मार्च २०२० पासून सारे जग कोरोना विषाणू विरुद्ध झुंजत होते. त्यातून सावरत असतानाच या वर्षाच्या प्रारंभी ओमिक्रॉनच्या रुपात कोरोनाने पुन्हा आपले अस्तित्व दाखवले. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा चिंतेचे काळे ढग पसरले. सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाचा ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. २०२१ मध्ये जगभरात झालेल्या वेगवान लसीकरणामुळे ओमिक्रॉनने पळ काढल्याचे जाणवले. आता सारे काही सुरळीत होईल या नव्या आशेने जगाची वाटचाल सुरू झाली. कोरोना विषाणू भुईसपाट झाला या भोळ्या आशेत राहून चालणार नव्हते. कारण कोरोना नामक बहुरुपी वेगवेगळ्या रुपात आपले अस्तित्व दाखवणार याची कल्पना होतीच. नेमके तसेच झाले. मंकी पॉक्सच्या रुपात आपण जिवंत असल्याचे या विषाणूने दाखवले.
हा विषाणू प्रथम माकडात आणि नंतर माणसात सापडला. या विषाणूचे वास्तव्य प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेत आहे. भारतात या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही, त्यामुळे काळजीचे कारण नाही. मात्र, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज एक हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड,पालघर या सहा जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्यात १३५७ तर रविवारी १४९४ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या सुमारे साडे सहा हजार झाली आहे. कोरोनाचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने राज्यात मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक होणार असे दिसते. गर्दीच्या ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, रेल्वे, सिनेमागृह येथे मास्क बंधनकारक असणार आहे. देशात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिवांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगाना, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या राज्यात टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात गत दीड महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सात पट वाढ झाली आहे. राज्यशासन पुढील १५ दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत:हून शिस्त पाळावी, मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे. हात धुवा आणि अंतर ठेवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आरोग्य यंत्रणेला रुग्णालये सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजून मास्क सक्ती नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांनी ४ जून रोजी म्हटले होते. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे तेथे मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील २६ जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा कमी आहे. त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या सुमारे २१ हजारच्या वर गेली आहे. ८४ दिवसानंतर दैनंदिन नव्या रुग्णांचा आकडा ४ हजाराच्या वर गेला. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत १९३.८३ कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेतील पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड क्षेत्रात करण जोहरची पार्टी सुपर कोरोना स्प्रेडर ठरली आहे. अभिनेता शाहरूख खानसह सुमारे ५५ जणांना कोरोनाने गाठले आहे. चित्रपट निर्माता करण जोहरने आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत काही सेलिब्रेटिंना कोरोनाचा संसर्ग झाला असावा असा अंदाज आहे. या पार्टीला हृतिक रोशन, कतरिना कैफ, करिना कपूर, सैफ अलि खान, सलमान खान, शाहरूख खान आदी सेलिब्रेटी उपस्थित होते. अक्षयकुमार, कतरिनाकैफ, विकी कौशल, आदित्य रॉय कपूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीत कार्तिक आर्यन उपस्थित नव्हता परंतु त्यालाही कोरोना झाला आहे. कारण करणच्या पार्टीत उपस्थित असलेल्या अभिनेत्री कियारा अडवानीच्या संपर्कात आल्याने कार्तिकला कोरोना झाला.
कार्तिक भुल भुलैय्या-२ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिच्यासोबत होता. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढताना भुलभुलैय्या-२ चेच प्रदर्शन केले आहे. पार्टीत उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोना झाला असला तरी त्यांनी उघड केलेले नाही. हाच प्रकार धोकादायक आहे. गतवर्षी सुद्धा करणच्या घरी झालेल्या पार्टीत करिना कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी १५ जूनपासून शाळा सुरू होतील. पूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरू केल्या जातील. या बाबत लवकरच कोविडची नवी नियमावली जारी करण्यात येईल असेही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे गत दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्या काळात केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले होते. आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी ७-८ दिवस शिल्लक असतानाच राज्यासह देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचे वादळ घोंगावत आहे. काही ठिकाणी १३ जूनला शाळा सुरू होणार आहेत.
राज्यात अजून मास्क सक्ती नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मास्क सक्ती करायची की नाही याबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येईल. देशातील टाळेबंदी आणि मास्क सक्तीला अडीच वर्षापासून जेरीस आलेल्या अनेकांचा विरोध आहे. मात्र शिथिलीकरणाचे दुष्परिणाम आपण कोरोनाच्या दुस-या लाटेत पाहिले आहेत. कोरोनाने आपल्या भुलभुलैय्याच्या पहिल्या खेळात आपला हिसका दाखवला होता परंतु त्याची तिसरी लाट आपण बोथट केली होती.आता त्याच्या भुलभुलैय्याच्या दुस-या भागात त्याची डाळ अजिबात शिजणार नाही याबाबत दक्ष राहायला हवे. सरकारने लोकहितासाठी केलेल्या कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन केले पाहिजे. अर्थात सधन वर्गाने हे नियम मोडू नयेत यासाठी सरकारने परिस्थितीनुरूप नियमावली तयार करणे आवश्यक आहे तसे न झाल्यास सधन वर्गाने केलेल्या मजेची किंमत सर्वसामान्यांना चुकवावी लागेल.