30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeसंपादकीयसाहित्य संमेलन रंगलंय वादात!

साहित्य संमेलन रंगलंय वादात!

एकमत ऑनलाईन

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे.समुदायाने राहणे त्याला आवडते. यातूनच समाज निर्मिती होते. समाज एकभाषी असतो. म्हणजे मराठी समाज असेल तर त्याचे ब्रीद ‘मराठी असे आमुची मायबोली’ हेच असते. देशातील राज्यांची निर्मिती भाषिकतेच्या आधारावरच करण्यात आली आहे. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र, कन्नडिगांचा कर्नाटक, तमिळ भाषिकांचा तामिळनाडू, वंगबंधूंचा पश्चिम बंगाल आदी. एक भाषा असली की त्या त्या राज्यांचा सर्वांगीण विकास साधणे सोपे जाते. ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ यामागे तोच विचार आहे. मायबोलीचा सा-यांनाच अभिमान असतो. ‘मराठी असे आमुची मायबोली’ असे म्हणताना छाती अभिमानाने फुलून येते. परंतु फुललेल्या छातीतील हवा काढून टाकण्याचे काम आपलीच माणसे करतात.

मराठी माणूस पुढे चालला की त्याचे पाय ओढण्याचे काम मराठी माणूसच करतो! मराठी भाषेचा, साहित्याचा विकास साधण्यासाठी साहित्य महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. साहित्य हे जीवनाला मार्गदर्शन करीत असते. साहित्य हे बंधुभाव, सहिष्णुता शिकविते. म्हणूनच महामंडळ दरवर्षी विविध ठिकाणी संमेलन भरवीत असते. नवोदित कवी, लेखक यांना संमेलनाचे व्यासपीठ मिळाल्याने त्यांना आपल्यातील प्रतिभा दाखविण्याची संधी मिळते.मराठी भाषिक जगभरात पसरले आहेत. म्हणून महामंडळाने एकदा जागतिक संमेलनही आयोजित केले होते. असे असले तरी मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्या संदर्भात महामंडळाचे काय प्रयत्न आहेत ते समजायला मार्ग नाही. सध्या मात्र संमेलन स्थळावरून वाद निर्माण झाला आहे.

नाही तरी दरवर्षी संमेलनाध्यक्षपदावरूनही वाद निर्माण होतात. दरवर्षी नवे संमेलनाध्यक्ष नवे संकल्प सोडतात.परंतु त्यांच्या वर्षभराच्या कारकीर्दीत हे संकल्प सिद्धीस जाताना दिसत नाहीत. यंदाही संमेलन स्थळावरून वाद निर्माण झाला आहे. संमेलन नाशिकमध्ये व्हावे की दिल्लीत, असा वाद आहे. कोरोना महामारीमुळे यंदा संमेलन घेण्याची शक्यता साहित्य महामंडळाने फेटाळली होती. परंतु नंतर त्यांचे हृदय परिवर्तन झाले आणि यंदाही पारंपरिक पद्धतीनेच संमेलन भरविण्याचा निर्णय झाला. संमेलन आयोजित करण्याचा प्रस्ताव नाशिककरांनी आणि दिल्लीकरांनी पाठविला होता.महाराष्ट्र राज्यनिर्मितीला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त मायमराठीचा गजर सांस्कृतिक नगरी नाशिकमध्ये व्हावा या हेतूने लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव पाठविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार हेमंत टकले हे लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आहेत. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असल्याने नाशिककरांना आपले घोडे दामटणे सोपे गेले.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे, असे दिल्लीतल्या मराठीजनांची इच्छा आहे. मराठीला अजून अभिजात दर्जा मिळालेला नाही. तो पूर्ण ताकदीने केंद्र सरकारपुढे मांडता यावा आणि दिल्लीतील मराठी लोकांना आपल्या मायबोलीचा उत्सव साजरा करता यावा म्हणून ‘सरहद’ या संस्थेने संमेलनाच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे. गतवर्षीही प्रस्ताव दिला होता. परंतु त्या वेळी उस्मानाबादकरांनी बाजी मारली होती. किमान यंदा तरी आपला विचार होईल, असे दिल्लीकरांना वाटते. यंदा ‘सरहद’ संस्थेने महामंडळाला आपल्या प्रस्तावाचे स्मरणपत्रही पाठविले आहे.परंतु त्याकडे दुर्लक्ष करून महामंडळाने नाशिककरांची तळी उचलून धरली आहे, अशी दिल्लीकरांची धारणा बनली आहे. ३ जानेवारी रोजी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत महामंडळाने अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि पुणे-मुंबईतील सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. तुम्ही परस्पर निर्णय कसा घेऊ शकता, असा प्रश्न करीत ठाले-पाटील यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली.

