21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसंपादकीयपदकांची लयलूट

पदकांची लयलूट

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस भारतीयांसाठी ‘सुवर्ण दिन’ ठरला. भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पाच सुवर्णपदकांसह एकूण १३ पदकांची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धा समाप्तीच्या पूर्वसंध्येला भारताने एकूण ६१ पदके मिळवली आहेत. यात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. सलग सहा राष्ट्रकुल स्पर्धांत भारताला ५० पेक्षा अधिक पदके मिळवण्यात यश आले आहे. यंदाच्या स्पर्धेत न्यूझिलंडला मागे टाकून भारताने पदक तालिकेत चौथा क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेचा आता एकच दिवस शिल्लक असल्याने एकूण सर्वाधिक पदके मिळवण्याचा स्वत:चा विक्रम भारताला मोडता येणार नाही हे स्पष्ट आहे. २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण १०१ पदकांची कमाई केली होती. बर्मिंगहॅममध्ये अखेरच्या दिवशी भारताला आणखी पाच सुवर्णपदके मिळतील अशी आशा आहे. बॅडमिंटनमध्ये दुहेरीत सात्विक साईराज-चिराग शेट्टी, टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत शरथ कमल तर पुरुष हॉकीत भारतीय हॉकी संघाकडून अपेक्षा आहेत.

हॉकीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला तगड्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करावे लागेल. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत २६ सुवर्णसह एकूण ६६ पदकांची कमाई करत भारताने तिसरा क्रमांक मिळवला होता. यात ७ सुवर्णपदकांसह एकूण १६ पदके शूटिंग स्पर्धेत मिळवली होती. म्हणजे एकूण पदकांपैकी एक चतुर्थांश पदके शूटिंग स्पर्धेत मिळाली होती. यंदाच्या स्पर्धेत शूटिंग स्पर्धेचा समावेश नाही. असे असले तरी यंदाच्या स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या ६१ चा आकडा गाठला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत भारताने १२ क्रीडाप्रकारांत पदके मिळवली आहेत. यात सर्वाधिक १२ पदके कुस्ती स्पर्धेत मिळाली आहेत. यात ६ सुवर्णपदकांचा समावेश आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्यपदके मिळवली होती. यंदाच्या स्पर्धेत १२ क्रीडा प्रकारांत भारताने किमान एकतरी पदक मिळवले आहे. कुस्ती स्पर्धेत १२ कुस्तीपटूंचा सहभाग होता. प्रत्येकाने पदक मिळवले आहे. यात सहा सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्यपदके आहेत. कुस्ती स्पर्धेत तंत्राला विशेष महत्त्व आहे. भारतीय पैलवान गुणवत्तेत कमी नाहीत. मात्र ते तांत्रिक कौशल्यात थोडेसे कमी पडतात. त्या संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते अधिक भरघोस यश मिळवू शकतील. कुस्ती हा रांगडा खेळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय होता. मातीत खेळल्या जाणा-या कुस्तीचे फड गावागावांत रंगायचे. आंदळकर, मारुती माने, हरिश्चंद्र बिराजदार यासारख्या पैलवानांनी एक काळ गाजवला होता. नंतर मातीतली कुस्ती गादीवर (मॅट) गेली आणि महाराष्ट्रातल्या पैलवानांचा बोलबाला कमी झाला.

तरीसुद्धा हरिश्चंद्र बिराजदारने तंत्राशी जुळवून घेत मॅटवरही आपले कौशल्य सिद्ध केले. हरिश्चंद्र हा उमरगा तालुक्यातील रामलिंग मुदगडचा. महाराष्ट्राची पताका फडकवत ठेवण्यात त्याचा वाटा मोलाचा आहे. महाराष्ट्रात अधूनमधून कुस्त्यांचे फड रंगतात परंतु मातीतली दंगल मॅटवर हैदोस घालताना दिसत नाही. येथील पैलवानांना तांत्रिक कौशल्यात रस दिसत नाही. अर्थात त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि मार्गदर्शन त्यांना मिळत नाही हेही तितकेच खरे. यंदाच्या स्पर्धेत कुस्ती पाठोपाठ वेटलिफ्टर्सनी शानदार प्रदर्शन केले. वजन उचलण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी १० पदके पटकावली. यात प्रत्येकी तीन सुवर्ण आणि रौप्य तसेच ४ कांस्यपदकांचा समावेश आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अंचिता शेऊलीने सुवर्णपदक पटकावले. मीराबाईचे तर हे सलग दुसरे सुवर्ण. मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत भारताला ३ सुवर्ण, १ रौप्य आणि तीन कांस्य अशी ७ पदके मिळाली. निखत झरीन, अमित पंघाल आणि नीतू गंधासने सुवर्ण कमाई केली. याआधी निखतने विश्व अजिंक्यपदही पटकावले आहे. टेबल टेनिसमध्ये आतापर्यंत ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य मिळाले आहे. मिश्रदुहेरीत शरथ कमल-श्रीजाने तर पॅरा टेटेमध्ये भाविना पटेलने सुवर्ण कमाई केली. पुरुष एकेरीत शरथला सुवर्ण कमाई करण्याची संधी आहे. पॅरा टेटे स्पर्धेत सोनलबेन पटेलने कांस्यपदक पटकावले आहे. अचंता शरथ कमल आणि जी. साथियन जोडीने रौप्यपदक मिळवले. यंदाच्या स्पर्धेत अ‍ॅथलिटपटूंनी कमाल केली.

