22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसंपादकीयकर लो दुनिया मुठ्ठी में!

कर लो दुनिया मुठ्ठी में!

एकमत ऑनलाईन

रिलायन्स जिओची ५ जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी कंपनीच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. रिलायन्स जिओची महत्त्वाकांक्षी ५ जी सेवा दिवाळीपासून प्रमुख चार महानगरांमध्ये सुरू होईल. गुगलच्या भागीदारीत परवडणारे ५ जी फोन बाजारात आणण्याची आणि एकंदर २ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात सर्वत्र या सेवेच्या विस्ताराची योजना असल्याचे अंबानी यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील जिओ ५ जी इंटरनेट सेवा देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण देशभरात इंटरनेट सेवांचा विस्तार होणार आहे. ५ जी मुळे देशात मोठा बदल होणार असून डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार आहे.

यासाठी रिलायन्स आवश्यक तेथे वायर आणि इतर ठिकाणी वायरलेस सेवेचा वापर करून यंत्रणा उभारणार आहे. खासगी उद्योग, खासगी कंपन्या यांच्यासाठी सेवा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे नेटबाबतचा लोकांचा अनुभव बदलण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी झालेल्या ५ जी ध्वनीलहरी लिलावा दरम्यान रिलायन्स जिओ ही सर्वांत मोठी बोली लावणारी कंपनी ठरली. कंपनीने यावर ८८,०७८ कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘जिओ टू ५ जी’ असे नामकरण करण्यात आलेली सेवा ज्या चार महानगरांमध्ये सुरू होणार आहे त्याची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र दिवाळीचा मुहूर्त साधून सेवा सुरू केली जाईल असा अंदाज आहे. त्यानंतर महिन्यागणिक विस्तार वाढवत नेला जाईल. जिओची ५ जी सेवा देशाच्या प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यापर्यंत पोहोचविण्याची योजना आहे.

देशव्यापी ११ लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे फायबर-ऑप्टिकचे जाळे, आयपी नेटवर्क, स्वदेशी ५ जी समर्थ स्टॅक आणि संपूर्ण तंत्रज्ञान, मजबूत जागतिक भागीदारी यामुळे कमीत कमी कालावधीत ५ जी सेवा सुरू करण्याची क्षमता कंपनीकडे होती असे अंबानी यांनी म्हटले आहे. ५ जी सोबतच जिओकडून कनेक्टेड इंटेलिजेन्ससह अब्जावधी स्मार्ट सेन्सर स्थापित केले जातील. ज्यामुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ला चालना मिळेल आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीची पायाभरणी केली जाईल. रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनीची उत्तराधिकारी योजना स्पष्ट केली आहे. मुलगी ईशाला किरकोळ व्यवसाय आणि धाकटा मुलगा अनंतला वीज व्यवसायाचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. अंबानी यांनी याआधीच मोठा मुलगा आकाशला रिलायन्स जिओ समूहाचे दूरसंचार शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. उत्तराधिका-यांची नावे ठरवताना अंबानी यांनी आपण सध्या निवृत्त होणार नसल्याचे म्हटले आहे. आपण पूर्वीसारखेच सक्रिय राहणार असल्याचे ते म्हणाले. म्हणजेच नव्या पिढीला मुकेश यांच्यासह सर्व वरिष्ठांचे व संचालक मंडळाच्या इतर सदस्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. रिलायन्स समूहाला अदानी समूहाचे आव्हान राहील हे उघड आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी आताच निवृत्ती घ्यायची नाही असे ठरवलेले दिसते.

