16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसंपादकीयलिटमस टेस्ट!

लिटमस टेस्ट!

एकमत ऑनलाईन

भारतीय राजकीय क्षेत्राची वाटचाल व भविष्य कसे असेल? या प्रश्नाचे संकेत देणारे राज्य म्हणून उत्तर प्रदेशचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणा-या राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीचे निकाल हे देशातल्या प्रमुख राजकीय पक्षांसाठीची ‘लिटमस टेस्ट’ तर ठरणार आहेतच पण त्यावरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची नेपथ्य रचनाही कळणार आहे. विशेषत: भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांसाठी तर ही निवडणूक भविष्याच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची व दिशादर्शक असणार आहे. तसेच प्रादेशिक पक्षांचे भवितव्य व राष्ट्रीय राजकारणातील त्यांची रणनीतीही या निकालांवर अवलंबून असणार आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याची जी घोषणा केली आहे ती अत्यंत कळीची आणि तेवढीच लक्षवेधी आहे.

प्रियंका गांधी यांच्या घोषणेची भाजपच्या नेत्यांकडून व त्यांच्या आयटी सेलकडून खिल्ली उडवण्याचा प्रयत्न लगोलग सुरू झाला असला व बसपाच्या प्रमुख मायावती यांनी ‘इलेक्शन ड्रामा’ अशी टीका त्यावर केली असली तरी काँग्रेसने महिलाराजचे हे कार्ड काढून सर्वच राजकीय पक्षांची पुरती गोची केली आहे आणि म्हणूनच भाजपसह सगळेच पक्ष त्यावर तातडीने प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत व सावध झाले आहेत! ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ ही अत्यंत आश्वासक घोषणा देत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जोरदार रणशिंग फुंकले आहे आणि त्यामागे तेवढ्याच तगड्या आकडेवारीचे गणित आहे. त्यामुळे भलेही सध्या भाजप त्याची खिल्ली उडवत असला तरी उत्तर प्रदेशातील प्रत्येक राजकीय पक्षाला काँगे्रसचा हा निर्णय अत्यंत गांभीर्यानेच घ्यावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ही ६३ टक्के होती व ती पुरुषांच्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा तब्बल चार टक्के जास्त होती.

याचा त्यावेळी भाजपला मोठा फायदा झाला होता व स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्याबद्दल महिलांचे विशेष ऋण व्यक्त केले होते. हा इतिहास विसरता किंवा नाकारता येणार नाही. राज्यातील महिला मतदारांची संख्या साडेसहा कोटींपेक्षा जास्त म्हणजे जवळपास ४६ टक्के आहे. आकडेवारीचे हे वास्तव लक्षात घेतले तर काँग्रेसच्या महिलाराजच्या घोषणेचे महत्त्व लक्षात येते. प्रियंका गांधींचा आश्वासक, आक्रमक चेहरा आणि त्याला राज्यातील महिलांची ‘महिलाराज’च्या घोषणेने मिळणारी साथ हे समीकरण जर व्यवस्थित जमले तर काँग्रेस राज्यात केवळ भाजपचेच नाही तर सर्वच राजकीय पक्षांचे गणित पलटवून टाकू शकते. प्रमुख प्रादेशिक पक्ष असणा-या सपा व बसपा यांचा महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विविध कारणे देत केला गेलेला विरोध उत्तर प्रदेशातीलच नव्हे तर देशातील महिलांनी पाहिला व अनुभवलाच आहे. तर भाजपची कथनी व करणी यातील फरक राज्यातील महिला योगी आदित्यनाथ सरकारच्या पुरुषी मनोवृत्तीच्या कारभारातून सध्या अनुभवत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात राज्यातील महिलांवरच्या अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढलेले तर आहेच पण त्यापेक्षाही अत्यंत वाईट व चिंतेची बाब म्हणजे प्रशासनाचा या घटनांकडे बघण्याचा ‘पुरुषी अहंकारी वृत्तीचा’ अत्यंत कुरूप चेहरा वेळोवेळी उघड झाला आहे.

