22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeसंपादकीयमंजुळ नाद हरपला!

मंजुळ नाद हरपला!

एकमत ऑनलाईन

ए खादा वादक त्याच्या दुर्मिळ वाद्यामुळे आणि त्या वाद्याच्या मोहक नादामुळे परिचित होतो, असा हा मंजुळ नाद त्या वादकाची ओळख बनते आणि हळूहळू रसिकांंच्या दृष्टीने हे वाद्य आणि ते हाताळणारा वादक हे एकरूप झालेले असतात. एवढे की, जिवंतपणीच तो कलाकार एक आख्यायिका बनून जातो. संतूरवादनाची अशीच आख्यायिका म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा! मंगळवारी अचानक ही आख्यायिका थांबली. राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पं. शिवकुमार शर्मा यांची वयाच्या ८५ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

त्यामुळे एक मंजुळ नाद हरपल्याचीच भावना रसिकांच्या मनी दाटून आली. ही भावना भारतीयच नव्हे तर जगभरातील संगीत रसिकांना उदास करणारीच! भारतीय संगीताचा अवकाश गायनापेक्षा व्यापक झाला कारण वादकांची वाद्यातून संगीतनिर्मितीची अफाट क्षमता! मागच्या शंभर वर्षांत भारतीय संगीत क्षेत्रात अशा अफाट क्षमतेच्या अनेक दिग्गज कलावंतांनी आपले आयुष्य वेचून आपल्या वाद्याला व त्याच्या वादनाला उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले व जगाच्या सर्व भौगोलिक सीमारेषा उल्लंघून हे संगीत अजरामर करून टाकले. त्यामुळेच या कलाकारांचे जीवन हे जिवंत आख्यायिका बनले. शहनाईवादक बिसमिल्ला खाँ, सतारवादक पंडित रविशंकर, तबलावादक अल्लारखाँ, व्हायोलिनवादक प्रभाकर जोग या नावांच्या यादीत समावेश होणारे नाव म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा अर्थात शिवजी! संतूर या लोकसंगीतापुरतेच मर्यादित असणा-या वाद्याला त्यांनी अभिजात संगीताच्या दरबारात अढळ उंचीवर नेऊन बसवले.

स्वत:सह जगभरातील कोट्यवधी संगीत रसिकांचे आयुष्य संतूरच्या मंजुळ नादाने परिपूर्ण करून टाकले. सुमारे सात दशकांचा या मंजुळ नादाचा प्रवास हा शिवजींनी त्यासाठी घेतलेले निरंतर कष्ट व त्याला त्यांच्या सर्जनाची मिळालेली जोड याचा परिपाक होता. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांचा अपवाद वगळता या मंजुळ नादाने सलग सात दशके जगभरातील रसिकांना तृप्त तर केलेच पण त्यांना या नादाने अक्षरश: वेडावूनही टाकले. हा मंजुळ नाद आता थबकला आहे. मात्र, तो कायमचा थांबणार नाही कारण तो थांबू नये याची तजवीज स्वत: शिवजींनीच अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवून केली आहे. लोकवाद्य म्हणून मर्यादित असलेल्या संतूरमध्ये स्वतंत्रपणे रागसंगीत वाजवण्याची क्षमता शिवजींनी आपली सर्व बुद्धिमत्ता, सर्जन व कष्ट लावून निर्माण केली. वाद्य हे शेवटी साधनच! त्याला अफाट क्षमता मिळवून देण्याचे श्रेय ते वाद्य वाजविणा-या वादकाच्या प्रतिभा, कल्पकता व मेहनतीलाच! या सगळ्या गुणांचा अद्भूत मिलाप शिवजींमध्ये होता आणि त्यातूनच संतूर वाद्य जगभरात कानाकोप-यात पोहोचले. नुसते पोहोचलेच नाही तर प्रचंड लोकप्रिय झाले. शिवजींचे वडील पंडित उमा दत्त हे गायक व तबलावादक होते.