रिलायन्सचे अस्तित्व एकसंध आणि सुरक्षित राहील याची काळजी मुकेश अंबानी यांनी घेतली आहे शिवाय नव्या पिढीला समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या दूरदृष्टीचा वारसा लाभला आहे. रिलायन्स जिओ ५ जी नेटवर्कसाठी दोन लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे डेबिट, के्रडिट कार्डचे व्यवहार अधिक सुरक्षित होतील. जिओने एअरफायबरची घोषणा केली आहे. यात ब्रॉडबँण्ड इंटरनेटचा वेग अधिक राहील. फिक्स्ड ब्रॉडबॅण्डमध्ये भारत आगामी काळात पहिल्या १० देशांमध्ये राहील असा अंदाज आहे. गत तीन दशकांपासून देशात वायरलेस नेटवर्क उभे राहण्यास सुरुवात झाली. हे नेटवर्क उभे राहताना अनेक कंपन्यांनी कोट्यवधीची उड्डाणे मारली. अनेक कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी वेळप्रसंगी शेअर बाजाराचा आधार घेत भांडवल उभे केले. सर्वसामान्य जनतेला या सोयी-सुविधांचा उपभोग घेता यावा हा त्यामागे उद्देश होता. ग्रामीण भागातील जनता जगाशी जोडली जावी हा हेतू साध्य करताना काही टेलिकॉम कंपन्यांनी स्वत:चाच फायदा पाहिला. त्यामुळे आजही ग्रामीण जनता या सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे.

वायरलेस-नेटवर्कच्या निर्मितीसाठी सरकारी कंपनी भारतीय दूरसंचार निगमने काही काळापुरती आघाडी घेतली होती. ग्रामीण भागात छोटे-मोठे टॉवर उभे करून टेलिकॉम सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेत पैसा असल्याची जाणीव बड्या उद्योजकांना झाली आणि रिलायन्स, व्होडाफोन, आयडिया, एअरटेल या कंपन्यांचा या क्षेत्रात शिरकाव झाला. या कंपन्यांनी आपले खासगी टॉवर उभे करून सरकारी कंपनी बीएसएनएलचे ग्राहक आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. त्यामुळे घराघरांत वाजणारी फोनची घंटा आता लोकांच्या खिशात वाजू लागली. सरकारी धोरणामुळे बीएसएनएलच्या पडझडीला सुरुवात झाली. खासगी कंपन्यांनी ४ जी सेवा सुरू केली मात्र सरकारी कंपनी टू जी-थ्री जी मध्येच अडकली. बीएसएनएलने मनात घेतले तर खासगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते मात्र त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ नाही शिवाय सरकारी धोरणही आड येते. बीएसएनएलमध्ये कार्यात असलेल्या कर्मचा-यांची शैक्षणिक पात्रता आणि दिला जाणारा पगार यांचा ताळमेळ बसत नाही. शिवाय सरकारी नियमावलीही लवचिक असायला हवी. बीएसएनएलला स्पर्धेची जाणीव झाली आहे. म्हणूनच त्यांनी ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून ग्रामपंचायती जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

फोर जी सेवेची घोषणाही केली आहे. मात्र पुन्हा एकदा अडसर आहे तो प्रशिक्षित मनुष्यबळाचा. कंपनीने नवीन टॉवर उभारण्याचे काम सुरू केले आहे. मात्र सरकारच्या नियमावलीचे पालन करत सेवा अखंडितपणे पुरविणे शक्य होईल असे वाटत नाही. आता खासगी कंपन्यांनी ५ जी सेवा देण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत बीएसएनएलसमोर आपले ग्राहक टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी त्यांना स्पर्धेमध्ये उतरावेच लागेल. अन्यथा हे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळतील आणि सरकारी कंपनीला ‘बैल गेला अन् झोपा केला’ असे म्हणण्याची वेळ येईल. सरकारी कंपनीने मनावर घेतले तर खासगी कंपन्यांकडून होणा-या लुटमारीला चाप बसू शकेल. ग्राहक खेचण्याची स्पर्धा सुरू असताना अजूनही कॉलड्रॉप होण्यावर ठोस उपाययोजना काढता आलेली नाही. ग्र्रामीण भागातील जनतेला आजही फोन लावण्यासाठी उंच जागा शोधावी लागते. असेच सुरू राहिले तर ग्रामीण भागातील जनता ५ जीच्या माध्यमातून जगाशी कशी जोडली जाईल? गाजावाजा करण्यात येत असलेली ५ जी सेवासुद्धा फायद्याच्याच शहरांपुरती मर्यादित होऊन जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या