21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसंपादकीयन्याय झाला?

न्याय झाला?

एकमत ऑनलाईन

अल कायदाचा म्होरक्या आयमन अल जवाहिरी याचा शोध अखेर अमेरिकेने घेतलाच व रविवारी अत्यंत नियोजनपूर्वक पद्धतीने काबूलमध्ये तो दडून बसलेल्या घरावर ड्रोनद्वारे हल्ला करून त्याचा खात्मा करण्यात आला, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली. साहजिकच सगळ्या जगासाठीच मोठी समस्या ठरलेल्या दहशतवादात आपले मोठे योगदान देणारा दहशतवादी मारला गेल्याचा आनंद जगभरातून व्यक्तही झाला. भारतासाठीही ही आनंददायक बातमी कारण या अल जवाहिरीने नुकतेच कर्नाटकातील हिजाब वादावर व्हीडीओ प्रसारित करून अल कायदाचे भारतात नेटवर्क वाढविण्याचे आपले इरादे स्पष्ट केलेच होते. त्याच्या खात्म्याने अल कायदाचे हे इरादे कायमचे उद्ध्वस्त होणार नसले तरी त्याला काही काळासाठी तरी खीळ बसेल, ही आशा ! अमेरिकी अध्यक्षांनी जवाहिरीच्या खात्म्याची घोषणा करताना ‘न्याय झाला’ अशी भावना व्यक्त केली. ‘तुम्ही कुठेही आणि कितीही काळ लपून बसा, तुमच्यामुळे आमच्या नागरिकांना धोका असेल तर आम्ही तुम्हाला शोधू आणि मारू’, अशा शब्दांत बायडन यांनी अमेरिकेचे धोरण विशद केले. त्यांच्या या वक्तव्याचे अमेरिकी जनतेकडून जोरदार स्वागत झाले व ते होणे साहजिकच. मात्र, उर्वरित जगाच्या भुवया मात्र उंचावल्या कारण एक लादेन वा एक अल जवाहिरी याचा खात्मा केल्याने अमेरिकेला न्याय झाल्याचे समाधान मिळत असले तरी शीतयुद्धात आपल्या वर्चस्वासाठी ज्या महासत्तांनी ही विषवल्ली जन्माला घातली ती आता संपूर्ण जगासाठी भस्मासुर बनली आहे.

त्याबाबत संपूर्ण जगाने एकत्रितपणे ती समूळ उखडून टाकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तशी घोषणाही अमेरिकेने त्यांच्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर केली होती व अफगाणिस्तानात आपले लष्कर उतरविले होते. मात्र, प्रदीर्घ काळानंतरही अमेरिकेला अफगाण दहशतवादमुक्त करता आला नाही. उलट लष्कराच्या भाक-या किती दिवस भाजायच्या व किती नुकसान सोसायचे हा विचार अमेरिकेत बळावला. त्यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणमधून अमेरिकी सैन्य वापस बोलावण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या जागी बायडन आल्यावर आनंदलेल्या त्यांच्या जगभरातल्या चाहत्यांना, ज्यात भारतातील एका मोठ्या वर्गाचा समावेश आहे, ते ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फे रविचार करतील व अफगाणची व्यवस्थित घडी बसवून मगच सैन्य माघारी बोलावतील अशी अपेक्षा होती. मात्र, बायडन यांनी ट्रम्प यांचा निर्णय बदलणे तर लांबच उलट तो मागचापुढचा विचार न करता घाईघाईने पूर्ण करण्यात धन्यता मानली आणि चक्क तालिबान्यांच्या हाती अफगाण सोपवून व अफगाणी नागरिकांना वा-यावर सोडून ते मोकळे झाले. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी धोरणाचा हा दुभंगपणा आहे.

जगाला तत्त्वज्ञानाचे धडे देणारी अमेरिका स्वत:ला झळ पोहोचली की वेगळेच वागते, अगोदर स्वत:च्या हितालाच प्राधान्य देते, याचा हा ढळढळीत पुरावा! अर्थात अमेरिकेने असे वागण्याची ही काही पहिली वेळ नाही. इराण-इराक वाद असो, इस्रायल-पॅलेस्टिन वाद असो की काश्मीर वाद अमेरिका आपल्या हिताला डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेते. आताही ज्या अल जवाहिरीला मारल्याने बायडन ‘न्याय झाला’ असे सांगत आहेत तो जवाहिरी सध्या तालिबान राजवटीतील दोन क्रमांकाच्या नेत्याच्या घरात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत मागच्या कित्येक महिन्यांपासून कुटुंबासह बिनधास्त राहात होता. याच तालिबान्यांना अफगाणची सत्ता सोपवताना अमेरिकेने कुठल्याही दहशतवाद्याला आश्रय न देण्याची अट घातली होती. हा करार किती तकलादू व दिखाऊ होता याचा पुरावाच या निमित्ताने जगासमोर आला आहे. मात्र, त्यावर अवाक्षर न बोलता बायडन ‘न्याय झाला’ असा दावा करतायत आणि त्यांचे अमेरिकेबाहेरचे चाहतेही टाळ्या पिटतायत! विशेष म्हणजे हे ऑपरेशन पार पाडण्यासाठी अमेरिकेला मदत कुणी केली तर पाकिस्तानने! कशाच्या बदल्यात तर आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी ! ही निव्वळ चर्चा असा दावा अमेरिकेकडून नक्कीच होऊ शकतो.

