26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeसंपादकीयकथ्थकचे महाराजजी !

कथ्थकचे महाराजजी !

एकमत ऑनलाईन

भारतीय नृत्याचा जागतिक चेहरा म्हणून जगभर सुपरिचित असलेल्या पंडित बिरजू महाराज यांचे शांतावणे केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील कलाप्रेमी, रसिकांना चटका लावून जाणारेच आहे. नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्रकला अशा कलेच्या विविध प्रांतात देखणे आविष्कार करून त्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणारे पंडित बिरजू महाराज त्यांना मिळालेल्या ‘महाराजजी’ या उपाधीला सार्थ करून टाकणारे ठरले! लखनौमधील दरबारी कथ्थक ते जगभरातील नृत्यमहोत्सवातील नावीन्यपूर्ण व कथ्थकची जाणही नसणा-याला आपल्या आविष्काराने या कलेच्या प्रांतात आकंठ बुडविणारा अभिजात कलाकार हा त्यांचा प्रवास केवळ थक्क करून टाकणाराच! जिवंतपणीच दंतकथा ठरलेले महाराजजी यांनी अत्यंत लीलया हा प्रवास पार पाडला तो त्यांच्या कलेबाबतच्या अफाट समर्पणामुळे व कलासक्त जीवनावरील निस्सीम प्रेमामुळे! कला व महाराजजी यांची लय व सूर एवढे जुळले होते की, त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे केवळ अशक्यच! त्यामुळेच वयाच्या सातव्या वर्षापासूनच सुरू झालेला त्यांचा कलासक्त प्रवास अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच राहिला. कथ्थक जणू त्यांच्या रक्तातच भिनलेले होते. कथ्थकचा समृद्ध वारसा असलेल्या घराण्यात झालेला त्यांचा जन्म हे त्यामागचे एक कारण नक्कीच आहे. मात्र, ते महाराजजी बनण्यामागे त्यांनी कलेसाठीच जगण्याचे जे जीवनसूत्र अंगीकारले व त्यासाठी त्यांनी पूर्ण समर्पण दिले हे जास्त महत्त्वाचे कारण आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी कथ्थकवर स्वत:चे एवढे प्रभुत्व प्राप्त केले होते की, त्यांनी दिल्लीतील ‘संगीत भारती’मध्ये इतरांना कथ्थकचे धडे द्यायला सुरुवात केली होती. अथक परिश्रम, संपूर्ण समर्पण व कलेवरील निस्सीम प्रेम यामुळे जेव्हा ते भारतीय शास्त्रीय नृत्याचा चेहरा म्हणून नावारूपाला आले तेव्हा त्यांचे वय होते अवघे २८ वर्षे! २८ व्या वर्षी पंडित बिरजू महाराज यांना संगीत नाट्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. महाराजजींचे अस्तित्व हे इतरांपेक्षा वेगळे व ठसठशीत ठरले कारण त्यांनी इतरांप्रमाणे निव्वळ आपल्या घराण्याचा वारसा जपण्यात धन्यता मानली नाही. घराण्याने दिलेले संगीत शिक्षण हा तुमचा पाया आहे. त्यावर तुमच्या कल्पकतेने, सर्जनतेने नवे इमले चढवायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता व तो त्यांनी आयुष्यभर जपला. नर्तकाला वाद्ये, गायन या सगळ्याचीही जाण असायला हवी, हे त्यांचे तत्त्व होते. त्यामुळेच त्यांनी स्वत:ही शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. लोकसंगीताचे ज्ञान घेतले. या संगीतासाठी आवश्यक असणारी वाद्ये त्यांनी शिकून घेतली. वाद्यकला आत्मसात केली. त्यांनी स्वत: बंदिशी रचल्या. या बंदिशी ते स्वत: गायचे व त्यावर भाव आणि नृत्य अशी लयबद्ध गुंफण करायचे. त्यामुळे ते कधीच कुठल्या चौकटीत बंदिस्त झाले नाहीत. कलाक्षेत्रात त्यांचा मुक्तसंचार सुरू राहिला व या मुक्तसंचारानेच त्यांना कलाक्षेत्रात ठसठशीत वेगळेपण प्राप्त करून दिले. अवधी दरबारी नृत्यसादरीकरणाचा अनुभव गाठीशी असणा-या बिरजू महाराज यांनी अनेक ठुम-या, होरी, भजने रचली व ती आपल्या नृत्याविष्काराने अजरामर करून टाकली. आपल्या रचना, लयकारी ही सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचली पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळेच कथ्थकची जाण नसणा-या सर्वसामान्यांनाही कथ्थकच्या प्रेमात आकंठ डुंबवण्याची किमया त्यांनी साधली होती.

