30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home संपादकीय जय हो यंगिस्तान !

जय हो यंगिस्तान !

एकमत ऑनलाईन

मंगळवार, १९ जानेवारी २०२१ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर अव्वल दर्जाच्या ऑस्ट्रेलियन संघाला भारताच्या ‘ब’दर्जाच्या नव्हे ‘क’ दर्जाच्या भारतीय संघाने अक्षरश: धूळ चारून ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताने हा दिमाखदार विजय मिळवला हे विशेष! गॅबा मैदानावर भारताने इतिहास रचला. या मैदानावर ३२ वर्षांत कोणत्याच संघाने यजमान संघाला पराभूत केले नव्हते. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधणा-या भारतीय संघाला गॅबात या, गॅबात या असे आव्हान मिळत होते. कांगारू कर्णधार पेननेच तसे आव्हान दिले होते. तमाम ऑस्ट्रेलियन समिक्षकांनीही भारत पराभूत होणार अशी दर्पोक्ती केली होती पण घडले भलतेच! अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून भारताने ऑस्ट्रेलियाची मस्ती उतरवली, त्यांचे गर्वहरण केले.

मालिकेत स्लेजिंग, बॉडीलाईन (शरीरवेधी) गोलंदाजी आणि वर्णद्वेष करणा-या ऑस्ट्रेलियनांचे कपडे काढले गेले. भारताने मालिकेत जे काही केले ते तसे सोपे नव्हतेच. विशेषत: अ‍ॅडलेडमधील पिंक कसोटीत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेईल असे वाटलेच नव्हते. पण भारतीय संघात ‘होनी को अनहोनी, अनहोनी को होनी’ करण्याची अचाट क्षमता आहे हे क्रिकेट विश्वाला कुठे ठाऊक होते? पहिल्या कसोटीत दुस-या डावात ३६ धावांत गारद होणारा भारतीय संघ अखेरच्या कसोटीत चौथ्या डावात ३२८ धावांचे आव्हान पार करेल असे कोणालाच वाटले नव्हते. परंतु क्रिकेटची हीच तर खरी मजा आहे. हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे मान्यच करावे लागेल. या खेळात अगाऊ अंदाज व्यक्त करणारे गोत्यात येतात. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ऑस्ट्रेलियन दौ-यात भारतीय संघ ०-४ असा पराभूत होईल असे भाकित केले होते… त्याचे दात त्याच्याच घशात गेले. रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क, स्लेटर यांनाही खरपूस मार मिळाला. ही किमया कशी घडली असा प्रश्न त्यांना पडला असेल.

याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे भारतीय संघाची जिंकण्याची, लढण्याची जिद्द आणि प्रबळ मानसिकता, सकारात्मक दृष्टिकोन. विराटच्या अनुपस्थितीत आम्ही ‘वन मॅन आर्मी’ नाही हे भारतीय संघाने मैदानावर सिद्ध केले. विराट मायदेशी परतल्यानंतर शांत स्वभावाच्या अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची धुरा वाहिली आणि आपले कर्तृत्वही सिद्ध केले. त्याने सर्वप्रथम आपल्या सहका-यांचे खचलेले मनोधैर्य सावरण्याचे काम केले, त्यांच्या क्षमतेवर विश्वास दाखवला आणि सामन्याचा निकाल काहीही लागो लढण्याची जिद्द बाणवली. मेलबर्न कसोटीत स्वत: शतक ठोकून संघासमोर आदर्श ठेवला. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणाद्वारे भारताने विजय मिळवला. सिडनी कसोटीत पंत आणखी थोडा वेळ मैदानावर राहिला असता तर कदाचित भारताला विजय मिळाला असता. अर्थात क्रिकेटमध्ये पण… परंतुला काही अर्थ नसतो. चौथ्या डावात सामना अनिर्णीत राखताना तब्बल १३१ षटके खेळून काढली. याला प्रामुख्याने हनुमा विहारी-अश्विन जोडीची जिद्द कारणीभूत ठरली. हनुमा विहारी जायबंदी होता. त्याला पलंगावरून बाथरूमपर्यंत चालत जाणे अवघड होते. त्याने अडीच तास किल्ला लढवला.