मात्र, जवाहिरीच्या हत्येचा बदला म्हणून अल कायदाच्या दहशतवाद्यांनी पाकच्या कमांडरची लगोलग हत्या करून काय ते सगळे स्पष्टच केले आहे. त्यामुळे अमेरिकी जनता व बायडन यांना जवाहिरीच्या खात्म्याने ‘न्याय झाला’ असे वाटत असले तरी बायडन यांच्या जगातील चाहत्यांनी हा खरोखरच न्याय झाला का? हे स्वत:ला प्रामाणिकपणे विचारण्याची गरज आहे. मात्र, सध्याच्या जागतिक राजकारणाचा पोतच असा आहे की, सामान्यांना असा विचार करण्याची उसंतच मिळू दिली जात नाही. जसे लादेन मारला गेल्याने अल कायदा संपली नाही की जगातला दहशतवाद संपला नाही तसेच जवाहिरी मारला गेल्यानेही अल कायदा संपणार नाही की दहशतवाद संपणार नाही. तो संपवायचा तर सर्वच देशांना आपल्या हितांच्या कुंपणाबाहेर येऊन, प्रसंगी नुकसान सोसून दहशतवाद मुळापासून निपटून काढण्याची प्रदीर्घ लढाई लढावी लागेल. हे धोरण दुभंग असल्यास त्यात यश येणे अशक्यच. मात्र, जगाचा पोलिस आपणच हे स्वयंघोषित करणारी व तसे वागणारी अमेरिका स्वत:च्या हितांना धक्का लावून घ्यायला अजिबात तयार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या सोयीने दहशतवादाविरुद्धची लढाई सुरू होते व त्यांच्या सोयीनेच ती थांबते, जे की अफगाणमध्ये घडले. अतिरेकी तालिबानींच्या हाती अफगाण सोपविल्याने दहशतवाद कसा रोखला जाऊ शकतो? हा प्रश्नच! मात्र, जगाने तो अमेरिकेला विचारला नाही आणि समजा विचारला तर अमेरिका त्याचे कधी उत्तर देणार नाही.

तथापि, जवाहिरीसारखा एखादा दहशतवादी चार-पाच वर्षांच्या कालखंडात टिपून अमेरिका आपण दहशतवादाविरुद्धच्या लढ्यास कटिबद्ध असल्याचा दावा करत स्वत:ची पाठ थोपटून घेणार व जग त्यावर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करणार! अशाने जगातला दहशतवाद कसा संपेल आणि या दहशतवादाचे बळी ठरलेल्या जगभरातील लोकांना न्याय कसा मिळेल? या निष्पाप बळींना न्याय मिळायचा असेल तर जगातून दहशतवादाचा भस्मासुर कायमचा संपायला हवा. तो तर दिवसेंदिवस रावणासारखी दहा तोंडे दाखवत वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळी नावे घेऊन येतोच आहे आणि निष्पाप लोकांचा बळी घेतो आहे. जग मात्र अमेरिकेने स्वत:पुरत्या केलेल्या न्यायावर टाळ्या पिटते आहे. आज तालिबानींच्या हाती अफगाण सोपवला गेल्याने दहशतवाद्यांना मोठे बळ प्राप्त झाले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, काश्मीर, उत्तर व पश्चिम आफ्रि का या भागांमध्ये विविध दहशतवादी गट पुन्हा प्रचंड सक्रिय झाले आहेत. त्यांना रोखण्यात दुभंग धोरण, ढिसाळ नियोजन, सदोष लष्करी कारवाया अपयशी ठरल्या आहेत. जे देश दहशतवाद्यांना आश्रय व प्रोत्साहन देतात, बळ देतात त्याच देशांच्या भरवशावर विसंबून दहशतवादाविरुद्धची लढाई कशी जिंकता येऊ शकते, हा यक्ष प्रश्नच! महासत्ता म्हणून मिरवणा-या व जगाचे पोलिस बनलेल्या अमेरिकेने स्वत:ला हा प्रश्न कधीतरी प्रामाणिकपणे विचारावा. तरच जगात ‘खरा न्याय’ होईल, एवढे मात्र निश्चित!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या