परंपरा व नवता या दोन्हीचा मेळ कलाकारांनी साधायला हवा, हा त्यांचा आग्रह होता. तो त्यांनी स्वत: निग्रहाने जपला व आपल्या शिष्यांमध्येही तो तंतोतंत उतरेल याची विशेष काळजीही त्यांनी घेतली. त्यामुळेच पारंपरिक राधा-कृष्णाच्या रचनांसह ते रोमिओ-ज्युलिएटही त्यांच्या नृत्यनाटकातून लीलया साकारू शकले. त्यामुळे अगोदर केवळ राजघराण्यांपुरती मर्यादित असलेली नृत्याविष्काराची दालने सर्वसामान्यांसाठी उघडून ती लोकप्रिय करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. याचे श्रेय महाराजजींचेच! विशेष म्हणजे परंपरा व नवता यांचा मेळ घालण्याचे प्रयोग करताना त्यांनी कलेची अभिजातता जराही ढळणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली. वयाच्या तिस-या-चौथ्या वर्षीच संगीत व नृत्य हेच आपले जीवन असेल अशी खूणगाठ बांधत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित केले. त्यांच्या या समर्पणामुळेच त्यांनी आपला प्रत्येक आविष्कार हा अजरामर तर करूनच टाकला पण हा आविष्कार बघणा-या प्रत्येकाला जगणे काय असते, ते किती समृद्ध, आनंददायक असू शकते याची जाणीव करून दिली. यामागे पंडित बिरजू महाराज यांची कठोर मेहनतही तेवढीच महत्त्वाची होती.

तरुणपणी ते अंधारात घुंगरू बांधून तासन्तास रियाज करायचे. त्यामागे आपला आविष्कार मनाच्या गाभा-यापर्यंत कसा आणि किती पोहोचतो हे तपासण्याची भावना होती. या भावनेतूनच ते प्रत्येक नृत्याविष्कार तन्मयतेने सादर करायचे तेव्हा त्यांच्या शरीरातील नसन्नस त्यांच्या आविष्काराशी तादात्म्य पावलेली असायची आणि एका अनोख्या, अद््भूत लयबद्धतेचे दर्शन रसिकांना व्हायचे! रसिकही मनाने व देहाने अशा अद्भूत आविष्काराशी तादात्म्य न पावला, एकरूप न झाला तरच नवल! आपल्या कलेच्या अभिजाततेशी कधीच तडजोड न करणा-या महाराजजींनी अन्य कोणत्या कलाप्रकारावर कुरघोडीचा प्रयत्न कधीच केला नाही. केवळ गुणात्मकतेच्या जोरावर त्यांनी स्वत:ची कला लोकप्रिय करून दाखविली. बिरजू महाराज यांचा दृष्टिकोन विशाल होता. त्यामुळेच त्यांनी व्यावसायिक हिंदी चित्रपटांना कधी नाके मुरडली नाहीत. त्यांनी त्याच तन्मयतेने व समर्पणाने हिंदी चित्रपटांसाठीही नृत्य दिग्दर्शन केले व त्या नृत्याचे सोने करून टाकले. मात्र, हे करताना त्यांनी चित्रपटाची गरज म्हणूनही कधीच आपल्या कलात्मकतेशी तडजोड केली नाही. नृत्यातील सर्जनतेचा अवर्णनीय आनंद लुटण्याची दृष्टी व जाणीव पुढील पिढीत पोहोचविण्यासाठी महाराजजी आयुष्यभर आग्रही राहिले व प्रयत्नरतही राहिले.

त्यामुळे दिल्लीतील त्यांच्या गुरुकुलमध्ये शिकण्यासाठी येणा-या त्यांच्या शिष्यांना केवळ नृत्याचे धडे व त्यातील बारकावे शिकायला मिळाले नाहीत तर त्यांना जगण्यातील अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली व हा आनंद प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणा-या समर्पणाचे धडेही प्राप्त झाले. पद्मविभूषण, कालिदास सन्मान यासारखे सर्वोच्च सन्मान महाराजजींना मिळणे हे तर निश्चितच होते पण हे सन्मान म्हणजे जीवनाची फलश्रुती नव्हे तर समोरच्या रसिकाची उत्स्फूर्त मिळणारी दाद हाच खरा सन्मान हीच महाराजजींची अतूट धारणा होती. त्यांना ही दादच ऊर्जा मिळवून द्यायची. त्यामुळेच उतारवयातही त्यांची लयबद्धता व आविष्कारातील ऊर्जा यात कुठलीही कमतरता कधीच झाली नाही. सर्वार्थाने कथ्थकचे ‘महाराजजी’च ठरलेल्या पंडित बिरजू महाराजांनी जगभरातील रसिकांना आपल्या आविष्काराने अक्षरश: संपन्न करून टाकले. त्यांच्या समर्पणाने व कलेवरील अतूट प्रेमाने त्यांचे जीवन जिवंतपणीच जगासाठी जिवंत दंतकथा ठरले! ते म्हणूनच ‘या सम हाच’ ठरले आहेत. कथ्थकच्या महाराजजींना ‘एकमत’ची विनम्र आदरांजली!

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या