एका राज्यात एकाच कंपनीला परवानगी द्या – राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

दिल्लीत जाऊन तेथील संमेलनस्थळाची पाहणी करावी, अशी आग्रही भूमिका पुणे-मुंबईच्या सदस्यांनी घेतली.ठाले-पाटील यांचे म्हणणे असे की, मराठी मुलुखाबाहेर घेतलेल्या संमेलनाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार नाही. यासाठी त्यांनी इंदूर, बडोदा येथे घेण्यात आलेल्या संमेलनाचे उदाहरण दिले. ठाले-पाटलांच्या म्हणण्यात तथ्यांश असला तरी मराठीचा प्रसार करण्यासाठी असे मुलुखावेगळे प्रयत्न केलेच पाहिजेत. नाशिकला संमेलन भरविल्यास शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचे निमित्त साधले जाईल, अशी काही सदस्यांची धारणा आहे. नाशिकबाबत महामंडळ एकतर्फी निर्णय घेत आहे, अशी दिल्लीकरांची धारणा बनली आहे. दिल्लीला किमान भेट तरी द्या, असे त्यांचे म्हणणे आहे. महामंडळाकडे यंदा नाशिक व दिल्ली असे दोनच प्रस्ताव आहेत. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणांना भेट देऊन आयोजनाच्या दृष्टीने जे स्थळ उत्तम असेल ते निवडावे, असे महामंडळाचीच घटना सांगते.

मग नाशिकसाठी एकतर्फी निर्णय कशासाठी? जिथे मराठी नाही तिथे संमेलनाच्या निमित्ताने पोहोचत असेल तर महामंडळाने या संधीचा नक्कीच विचार करायला हवा. साहित्य संमेलन दिल्लीत झाले तर इतर भाषिक लोकांनाही मराठीशीही जोडता येईल. मराठीचा गजर देशभर जाईल. साहित्य संमेलनासाठी पवारांना ‘छोटे’ करू नका. शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नेते नाहीत, ते संपूर्ण देशाचे नेते आहेत, असे दिल्लीकरांचे म्हणणे आहे. दिल्लीकरांनी ६७ वर्षानंतर संमेलन मागितले आहे. परंतु महामंडळाने नाशिकलाच झुकते माप दिले आहे. साहित्य हे बंधुभाव, सहिष्णुता शिकविते या तत्त्वाला विसंगत अशी साहित्य मंडळातील सदस्यांची वागणूक आहे. साहित्य संमेलन नाशिकला झाले काय किंवा दिल्लीला झाले काय वाचकांच्या साहित्य जाणीवेत यामुळे कोणतीही भर पडणार नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी संमेलन दिल्लीला घेतले तर उपयोग होईल, असे काही सदस्यांना वाटते. मराठी भाषा किती जुनी आहे तीत ज्ञाननिर्मिती किती झाली या निकषांवर हा अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे, संमेलन स्थळावरून नव्हे. अखेर संमेलन स्थळासंबंधी नाशिकनेच बाजी मारली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या