तिहेरी उडी प्रकारात एल्डहोस पॉलने सुवर्ण तर अब्दुल्ला अबुबाकेरने रौप्य मिळवले. या स्पर्धेतील भारताचे कांस्य थोडक्यात हुकले. तिहेरी उडी प्रकारात एकाच वेळी दोन भारतीय खेळाडूंनी पदके पटकावण्याची ही पहिलीच वेळ. याआधी मोहिंदरसिंग गिलने १९७० आणि ७४ मध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर रंजीत महेश्वरी (२०१०) आणि अरविंदरसिंगने (२०१४) प्रत्येकी एक कांस्य मिळवले होते. चालण्याच्या स्पर्धेत संदीप कुमार तर भालाफेकीत अन्नू राणीने कांस्यपदके दिली. चालण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी प्रियंका गोस्वामी फॅशनेबल कपड्यांची शौकिन आहे. यंदाच्या स्पर्धेत प्रथमच महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा समावेश होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ९ धावांनी पराभूत झाला. ऑस्ट्रेलियाला प्रथम विजेता होण्याचा मान मिळाला. त्यांना सुवर्ण तर भारताला रौप्य पदक मिळाले. या सामन्यात एक धक्कादायक प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाची एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असूनही तिला खेळवण्यात आले होते. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे आणि प्रियंका गोस्वामी यांनी रौप्यपदकांची भर घातली. अविनाशने तीन हजार स्टिपलचेस प्रकारात तर प्रियंकाने १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. अविनाशचे सुवर्णपदक केवळ दशांश ५ सेकंदाच्या फरकाने हुकले. राष्ट्रकुल स्पर्धेत अविनाशच्या रौप्यपदकाने केनियाच्या वर्चस्वाला शह बसला एवढे मात्र खरे. कारण या स्पर्धेत १९९८ पासून २०१८ पर्यंत प्रत्येक स्पर्धेत पहिले तिन्ही क्रमांक केनियाच्या धावपटूंचे होते.

यंदा प्रथमच हा क्रम चुकला. चालण्याच्या स्पर्धेत भारताला १२ वर्षांनंतर पदक मिळाले आहे. यापूर्वी २०१० मध्ये सर्वप्रथम हरमिंदरसिंगने २० कि. मी. चालण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. स्क्वॅशमध्ये भारताच्या सौरव घोषालने कांस्यपदक जिंकले. एकेरीत पदक जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ. विविध क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडूंनी आपले नैपुण्य दाखवले आहे. ते गुणवत्तेत कमी नाहीत. त्यांना गरज आहे ती आर्थिक पाठबळ अन् कौशल्य मार्गदर्शनाची. पदकविजेत्यांना सरकारतर्फे बक्षीस मिळतेही परंतु ब-याचवेळा ते त्यांना वेळेवर मिळत नाही असेही दिसून आले आहे. दिल्लीची कुस्तीपटू दिव्या काकरानने कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्याबद्दल तिचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन केले. त्याला उत्तर देताना दिव्या म्हणाली, २० वर्षांपासून मी दिल्लीत राहते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवली परंतु सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. दुर्दैव दुसरे काय! अपेक्षा केल्याप्रमाणे पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत कॅनडाच्या मिशेल ली ला २१-१५, २१-१३ असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.याच स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनने मलेशियाच्या यॉन्गला १९-२१, २१-९, २१-१६ असे पराभूत करून सोनेरी पदक मिळवले. भारताने आतापर्यंत ५७ पदके जिंकली आहेत. यात २० सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या