28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसंपादकीयघोषणांचे थरावर थर !

घोषणांचे थरावर थर !

एकमत ऑनलाईन

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नवे सरकार अस्तित्वात आल्यापासून शासन निर्णयाचे थरावर थर रचले जात आहेत. अशाच एका निर्णयानुसार दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असून राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली तसेच गोविंदांना पाच टक्के खेळाडू कोट्यातून सरकारी नोक-यांसाठीही आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा द्यावा आणि त्यानिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे आता गोविंदांना वर्षभर मानवी मनो-याचा खेळ खेळता येईल. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि राज्य सरकारतर्फे बक्षिसे मिळावीत यासाठी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा स्पर्धा भरविण्यात येतील. सरकारी नोक-यांमध्ये ५ टक्के राखीव जागा असतात.

मानवी मनो-यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्याने गोविंदांनाही आता खेळाडूंच्या कोट्यातून सरकारी नोक-यांसाठी अर्ज करता येईल. हे सारे खरे असले तरी आता मुळात सरकारी नोक-या आहेत कुठे हाच संशोधनाचा विषय आहे. कुठलाही खेळ असो त्याला नियम असतात, त्याच्या स्पर्धा असतात, खेळाचा नियमित सराव केला जातो. त्यामुळे ‘दहीहंडी’ हा प्रकार ‘खेळ’ यात बसवता येत नाही. तरीही ‘साहसी खेळ’ असे गोंडस नाव देऊन राज्य सरकारने मोठी चूक केली आहे. हा खेळ खेळणा-या तरुणांना सरकारी नोकरीत आरक्षण घोषित केल्याने आणखी गोंधळ वाढणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर हंडीचे महासंघ होतील, त्यात राजकारण होईल, आरोप होतील नि सगळा सावळा गोंधळ होईल, असा एक मतप्रवाह आहे. दहीहंडी या पुरातन खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे काही जणांनी स्वागत केले आहे मात्र मुळात खेळाडू जखमी होऊ नये यासाठी काय करणार ते स्पष्ट करण्यात आलेले नाही, असा आक्षेप घेतला आहे. कोणत्याही खेळात खेळाडू मृत्युमुखी पडणार नाही किंवा जखमी होणार नाही यासाठी नियम आणि त्याची कार्यवाही अनिवार्य असते. म्हणजे सर्कसमध्ये असते तशी जाळी प्रत्येक दहीहंडीभोवती असणे अनिवार्य करावयास हवे, अशी सूचनाही केली जात आहे. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी अनेक वर्षापासून दहीहंडी पथके आणि गोविंंदांकडून करण्यात येत होती. २०१५ मध्ये तत्कालिन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेत या निर्णयाला विरोध झाला होता.

कारण खेळाचा दर्जा देण्यासाठीची आवश्यक ती पूर्तता झाली नव्हती. खेळाला मान्यता देताना त्याला नियमाच्या चौकटीत बसविणे, त्यासाठीच्या अटी तयार करणे आवश्यक असते. या संदर्भात अहवालही सादर करण्यास सांगण्यात आले होते परंतु नंतरच्या काळात दहीहंडी उत्सव न्यायालयाच्या निर्बंधांच्या कचाट्यात सापडला. कोरोना काळात तर सारेच ठप्प होते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले नि एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आले. सणांच्या तोंडावर सरकार सत्तेवर आले. या सरकारने सणांवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच दहीहंडी उत्सवाला झळाळी मिळाली. हा उत्सव प्रामुख्याने ठाणे-मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा मिळाला, तसेच अनेक सवलतींचा वर्षावही झाला. दहीहंडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा उत्सव म्हणूनच ओळखला जातो. मनोरे उभारायचे आणि हिंमतीने हंडी फोडून दहीकाला खायचा यातच सा-यांचा आनंद सामावला होता. मातीच्या हंडीच्या खापराचा तुकडा मिळाला तर तो धान्याच्या कणगीत ठेवला जायचा, त्यामुळे बरकत येते, अशी भाबडी समजूत होती. परंतु आता काळ बदलला आणि उत्सवाचे स्वरूपही बदलले. आता त्याचे बाजारीकरण झाले. त्याला कॉर्पोरेट चकाकी आणि सेलिब्रिटींमुळे झळाळी मिळाली.

या उत्सवामुळे काही प्रमाणात का होईना राजकारणाला राजकीय नेत्यांची रसद मिळाली आहे. स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणा-या मानवी मनो-यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आता राजकीय हंड्या फु टू लागल्या आहेत. दहींडीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी ‘गोविंदांना’ सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणाची घोषणा केली. मात्र अशा घोषणा करताना सकारात्मक व नकारात्मक बाबींचा विचार होणे आवश्यक असते. गोविंदा पथकात सहभागी सदस्य किती शिकलेला आहे, या पथकात वरच्या थराला लहान मुले असतात, त्यांचा ‘रेकॉर्ड’ कसा ठेवणार असे अनेक मुद्दे आहेत. भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात, मनात आले आणि जाहीर केले असे होत नाही, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवून देशाला व राज्याला जागतिक स्तरावर लौकिक प्राप्त करून देणा-या खेळाडूंसाठी असलेल्या आरक्षणात गोविंदांनाही वाटेकरी करण्याचा निर्णय आरक्षणाच्या मुख्य उद्देशालाच बाधा आणणारा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

गोविंदांना खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याची घोषणा विधानसभेत केल्यानंतर स्पर्धा परीक्षार्थीनी या निर्णय विरोधात भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे अभ्यास करणा-या उमेदवारांवर अन्याय होईल, असा स्पर्धा परीक्षार्थींचा आक्षेप आहे. रखडलेल्या पदभरतीच्या मूळ प्रश्नाला बगल देत केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींनी आता अभ्यास सोडून दहीहंडी स्पर्धेत सहभाग घ्यायचा का, असा प्रश्न विद्यार्थी करीत आहेत. समाज माध्यमातूनही गोविंदांना खेळाडू आक्षरणाचा लाभ देण्याच्या निर्णयाची खिल्ली उडविली जात आहे. स्पर्धा परीक्षेच्या फे -यात अडकण्यापेक्षा पाच टक्क्यात नोकरीसाठी सरळ दहीहंडीला लटकावे, असे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. दहीहंडीचा उत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा केला जात होता परंतु गत काही वर्षात त्याला इव्हेंटचे स्वरूप प्र्राप्त झाले आहे नि राजकीय नेते त्यातून आपला स्वार्थ साधू पाहात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या