36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसंपादकीयआशेची गुढी उभारू या!

आशेची गुढी उभारू या!

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटाने मागच्या वर्षी गुढी पाडव्यालाच देशात निराशेचे मळभ निर्माण केले होते आणि आता वर्ष पूर्ण होत आले तरी हे मळभ कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर निराशेचे हे मळभ दुप्पट तीव्रतेने चाल करून आले आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि ती पहिल्या लाटेपेक्षा जास्त तीव्र ठरली आहे. हे होणे अनपेक्षित मानता येणार नाही कारण जगभर कोरोनाच्या अशा लाटा येत राहणार, हे जगभरातील तज्ज्ञांनी, संशोधकांनी आपल्याला कानीकपाळी ओरडून मागच्या वर्षभरापासून सांगितलेलेच होते. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्यावर वेळीच उपाययोजना करण्यात राज्यकर्त्यांना, ना देशाच्या, ना राज्यांच्या, स्वारस्य नव्हते कारण या राज्यकर्त्यांसमोर त्यापेक्षाही अत्यंत प्राधान्याच्या व स्वारस्याच्या अनेक गोष्टी होत्या व आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांनीच आपल्या सोयीनुसार व गरजेनुसार कोरोना पराभूत झाला, हद्दपार झाला असे चित्र निर्माण होण्यासाठीच्या अनेक गोष्टी अप्रत्यक्षरित्या केल्या! जंगी मेळावे घेतले, निवडणूका घेतल्या, परस्परविरोधात आंदोलने केली, जंगी शक्ती प्रदर्शने घडवत हजारो कार्यकर्ते जमा केले. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य जनताही नेते मंडळीच्या अनुकरणप्रियतेतून नेत्यांप्रमाणेच कोरोनाच्या दहशतीतून बाहेर पडली, भयमुक्त झाली.

जंगी लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, पार्ट्या, पर्यटन, नाक्यावरच्या टप-यांवरील कट्ट्याच्या मैफली, वगैरे वगैरे सगळे जोमात व जोशात सुरू झाले. या जोशात व पुर्नस्वातंत्र्य प्राप्तीच्या अत्यानंदात साहजिकच कोरोना संकट रोखण्यासाठीच्या निर्बंधाच्या व स्वयंशिस्तीच्या त्रिसुत्रीला हरताळ फासला गेला. त्यातच कोरोनावर संशोधकांना लस सापडल्याने व ती तातडीने उपलब्धही झाल्याने तर कोरोनाला पराभूत केल्याच्या अत्यानंदात कैकपटींनी भर घातली. असो! मात्र, कोरोना विषाणू आपले कर्तव्य विसरला नाहीच. त्याने दुप्पट जोमाने हल्ला चढवला आणि त्याच्या हल्ल्याने आता पुन्हा एकवार सर्वांचीच बोबडी वळली आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय परंपरेप्रमाणे यासाठी एकमेकांकडे बोट दाखवत दोषारोपणाची स्पर्धाच रंगली आहे. यात सरतेशेवटी हा सगळा दोष जनतेचाच कारण जनताच बेफिकीर आहे, यावर राजकीय नेत्यांचे, मग ते सत्तेत असो की, विरोधात, एकमत होणे अटळच कारण एवढ्या एका दाव्यावरच या देशात राजकारण होऊ शकत नाहीच!

जनतेवर दोष ठेवला की, राज्यकर्त्यांची, प्रशासनाची जबाबदारी संपते आणि याबाबत जे काही करणे आवश्यक होते किंवा आहे, त्याची इतिकर्तव्यही संपते. शिवाय दोष जनतेवर आल्याने जनताही परस्परांना बोटे दाखवून समाधान शोधण्यात गर्क होते व आपसूकच या ‘ब्लेम गेम’च्या धूळवडीत मूळ मुद्दाच अडगळीत पडतो आणि तो म्हणजे संशोधक, तज्ज्ञांंनी दिलेल्या इशा-यांकडे गांभीर्याने लक्ष देवून देशात, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही किंवा आलीच तर ती वेळीच थोपविता येईल यासाठी शासन, प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? कुठली प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज केली, सक्षम, तत्पर बनवली? देशातल्या व राज्यातल्या राज्यकर्त्यांनी जनतेला या मूळ प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर द्यावे आणि मग निर्माण झालेल्या सध्याच्या स्थितीसाठी जनतेला खुशाल आरोपीच्या पिंज-यात उभे करावे. मात्र, या मूळ प्रश्नाचे उत्तरच द्यावे लागू नये म्हणूनच तर जनतेला दोषी ठरवण्याच्या ‘फंड्या’वर राज्यकर्ते, विरोधक, प्रशासन, यंत्रणा यांचे सदोदित एकमत असते.

