25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसंपादकीयममतांची हॅट्ट्रिक!

ममतांची हॅट्ट्रिक!

एकमत ऑनलाईन

ऐन कोरोना संकटात देशात दुस-या लाटेचा प्रारंभ झाल्यानंतरही त्याची तमा न बाळगता पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला रविवारी सुरुवात झाल्यावर तमाम देशाचे लक्ष लागले होते ते पश्चिम बंगालमधील निकालांकडे! ते अत्यंत साहजिकही कारण देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी देशावर आलेल्या कोरोनाच्या दुस-या भयंकर लाटेकडे दुर्लक्ष करत मागच्या सहा महिन्यांपासून आपले सर्व लक्ष प. बंगालच्या निवडणुकीवर केंद्रित केले होते आणि केंद्रातील सत्ताधीश भाजपने आपली संपूर्ण शक्ती प. बंगालवर लावली होती. भाजपच्या अत्यंत आक्रमक प्रचाराने जोरदार वातावरणनिर्मितीही झाली होती. त्याच्या जोडीला भाजपने प. बंगालमध्ये साम, दाम, दंड, भेद या रणनीतीचाही मुक्तहस्ते वापर करत ममतांचा तृणमूल काँग्रेस पक्ष जेवढा खिळखिळा करता येईल तेवढा तो करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

ममता बॅनर्जी या अगोदरच आपल्या आक्रस्ताळी राजकारणासाठीच प्रसिद्ध आहेत. त्यांनी याच आक्रस्ताळी राजकारणाच्या जोरावर दहा वर्षांपूर्वी डाव्यांचा बालेकिल्ला असलेला प. बंगाल आपल्या ताब्यात घेतला होता. त्यामुळे भाजपने जेवढे तीव्र हल्ले चढविले त्या सर्व हल्ल्यांना ममतांनी आपल्या स्वभावानुसार जोरदार प्रत्युत्तर दिले. यातून प. बंगालमधील चुरस पराकोटीला पोहोचणे अटळच! त्यातूनच या राज्यातील प्रचाराने टोक गाठणे व प्रचाराची पातळीही निचांकी स्तरावर जाणे हे ही अटळच! अर्थात आता यात काही नवल राहिलेले नाही कारण मोदी-शहा या जोडीने भाजपवर ताबा मिळवल्यापासून त्यांच्या भाजपचे प्रत्येक निवडणुकीत ‘काहीही करून निवडणुकीत विजय’ हेच एकमेव धोरण राहिलेले आहे. या धोरणापुढे ही जोडी बाकी कशालाही प्राधान्य तर देत नाहीच पण दुस-या बाबींचा विचारही करत नाही. असो! निष्कर्ष एवढाच की जोवर मोदी-शहा ही जोडी भाजपवर आपले वर्चस्व ठेवून आहे तोवर या देशातील प्रत्येक निवडणूक ते अटीतटीची व प्रतिष्ठेचीच बनविणार, हे सुस्पष्ट आहे. त्यामुळे प. बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यास नवल वाटण्याचे काहीच कारण नाही. मात्र, या वातावरणनिर्मितीने मतदारांवर कायम गारूड करता येते, या समजाला प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सडेतोड उत्तर देत हा समज उद््ध्वस्त केला असल्याचे चित्र निवडणूक निकालात स्पष्टपणे पहायला मिळाले आहे.

ममतांच्या या कामगिरीने प्रसार माध्यमांना व एक्झिट पोललाही जोरदार दणका बसल्याने ते तोंडघशी पडले आहेत. बहुतांश एक्झिट पोल प. बंगालमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार व भाजप ममतांची दमछाक करणार असेच चित्र रेखाटत असताना ममतांनी प. बंगालमध्ये बलाढ्य व शक्तिशाली मोदी-शहा जोडीची पुरती दमछाक करून टाकण्याची करामत करून दाखविली त्याबद्दल ममतांचे अभिनंदनच करावे लागेल! व्हील चेअरवरून प्रचार ते भाजपला ‘बाहरी’ ठरवण्याचे कार्ड इथवर ममतांनीही भाजपच्या सर्व खेळ्यांना तोडीस तोड उत्तर देत आपण ‘शेराला सव्वाशेर’ असल्याचेच सिद्ध केले आहे व विजयाची जोरदार हॅट्ट्रिक साजरी करत सुस्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. अर्थातच निकालानंतरही दोन्ही बाजंूनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतायत व ते होत राहणेही अटळ आहे. कारण या निवडणुकीत कुठल्याही बाजूने शुचिता पाळली गेली नाहीच, हे देशाने स्पष्टपणे पाहिले आहेच! त्यामुळे या चिखलफेकीला आता निवडणूक निकालानंतर फारसा अर्थ नाही व त्यावर गांभीर्याने चर्चा करण्याचे त्यामुळेच काहीही कारण नाही.

