नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बंड लवकर थंड होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शिंदे आणि शिवसेना पक्षासमोरील पेच वाढतच चालला आहे. कारण दोघेही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे असा दावाही त्यांनी केला आहे. सध्या शिंदे बंडखोर आमदारांचे मनोबल टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत.
शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांना ३७ आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केले आहे. मात्र विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाच्या निवडीला मान्यता दिल्याने आता या विषयावर कायदेशीर लढाई होईल असे दिसते. सध्या दोन्ही बाजू एकमेकांचे पतंग काटण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्ही दोन तृतीयांश बहुमताचे पत्र सचिव, उपाध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे अल्पमतात असलेला व्हिप आणि गटनेता आम्हाला निलंबित करू शकत नाही असा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बंडखोर शिवसेना आमदारांना निलंबित करण्याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. गुवाहाटीत गेलेल्या शिवसेनेच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची तसेच मंत्री दर्जा दिलेल्या आमदारांची संबंधित खाती काढून घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. बंडखोरांचा ताफा सुरतला नेल्यानंतर त्यांना धीर देताना शिंदे म्हणाले होते की, आपल्यामागे महाशक्ती आहे, आपल्याला काही कमी पडणार नाही. ही महाशक्ती म्हणजे भाजप हे ओपन सिक्रेट होते. परंतु दोन दिवसांपूर्वी आपली टोपी फिरवताना ते म्हणाले की, आपल्या पाठिशी असलेली महाशक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शक्ती ! बंडखोर शिंदे गटाचा ताफा सुरतमध्ये दाखल झाला.
तेथे एक दिवस राहिल्यानंतर हा ताफा गुवाहाटीत दाखल झाला. या ताफ्याचा विमान प्रवास खर्च, खाण्यापिण्याचा खर्च, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च महाशक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी केला काय? या ताफ्याचा दररोजचा खर्च ८० लाख रुपये आहे म्हणे ! आता तर एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्याच्या अनेक भागात शिवसेना समर्थक कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर घोषणाबाजी करत निषेध मोर्चे काढले आणि त्यांच्या फलकांना काळे फासले. बंडखोर आमदार राज्यात परतल्यावर संघर्ष आणखी वाढणार हे लक्षात आल्याने बंडखोर ताफ्याने आपला गुवाहाटीतला मुक्काम ३० जूनपर्यंत वाढवला आहे. पाच दिवस झाले अजूनही बंडोबा थंडोबा होताना दिसत नाहीत. गत चार दिवस झाले गुवाहाटीच्या रेडिसन ब्लूमध्ये बंडखोर आमदार मुक्कामाला आहेत. त्यांचे बुकिंग २८ जूनपर्यंत होते ते आता दोन दिवसांनी वाढवण्यात आले आहे. सध्या राजकीय पेच ‘जैसे थे’ असल्याने खबरदारी म्हणून बुकिंग वाढवण्यात आले आहे. राज्यातले आमदार या बंडाच्या निमित्ताने हॉटेलमध्ये आहेत असे नव्हे. याआधीही त्यांचा मुक्काम राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने हॉटेलमध्येच होता. फोडाफोडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले होते. त्यांच्यावर कोट्यवधीचा खर्च झाला तरीही गद्दारी झालीच! हा अवाढव्य खर्च कोणी सोसला असेल? आघाडीत फूट पडल्यामुळे भाजपचे सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू आहेत.
२४ जूनच्या रात्री देवेंद्र फडणवीस विशेष विमानाने इंदूरमार्गे बडोद्यात दाखल झाले. गुवाहाटीहून एकनाथ शिंदेही दिल्लीमार्गे आले आणि दोघांची गुप्त बैठक झाली म्हणे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहासुद्धा उपस्थित असल्याची चर्चा आहे. पहाटे अडीच ते चार या वेळेत फडणवीस-शिंदे यांची भेट झाली. शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या गुप्त भेटीमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. बंडखोर मंडळी आधी गुजरातला गेली आणि नंतर आसाममध्ये दाखल झाली. दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. भाजपचा खेळ रात्रीच का चालतो? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असा शपथविधी पहाटे झाला होता. त्यावेळी अजित पवारांनी बंड केले होते मात्र शरद पवार यांनी ते बंड ८० तासांत मोडीत काढले होते. म्हणून ‘रात्रीस खेळ चाले, हा खेळ भाजपचा’ असे म्हटल्यास गैर ते काय? महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ ला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यानंतर आम्ही हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच कोसळेल असे फडणवीस अनेकवेळा म्हणाले होते.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपने बाजी मारली अन् २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेना कोणीच हायजॅक करू शकत नाही मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला हायजॅक केले आहे. म्हणून त्याविरुद्ध आमचा लढा आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत, असे बंडखोर दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेत हिंदुत्वाचा आग्रह म्हणजे बंडखोरी कशी, असा सवाल पैठणचे शिवसेनेचे आमदार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे. मी कालही, आजही आणि उद्याही शिवसैनिक असेही ते म्हणाले. शिंदेंसह गुलाबराव पाटील, दादा भुसे, भुमरे, शंभुराज देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.