असो! आता हे सगळे उगाळण्याची वेळही टळून गेलीय कारण सध्या परिस्थितीने यावर्षीच्या गुढी पाडव्यावरही निराशेचे, भीतीचे, दहशतीचे मळभ दाटले आहे. त्यामुळे हा अंधार भेदायचा कसा? हाच या घडीचा सर्वात कळीचा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अथवा मार्ग हा तज्ज्ञांकडे, संशोधकांकडे व अभ्यासकांकडे आहे, राज्यकर्ते अथवा प्रशासनाकडे नाही. मात्र, राज्यकर्ते वा प्रशासन सर्वज्ञानी व सर्वव्यापी असल्याने अर्थातच हे सत्य मान्य करणार नाहीतच. कारण तज्ज्ञ काय सांगतात त्यापेक्षा राज्यकर्ते व प्रशासनाला त्यांच्या आवडत्या, निर्धोक व हमखास यशस्वी ‘कडकडीत बंद’च्या फंड्यावरच जास्त विश्वास तर आहेच वर हा फंडा परमप्रिय आहे. त्यामुळे याशिवाय दुसरा पर्यायच नाही हेच राज्यकर्त्यांचे ठाम मत आणि तेच जनतेच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न होणे अटळच! राज्यकर्ते तज्ज्ञांचा आधार फक्त स्वत:चा निर्णय जनतेच्या गळी उतरवण्यासाठी जेवढा सोयीचा तेवढाच घेतात. तेव्हा या फाफट पसा-यापेक्षा तज्ज्ञ काय सांगतायत याकडे जनतेने गांभीर्याने लक्ष देणे इष्ट!

जगभरातील तज्ज्ञ व संशोधकांच्या मतानुसार, कोरोनावर सध्याच्या घडीला लसीशिवाय आपल्याकडे दुसरे कुठलेच ‘अस्त्र’ उपलब्ध नाही. अशावेळी आपल्या हाती प्रतिबंधात्मक उपायांची जी ‘ढाल’ आहे, म्हणजे मास्कचा वापर, स्वच्छता, सुरक्षित सार्वजनिक वावर, तिचाच आपण आपल्या संरक्षणासाठी काटेकोर व काळजीपूर्वक वापर करायला हवा. यापुढच्या जीवनात आपल्याला कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा तर या स्वयंशिस्तीला जीवनशैलीचा भाग बनवल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. त्याच्या जोडीला लसीचे जे अस्त्र प्राप्त झाले आहे त्याबाबतच्या कुठल्याही अफवा, अपप्रचार, शंका-कुशंकांकडे अजिबात लक्ष न देता ती तातडीने घेणे गरजेचे! लस ही कोरोनावरचे औषध नाही. ती घेतल्याने आपण कोरोनापासून कायमचे मुक्त होत नाही. लस आपल्याला कोरोनाशी लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यातून मृत्यूचा गंभीर धोका टळतो एवढेच! त्यामुळे लस घेतली तरी प्रतिबंधात्मक उपाय हे अनिवार्यच! याचाच वापर करून आपण कोरोनाची सर्व आक्रमणे थोपवू शकतो. कारण कोरोनावर जगाला अद्याप तरी औषध सापडलेले नाही. त्यामुळे शरीरात कोरोनावर मात करण्याची प्रतिकार शक्ती निर्माण होणे, हाच सध्या तरी एकमेव उपचार आहे.

बाकी उपचारांच्या नावावर दिली जाणारी औषधे व इंजेक्शन किंवा थेरपीज हे निव्वळ प्रयत्न व प्रयोग आहेत, ठोस निष्कर्ष नाहीत. लक्षणविरहीत, सौम्य व मध्यम लक्षणे असणा-यांनी केवळ प्रचारतंत्र, अफवा व निराधार अशास्त्रीय चर्चांना बळी पडून स्वत:चे नुकसान वाढवून न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यास गांभीर्याने घेत दोन आठवडे घरीच विलगीकरणात राहून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करणेच हिताचे. गंभीर व अतिगंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल होणे गरजेचे ठरते कारण त्यांच्या स्थितीवर बारकाईने वैद्यकीयदृष्ट्या लक्ष ठेवेण अत्यावश्यक असते. ते ही या रुग्णांना असणारे इतर रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा ऑक्सीजनची कमतरता दूर करण्यासाठी! गंभीर व अतिगंभीर रुग्णांव्यतिरिक्त इतरांना सहसा ऑक्सिजनची गरज भासत नाही की, प्रयोग म्हणून दिल्या जाणा-या औषधांची ही! तेव्हा ही शास्त्रीय माहिती समजून घेवून जनतेने ‘पॅनिक’ होणे टाळायला हवे!

आपण प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष करतो व कोरोनाची लागण झाल्याचे कळले की, घाबरून जातो. त्यातूनच अकारण प्रचंड गोंधळाची व भीतीची स्थिती निर्माण होते. त्याचा आधार घेवून बाजार तापवला जातो आणि लूट सुरू होते. परिस्थिती ‘अनर्थकारी’ झाल्याचे दावे सुरू होतात आणि मग त्याचा शेवट ‘ठाणबंदी हाच उपाय’ यावर होतो.एकदा अनुभव घेवूनही त्यातून आपण जनतेने शहाणपण न घेतल्याने आता दुस-यांदा त्याच अनुभवाला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येवून ठेपली आहे. किमान आता तरी नकारात्मकता व नैराश्याच्या आपल्याभोवती टाकल्या गेलेल्या जाळ्यातून आपण शहाणपणाचा आधार घेत स्वत:ची सुटका करून घेण्याच्या संकल्पाची गुढी उभारायला हवी! तरच कोरोनापेक्षाही कैकपटीने घातक असे अर्थसंकट निर्माण करणा-या टाळेबंदीच्या ‘रोगापेक्षा उपचार भयंकर’ या स्थितीतून आपल्याला आपली सुटका करून घेणे शक्य होईल, हे मात्र निश्चित!

भारत हिंदूराष्ट्र घोषित करा; दहशतवाद थांबेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या