भंडारा रुग्णालयातील आग शॉर्ट सर्किटमुळे

अश्विनचे शरीरही उसळत्या चेंडूंनी शेकून काढले होते. या दोघांनीही बाजीप्रभू देशपांडेसारखी खिंड लढवण्याचे काम केले. अखेरच्या कसोटीत भारताची टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर-शार्दुल ठाकूर या नवख्या जोडीने शतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला आणि धावसंख्या तीनशेपार नेली. दोघेही कसलेल्या फलंदाजासारखे खेळले. दोघांनीही अर्धशतके ठोकली. या जोडीमुळेच सामन्याने यू टर्न घेतला. भारताच्या शेपटात जान नसते हा परंपरागत विचार खोटा ठरला.या शेपटानेच कांगारूंना तडाखा दिला. सुंदर-ठाकूरची जोडी कांगारूंसाठी संताजी-धनाजीसारखी भासली असेल. कांगारूंना पहिल्या डावावर ३३ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. दुस-या डावात कांगारूंना तीनशे धावांच्या आत रोखले ते सिराजच्या पाच बळींमुळे. ठाकूरने ४ बळी घेऊन सिराजला सुरेख साथ दिली. भारताला अखेरच्या डावात ३२८ धावांचे हिमालयासारखे आव्हान मिळाले. गॅबाच्या मैदानावर याआधी २५० धावासुद्धा निघाल्या नव्हत्या. रोहित लवकर बाद झाला पण शुभमन गिलने आशा सोडल्या नाहीत. त्याने ९१ धावा ठोकून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. पुजाराने एका बाजूने नांगर टाकला. दोनशेपेक्षा अधिक चेंडू आणि सुमारे साडेपाच तास किल्ला लढवताना कांगारू तोफखान्याचे चेंडू अंगावर झेलले.

पंतने पुजारानंतर खेळाची सूत्रे हाती घेतली. चहापानापर्यंत सामना अनिर्णीत राहील किंवा कांगारू जिंकतील असे वाटत होते. चहापानानंतर भारताला विजयासाठी १४५ धावांची गरज होती. पंतने सुंदरला हाताशी धरत अर्धशतकी भागीदारी केली आणि कसोटीला टी-२०चे स्वरूप प्राप्त झाले होते. पुजाराने अनेक घाव सोसले होते परंतु त्याने चेह-यावर कसलेच भाव दाखवले नव्हते. ‘मर्द को दर्द नही होता’ हेच त्याने दाखवले. त्यामुळे पंत-सुंदर ही यंगिस्तान जोडी सामना जिंकायचाच या जिद्दीने पेटून उठली. पंतने मैदानावर लोळण घेत फटके मारले आणि गॅबावर तिरंगा फडकावत ठेवला. भारतीय संघातील युवा खेळाडूंनी देशाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. म्हणून ‘जय हो यंगिस्तान’ असे अभिमानाने म्हटले पाहिजे. हाताच्या बोटावर मोजता येणार नाहीत इतके प्रमुख खेळाडू जायबंदी असताना यंगिस्तानने मिळवलेला विजय लाख मोलाचा आहे यात शंका नाही. या विजयात केवळ पंतच हीरो होता असे नाही सारेच खेळाडू हिरो होते. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. क्रिकेट विश्वात भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघ जसा रसातळाला जाऊ शकतो तसा हिमालयाची उंचीही गाठू शकतो हे सिद्ध झाले. त्यामुळे यापुढे भारतीय संघाला कमी लेखून चालणार नाही. भारतीय संघ पेटून उठला की त्यापुढे कोणाचाच निभाव लागत नाही.

भारतीय क्रिकेटमधील हा बदल एका रात्रीतून घडला नाही. त्यामागे दीड-दोन तपाची तपश्चर्या आहे. भारताची बेंच स्ट्रेंग्थ, घरगुती क्रिकेट मजबूत आहे. त्यामागे राहुल द्रविडचे परिश्रम कारणीभूत आहेत. त्यामुळेच एकाहून एक मौल्यवान हिरे संघाला मिळाले. भारताच्या विजयाचे पाकिस्तानमध्येही अमाप कौतुक झाले. आशियातील क्रिकेट संघांनाही प्रेरणा मिळाली आहे. मोहम्मद सिराजच्या कर्तृृत्वाने देशाची शान वाढली आहे. भारताच्या दृष्टीने अजिंक्य रहाणे, पुजारा, शुभमन गिल, हनुमा विहारी, अश्विन, जडेजा, सिराज, पंत, सुंदर, नटराजन, बुमरा यांना ‘संकटमोचक’ असेच संबोधले पाहिजे. सलग दुस-यांदा कांगारूंना चारीमुंड्या चित करण्याचा पराक्रम भारताने गाजवला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या