26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसंपादकीय‘किंग’ कोहली पायउतार...!

‘किंग’ कोहली पायउतार…!

एकमत ऑनलाईन

खेळात राजकारण आणू नये असे म्हटले जाते परंतु ते येतेच येते! कारण खेळात राजकारण आले की खेळाचा खेळखंडोबा होतो. परंतु या ना त्या प्रकारे खेळात राजकारण येतेच. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस न घेता ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्यासाठी सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोव्हिच ६ जानेवारीला मेलबर्न येथे दाखल झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने त्याचा व्हिसा रद्द केला होता. १० जानेवारीला न्यायालयाने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय स्थगित ठेवला होता. मात्र, परकी नागरिक विषयक खात्याचे मंत्री हॉक यांनी विशेष अधिकार वापरून १४ जानेवारीला जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द केला. नोवाकने या निर्णयाविरोधात दाद मागितली मात्र केंद्रीय न्यायालयाच्या तिन्ही न्यायाधीशांनी एकमताने नोवाकविरोधात निकाल दिला. हॉक यांनी उचललेले पाऊल ‘तर्कहीन किंवा कायदेशीरदृष्ट्या अवास्तव’ होते का याबाबत विचार केल्यानंतर आम्ही नोवाकचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे नोवाकची २१ ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी हुकली आहे. या निर्णयामुळे लॉन टेनिस जगतात प्रचंड खळबळ माजली आहे. नोवाकने ऑस्ट्रेलियन स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून त्याने विक्रमी नऊ वेळा आणि सलग तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

नोवाकने न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला असून आपण मायदेशी परतणार असल्याचे म्हटले आहे. राजकीय निर्णय मोठे मजेशीर असतात. ऑस्ट्रेलियात ‘अ‍ॅशेस’ मालिकेचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मुभा देण्यात आली होती परंतु प्रेक्षकांना मास्क वापरण्याचे बंधन घालण्यात आले नव्हते. सामाजिक अंतर ठेवण्याचा तर सपशेल फज्जा उडाला होता. नोवाकने दोन्ही डोस घेतले नसले तरी त्याची आरटीपीसीआर टेस्ट घेऊन त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी देता आली असती. असो. टेनिस पाठोपाठ क्रिकेट जगतातही एक खळबळजनक घटना घडली. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका १-२ अशी गमावल्यानंतर ‘किंग’ विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्याचा हा निर्णय ‘बीसीसीआय’ आणि क्रिकेट रसिकांसाठी धक्कादायक होता. सात वर्षांच्या आपल्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतीय संघाला देदीप्यमान यश मिळवून देत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. आजवरच्या भारतीय कर्णधारांमध्ये विराटची कारकीर्द सर्वोत्कृष्ट ठरली आहे. त्याने ६८ कसोटींत ४० विजय मिळवले आहेत आणि १७ पराभव स्वीकारले आहेत. त्याचे हे यश सोन्यासारखे झळाळणारे आहे. भारतीय संघावर ‘घरात शेर आणि बाहेर ढेर’ असा शिक्का बसला होता. तो पुसून काढण्याचे काम विराटने केले. आठ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रमही त्याने गाजवला. सौरव गांगुलीने भारतीय संघात आक्रमकता आणली असे म्हटले जाते, तीच परंपरा विराटने पुढे चालवली.

नेतृत्व करताना विराटने नेहमीच संघहिताला प्राधान्य दिले. नेहमीच तो प्रामाणिकपणे कार्यरत राहिला, त्याने केवळ १०० टक्केच नव्हे तर १२० टक्के योगदान दिले. भारतीय क्रिकेटमध्ये केवळ फिरकी गोलंदाजांचा बोलबाला होता त्यावर विसंबून न राहता वेगवान गोलंदाजांना प्रकाशात आणण्याचे काम कोहलीने केले. आज भारताकडे सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. त्यानेच संघात ‘टिट फॉर टॅट’ वृत्ती बाणवली. हे सारे करताना विराटची बॅट नेहमीच बोलत राहिली. विराटने ७० आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. त्याचे कर्तृत्व दृष्ट लागण्याजोगे आहे म्हणूनच की काय त्याच्या कर्तृत्वाला दृष्ट लागलीच! गत दोन वर्षांत त्याला एकही शतक ठोकता आले नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. तरीसुद्धा भारतीय संघाला हिमालयाची उंची गाठून देणे सोपे नव्हते. परदेशात कसोटी सामने जिंकण्याची सवय त्याने भारतीय संघाला लावली. त्याचे कर्तृत्व इतके अचाट होते की रटाळ वाटणारे कसोटी सामने मनोरंजक वाटू लागले. प्रेक्षकांनी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली होती परंतु कसोटी सामनेही रोमांचक होत आहेत हे पाहून स्टेडियम दुथडी भरून वाहू लागले. आक्रमक विराटने गोलंदाजांत जिद्द आणि त्वेष निर्माण केला. जगभर पांढ-या चेंडूसाठी एक कर्णधार आणि लाल चेंडूसाठी दुसरा कर्णधार ही प्रथा रूढ झाली. हा रोख लक्षात घेऊन विराटने संयुक्त अरब अमिरातीतील टी-२० विश्व चषकापूर्वी टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. मात्र वन डे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि इथेच राजकारण सुरू झाले.

क्रिकेट मंडळाला आणि निवड समितीला पांढ-या चेंडूसाठी आणि लाल चेंडूसाठी वेगवेगळे कर्णधार हवे होते. परंतु क्रिकेट मंडळाने कोहलीला विश्वासात न घेता त्याला वन डे संघाच्या नेतृत्वपदावरून हटवले. सुरुवातीला ठिणगी पडली होती, नंतर तिचे आगीत रुपांतर झाले अन् कोहलीने कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले. काळ हा कोणासाठी थांबत नसतो परंतु क्रिकेट मंडळाला हे प्रकरण सन्मानपूर्वक मिटवता आले नसते का? ‘आता कर्णधारपद सोडण्याची वेळ आली आहे’ असे कोहलीने राजीनामा देताना म्हटले आहे. विराटने राजीनामा देऊन मंडळाला अवमान करण्याची संधीच दिली नाही! तू निवृत्त का होत नाहीस? असा प्रश्न विचारला जाण्यापेक्षा तू निवृत्त का झालास? असा प्रश्न विचारला जाणे केव्हाही चांगले! परंतु या राजीनामा प्रकरणामुळे भारतीय संघाची जी हानी झाली आहे ती लवकर भरून निघणे कठीण आहे. क्रिकेटमध्ये राजकारण घुसल्यानंतर दुसरे काय होणार? विराट प्रचंड दबावाखाली होता म्हणून त्याने राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार कपिल देवने व्यक्त केली आहे. विराटने घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. या आधी ‘विराट बडबड फार करतो’ असेही गांगुली म्हणाला होता. गांगुलीला हे प्रकरण व्यवस्थित हाताळता आले नाही एवढे मात्र नक्की. मंडळात त्याला ‘दादागिरी’ गाजवता आली नाही. आता नेतृत्वपदाचा दबाव नसल्याने विराटला फलंदाजीवर अधिक लक्ष देता येईल आणि ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’ असे गाता येईल. क्रिकेट रसिकांना मात्र वाटेल-
सोये नगमें जाग उठे, होठों की शहनाई में,
दिल का दिया जला के गया, ये कौन मेरी तनहाईमें!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या