22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeसंपादकीयलेटरबॉम्बचा ‘प्रताप’!

लेटरबॉम्बचा ‘प्रताप’!

एकमत ऑनलाईन

अलीकडे राजकारणात लेटरबॉम्बचे पेव फुटले आहे. जो तो उठतो आणि लेटरबॉम्ब टाकून मोकळा होतो. स्वत: भ्रष्टाचाराच्या गाळात रुतायचे आणि गाळ नाका-तोंडात जाऊ लागला की, त्यातून सुटका करून घेण्यासाठी एखादा लेटरबॉम्ब टाकून आपण कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. स्वत:चे अस्तित्व दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो. जे खरेच स्वच्छ आहेत त्यांना भ्यायचे काय कारण? ‘कर नाही तर डर कशाला’? परंतु सहसा असे होत नाही, कारण आपण कुठे तरी माती खाल्लेली असते. भ्रष्टाचाराविरोधात तुमचा पाया मजबूत असेल तर लेटरबॉम्बचा आसरा घेण्याची, लेटरबॉम्ब टाकण्याची वेळच येणार नाही. राज्याचे माजी पोलिस महासंचालक परमबीरसिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांनीही लेटरबॉम्ब टाकण्याचा पराक्रम गाजवला होता.

राजकीय व्यक्ती खरोखरच स्वच्छ असेल तर तिला स्फोटक वक्तव्य करण्याची गरजच भासणार नाही. एखाद्या पक्षातील काही व्यक्ती आपले मत व्यक्त करतात तेव्हा त्यामागे खळबळ माजवण्याचा हेतू नसतो तर पक्षात सुधारणा व्हावी हा उद्देश असतो. सत्ताधा-यांची सत्ता खिळखिळी करण्यासाठी विरोधी पक्ष अशा लेटरबॉम्बचा स्फोट घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. सध्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे भ्रष्टाचार प्रकरण गाजत आहे. ‘टॉप्स कंपनी’कडून करण्यात आलेल्या पैशाच्या गैरव्यवहारासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कंत्राटात झालेल्या गैरव्यवहारातही सरनाईक यांचे नाव आले होते. ईडीने सरनाईक यांच्या कंपनीशी संबंधित टिटवाळ्यातील ११२ भूखंडांवर जप्ती आणली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाडी टाकण्यात आल्या.

सरनाईक यांच्या व्यवसायातील भागीदाराला अटक करण्यात आली. सुमारे पाच हजार कोटींपेक्षा अधिक घोटाळ्यांत सरनाईक यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. केंद्रीय यंत्रणांनी सरनाईक यांच्याभोवती फास आवळल्यानंतर त्यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून अजून तुटण्याआधी सेनेने भाजपशी जुळवून घ्यावे असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपने म्हटले आहे की, ही सच्च्या शिवसेना कार्यकर्त्याची भावना आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरची शिवसेनेची आघाडी ही अनैसर्गिक असल्याचे आम्ही गत दीड वर्षापासून सांगत आहोत. काँगे्रसने कायमच अल्पसंख्याकांचे लांगुलचालन केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाशी कायम संघर्ष केला आणि आता शिवसेना त्यांच्याबरोबरच सत्तेत आहे. उद्धव ठाकरे यांची तयारी असेल तर आमचे केंद्रीय नेते युतीबाबत विचार करतील. या उलट किरीट सोमय्या म्हणतात, सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त आहेत. परंतु सर्व घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणार आहेत. सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते फोडत आहे. त्यामुळे आता सेनेने भाजपशी जुळवून घ्यावे. सरनाईक यांचे पत्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. सरनाईक यांच्या पत्रामागील भूमिका वेगळी असू शकते. शिवसेनेतील नेते किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी वा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची उदाहरणे नाहीत.

पत्रावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा पत्रात उल्लेख आहे. हा गंभीर आरोप आहे. विनाकारण त्रास कोण कोणाला देतेय, तो त्रास काय आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बचे चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदी भाजप नेत्यांनी स्वागतच केले आहे. यावरून भाजप किती ‘सत्तातुर’ आहे ते दिसून येते. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या फे-यात अडकलेल्या एका आमदाराच्या पत्राला किती किंमत द्यावी हेही त्यांना कळेनासे झाले आहे. महाआघाडी अनैसर्गिक असल्याचा दावा चंद्रकांत पाटील करतात पण ती नैसर्गिक की अनैसर्गिक हे जनता ठरवेल ना!… तुम्ही काळजी कशाला करता? सरनाईक यांच्यावर अनेक आरोप असताना त्यांना भाजपने ‘सच्चा शिवसैनिक’ म्हणणे हास्यास्पद नव्हे काय? यावरून भाजप सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे हेच सिद्ध होते.

अर्थात याआधी भाजपने भल्या पहाटे शपथविधी उरकला होता तेव्हाच ते सिद्ध झाले होते. लेटरबॉम्बचे स्वागत करणारे भाजपनेते काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर भाजप मोर्चाची झालेली पिटाई व त्याचे शिवसेनाप्रमुखांनी केलेले समर्थन कसे काय विसरू शकतात? पत्रात काही शिवसेना नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास होतो आहे म्हणून मोदींशी जुळवून घ्यावे असा उल्लेख आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदी शिवसेना नेत्यांना त्रास देतात असा अर्थ होतो, तरीही पत्राचे स्वागत? ‘मुंबै बँक गैरव्यवहाराला मी काडीचीही किंमत देत नाही’ असे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले होते. त्यांच्यावर दावा दाखल करण्यात आला तेव्हा ते शिवसेनेत होते परंतु नंतर या दाव्यापासून वाचण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये उडी मारली होती. त्यामुळे दरेकरांनी सरनाईकांचे समर्थन करणे योग्य ठरते. पंतप्रधान मोदी आणि भाजपशी जुळवून घेतल्यास माझ्यासह अनेक नेत्यांना आणि शिवसेनेला भविष्यात लाभ होईल असे सरनाईक म्हणतात. सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे ‘विनाकारण’ भरलेले खटले बासनात गुंडाळले जातील. याचा सरळ अर्थ असा की, मोदी सरकार ईडी आणि सीबीआयचा राजकीय वापर करते.

एक प्रकारचा हा कबुली जबाबच म्हणावा लागेल. सरनाईक यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठीच त्यांनी जुळवाजुळवीची भूमिका घेतली हे उघड आहे. नुकतेच पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुमारे ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. भोसले यांची ईडीकडून ‘फेमा’ कायद्यान्वये सप्टेंबर २०१७ पासून चौकशी सुरू होती. परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

जेट एअरवेज पुन्हा सुरू होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या