अशा स्थितीत अत्यंत योग्यवेळी काँग्रेसने महिलांना ‘महिलाराज’ च्या घोषणेने आश्वासक साद घालणे हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचेच ठरले आहे! या घोषणेची खिल्ली उडवून किंवा त्याला ‘इलेक्शन ड्रामा’ संबोधून इतर राजकीय पक्षांना त्याचे महत्त्व कमी करता येणार नाहीच! ही घोषणा काँग्रेससाठी तर अत्यंत महत्त्वाची आहेच कारण त्याला मिळणा-या प्रतिसादावर काँग्रेसचे या राज्यातील भवितव्य ठरणार आहे. मात्र, त्यापुढे जाऊन काँग्रेसच्या या घोषणेला मिळणारा महिलांचा प्रतिसाद हा देशातील राजकारणाची कूस बदलणारा ठरू शकतो. कारण आजही गल्लीपासून दिल्लीपर्यंत महिलांना योग्य प्रतिनिधित्व व बरोबरीची वागणूक देण्याचे प्रयत्न हे प्रतीकात्मकतेच्या कक्षेच्या पलिकडे पोहोचलेले नाहीत, हेच वास्तव आहे. मात्र, प्रमुख राष्ट्रीय पक्ष असणा-या काँग्रेसची ही घोषणा उत्तर प्रदेशात यशस्वी ठरली तर ही बाब राष्ट्रीय राजकारणापासून गल्लीपर्यंतच्या राजकारणामध्ये एका मोठ्या व आश्वासक बदलाची नांदी ठरेल. या दृष्टीने काँग्रेसच्या या घोषणेचे प्रचंड महत्त्व आहे.

अर्थात ममतांच्या तृणमूल काँग्रेसने व ओडिशात बिजू जनता दलाने याअगोदर महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा प्रयोग केलेलाच आहे व त्याला चांगले यशही मिळाले आहे. मात्र, हे पक्ष प्रादेशिक पातळीवरचे असल्याने त्यांच्या या प्रयोगाचे परिणामही राज्यापुरतेच सीमित राहिले. राष्ट्रीय राजकारणावर त्याचे व्यापक परिणाम पहायला मिळाले नाहीत. मात्र, काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष हा प्रयोग जर उत्तर प्रदेशात यशस्वी करू शकला तर नक्कीच त्याची व्याप्ती वाढून राष्ट्रीय राजकारणात त्याचे महत्त्व अधोरेखित होईल व कुठल्याच राजकीय पक्षाला हे महत्त्व नाकारता येणार नाहीच! सर्वांनाच इच्छा असो की नसो, या धोरणाचा अंगीकार करावा लागेल. निव्वळ कागदावर व बोलण्यापुरतेच राहिलेल्या स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणांचे भवितव्य आता तरी बदलणार का? याचीही ही ‘लिटमस टेस्ट’ असणार आहे. काँग्रेसचा हा प्रयोग यशस्वी झाला तर या पक्षाला नवसंजीवनी व नवदिशा तर मिळणारच आहे पण राजकीय क्षेत्रात खोलवर घट्ट असलेल्या ‘पुरुषी मनोवृत्ती’लाही जोरदार हादरा बसण्यास सुरुवात होईल व सर्वच राजकीय पक्षांना हे बदल स्वीकारणे भाग पडेल. केवळ राजकीय क्षेत्रावरच नव्हे तर सामाजिक क्षेत्रावरही याचे परिणाम होण्यास सुरुवात होईल. परिवर्तनाला व बदलांना सुरुवात होईल. अर्थात हे काही लगेच घडणार नाही, त्याला वेळ लागेल, हे मान्यच. मात्र, बदलांची सुरुवात करण्याची जबाबदारी न पार पाडणा-या नेतेमंडळींना हे बदल स्वीकारावे लागणे हेच सध्या खूप मोठे यश ठरेल, हे मात्र निश्चित!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या