परभणी ग्रामीण भागात एप्रिल अखेर ३२० कोरोना बाधितांचा मृत्यू

मात्र, देशातील सध्याची राजकीय स्थिती पाहता प. बंगालच्या निकालावरून आता पुढच्या निवडणुकीपर्यंत ‘ढलप्या’ काढण्याचे उद्योग जोमाने सुरू राहणार हे स्पष्टच! निवडणूक निकालात ममतांनी २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत मुसंडी मारल्याचे चित्र समोर येताच देशभर या ‘ढलप्या’ काढण्याच्या उत्साहाला उधाण आले आहेच. पण त्यामुळे निवडणूक निकालाचे तटस्थ विश्लेषण मात्र झाकोळून जाते. प. बंगालमध्ये ममतांनी सत्ता राखली त्याबद्दल त्यांचे कौतुक करतानाच या निवडणुकीत मागच्या वेळी राज्यात अस्तित्वही नसणा-या भाजपने डावे पक्ष व काँग्रेस या पक्षांना या राज्यातील राजकारणातून हद्दपार करत प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान बळकावले आहे., ही बाब राज्याच्या यापुढील राजकारणाच्या दिशेसाठी कळीची ठरते, याचे चिंतन व्हायला हवे. त्यामुळे प. बंगालच्या निकालानंतर कालपर्यंत आपण ज्या ममतांचे विरोधक होतो त्यांच्या हॅट्ट्रिकवर आनंद मानायचा की, भाजपने आपली जागा बळकावून आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, याचे गंभीर चिंतन करायचे हे भाजपविरोधी पक्षांना ठरवावे लागेल.

भाजपसाठी या राज्यात गमावण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे जरी त्यांना सत्तापरिवर्तनात यश आले नाही व त्यांची प्रतिष्ठा गेली तरी प्रमुख विरोधक म्हणून त्यांनी प. बंगालमध्ये आपले बस्तान बसवले, हे नाकारता येणार नाहीच! ममतांसाठी आता ही कायमची डोकेदुखी ठरणार आहे. असो! बाकी उर्वरित चार राज्यांमध्ये अपेक्षितच निकाल हाती येत आहेत. तामिळनाडूत अपेक्षेप्रमाणे द्रमुक सत्तेवर आला आहे. तिथे काँग्रेस द्रमुकसोबत आहे, हा काँग्रेससाठी या निकालांमधील दिलासा! केरळमध्ये मात्र मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कमाल केली आहे. या राज्यातील दर पाच वर्षाला सत्तांतर ही मागच्या चार दशकांची परंपरा खंडित करून सलग दुस-यांदा सत्ता प्राप्त करण्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी यशस्वी ठरली. काँग्रेससाठी हा चिंतेचाच विषय ठरावा! आसाममध्ये भाजपने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे तर पुद्दुचेरीचे चित्र सुस्पष्ट नसले तरी भाजपच तिथे आघाडीवर असल्याचे मतमोजणीच्या प्राथमिक फे-यांत स्पष्ट झाले.

एकंदर काय तर बरेच चित्र रंगविले तरी या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात प. बंगालात सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या अपेक्षाभंगाव्यतिरिक्त फारसे काहीच अनपेक्षित घडलेले नाही. त्यातून ममता भविष्यात मोदी-शहा जोडीचा प्रमुख विरोधक चेहरा म्हणून राष्ट्रीय राजकारणात उदयाला येणार का? हाच काय तो कळीचा प्रश्न! मात्र, त्याचे उत्तर विखुरलेल्या भाजपविरोधी पक्षांच्याच हाती आहे. काँग्रेस ममतांचे राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता नाहीच. मग ममतांना राष्ट्रीय पातळीवर भाजपला टक्कर द्यायची तर काँग्रेसेतर इतर प्रादेशिक पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करावी लागेल. ममता हा प्रयोग करणार की, प. बंगालच्याच सत्तेवर समाधानी राहणार, हे आता पहायचे! बाकी या पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे वर्णन ‘अपेक्षित निकाल’ या दोनच शब्दांत करावे लागेल, हे मात्र निश्चित!

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या