जम्मू आणि श्रीनगर आकाशवाणी केंद्रात ते संगीत विभागप्रमुख म्हणून काम करायचे. त्यामुळे अगदी लहान वयात गाणे शिकत असताता शिवजींच्या हाती तबला आला. तबलावादन त्यांनी एवढे आत्मसात केले की, आकाशवाणीवरून प्रसारित होणा-या अनेक कार्यक्रमांत बालपणातच ते साथसंगत करू लागले. मात्र वयाच्या तेराव्या वर्षी अचानक त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हाती संतूर हे वाद्य दिले आणि हेच वाद्य तुला नवी ओळख मिळवून देईल, असा कानमंत्रही दिला. शिवजींनी मग या वाद्याला एवढे आपलेसे करून टाकले की, अवघ्या दोन-तीन वर्षांतच आकाशवाणीवरील लहान मुलांच्या कार्यक्रमात त्यांनी संतूरवादन केले. वयाच्या १८ व्या वर्षी मुंबईतील हरदास संगीत संमेलनात त्यांचा पहिला कार्यक्रम झाला व त्यांनी संगीत रसिकांना अक्षरश: अचंबित करून टाकले. सगळेच रसिक हे वाद्य पहिल्यांदाच पाहात होते आणि ऐकत होते. त्यामुळे त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही संमिश्रच होत्या. अभिजात संगीतासाठी हे वाद्य पुरेसे आहे का? अशी शंका त्या वेळी उपस्थित झाली आणि मग शिवजींनी या वाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देण्याचा ध्यासच घेतला. संगीतातील अद्भूत चमत्कार घडवत आपल्या सर्जनाने व अफाट मेहनतीने शिवजींनी ‘कटनोट्स’च्या वाद्याला परिपूर्ण केले.

व्ही. शांताराम यांनी ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील गीतासाठी शिवजींना वादनाचे निमंत्रण दिले. हिंदी चित्रपटात त्या वेळी पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाली होती. अशा वेळी शिवजींच्या संतूरचे मंजुळ व मोहक स्वरही चित्रपटसृष्टीत दाखल झाले. हा प्रवेश संगीतकारांसाठी व रसिकांसाठीही अत्यंत सुखकारक ठरला. या वाद्याच्या प्रवेशाने तरल व भावपूर्ण संगीताच्या अभिव्यक्तीसाठीची संगीतातील उणीव भरून निघाली. व्ही. शांताराम यांनी शिवजींना चित्रपटसृष्टीचे दार उघडून दिले मात्र तरीही शिवजींनी जम्मूला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतरच्या काळात त्यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत शिव-हरी नावाने अनेक चित्रपटांना संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रियही झाले. ‘सिलसिला‘,‘फासले’, ‘चांदनी’, ‘लम्हें’ ही त्याची काही उदाहरणे ! शिवजींसमोर सुरुवातीपासून सगळ्यात मोठे आव्हान होते ते संतूर या वाद्याला त्याची स्वतंत्र ओळख प्राप्त करून देण्याचे ! आपल्या सर्जनाने व अफाट मेहनतीने त्यांनी संतूरला जगभर स्वतंत्र ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळेच हे वाद्य व ते वाजविणारा वादक या दोहोंना रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मात्र या यशाने ते हरखून गेले नाहीत व थांबलेही नाहीत. त्यांनी सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील सर्जनतेशी निर्माण झालेले घट्ट नाते शेवटपर्यंत कायम ठेवले.

त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा आपल्या अस्तित्वाची व क्षमतेची कसोटी आहे हेच सूत्र मनात ठेवून त्यांनी प्रत्येक कार्यक्रम केला. विशेष म्हणजे संतूरला जगातील विविध संगीतशैलीत सामावून जाऊ न देता त्यांनी या वाद्याचे भारतीयत्व प्राणपणाने जपले ! संतूरच्या ध्वनीमध्येच आत्म्याला साद घालणारी मृदूता आहे. पंडित शिवकुमार यांंच्या व्यक्तिमत्त्वाची त्याला जोड मिळाली आणि त्यामुळेच जगभरातील रसिकांना तृप्त करून टाकणारा अजरामर मंजुळ नाद संतूरमधून जन्माला आला. मैफलीत वाद्यांचे स्थान हे संगत करण्याचे असते. मात्र शिवजींनी आपल्या सर्जनशीलतेने वाद्यालाच मैफलीचे नायक करून टाकले. अशा या राजस कलाकाराने भारतीय संगीत क्षेत्रात स्वत:च्या प्रतिभा व मेहनतीने संतूरवादनाचे एक नवे घराणेच जन्माला घातले आणि या घराण्याला अलौकिक प्रतिष्ठा व मान्यताही प्राप्त करून दिली. त्यांनी निर्माण केलेल्या मंजुळ नादाची ही परंपरा आता कायमच राहणार असली तरी त्यांच्या जाण्याने काही काळ हा मंजुळ नाद हरपल्याची भावना रसिकांमध्ये निर्माण होणे साहजिकच ! जिवंत आख्यायिका बनून राहिलेल्या या प्रतिभावान व सर्जनशील कलाकाराला ‘एकमत’ची भावपूर्ण आदरांजली !

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या