत्या सुविधा वाढवल्या? सार्वजनिक वाहतूक क्षमता दुप्पट केली? बसच्या, रेल्वेच्या, लोकलच्या फे-या वाढवल्या? कार्यालयात शिफ्टची पद्धत आणून गर्दी कमी केली? सरकारच्या वतीने सामान्यांच्या वाहतुकीची कोणती विशेष, वाढीव व्यवस्था उभी केली? गावागावांतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुसज्ज केली? या व अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर जर नकारार्थी येत असेल व तरीही सरकार दोष जनतेच्याच माथी मारत असेल तर मग जनतेने काय करावे? अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपायांचे सरकारला अपेक्षित कडक पालन करायचे तर एकच पर्याय आणि तो म्हणजे जनतेने स्वत:ला घरात कैद करून घेणे!

जिवाच्या भीतीने जनतेने हे मागच्या वर्षात केलेही पण पोटातली भूक या भीतीपेक्षाही भयानक आहे. तिची काय व्यवस्था? सर्वसामान्य जनता या भुकेसमोर हतबल आहे व म्हणूनच तिला घराबाहेर पडणे भाग आहे. सरकारने काही काळ मोफत धान्य दिले व शे-पाचशे रुपये अकाऊंटमध्ये टाकले म्हणजे सर्वसामान्यांच्या जगण्याच्या सर्व गरजा कायमच्या मिटल्या, असेच बहुधा सरकार मानत असावे. असो! खरे तर ही वेळ दोषारोपणाची नाही तर सरकार, प्रशासन व जनता यांनी परस्पर सहकार्याने एकत्रित ही लढाई लढण्याची आहे. अशावेळी सरकार, प्रशासनाने दंडुक्याची व दंडाची भाषा न करता प्रबोधनाची व सहकार्याचीच भाषा वापरली पाहिजे. जनतेला दोष देऊन व दंडुका दाखवून प्रशासन आपले ‘परमप्रिय कर्तव्य’ चोख पार पाडेल पण कोरोनाची लढाई जिंकू शकणार नाहीच. त्यासाठी जनतेचे सहकार्यच आवश्यक आहे. जबाबदारीचे भान जसे जनतेला येणे आवश्यक आहे तसेच ते सरकार, प्रशासनानेही ठेवणे आवश्यक आहे.

टाळेबंदीने कोरोनाशी लढण्यात कितपत फायदा झाला याबाबत राज्यात, देशातच नव्हे तर जगभरात मतमतांतरे आहेत पण या अघोरी उपायाने जगाचे अर्थकारण डबघाईला आणले याबाबत जगभर एकमतच आहे. मग असे असतानाही तोच मार्ग पुन्हा अवलंबिण्यात शहाणपणा तो काय? याचा गंभीर विचार सरकार व जनतेनेही करायला हवा! आपण आपली जबाबदारी गांभीर्याने नाही ओळखली व परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर टाळेबंदीची, बंद-निर्बंधांची आणि त्यातून निर्माण होणा-या अर्थसंकटाची स्थिती अटळच आहे. त्यामुळे सर्वांनीच वेळीच सावध होणे व स्वयंशिस्त पाळून सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हा ‘सावध ऐका पुढल्या हाका, मागचा धडा नाही का पुरा?’ हे जनतेने व सरकार, प्रशासनानेही पदोपदी स्वत:ला विचारले व बजावले पाहिजे. हे आपण एकत्रितरीत्या करू शकलो तरच ‘कोरोना रिटर्नस्’च्या दुस-या धुमाकुळातून स्वत:ला व देशालाही वाचवू शकू अन्यथा तज्ज्ञांचे इशारे व भीती सत्य ठरेल, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या