23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeसंपादकीयघोळात घोळ! शिक्षणाचा बट्ट्याबोळ!!

घोळात घोळ! शिक्षणाचा बट्ट्याबोळ!!

एकमत ऑनलाईन

कोरोना संकटाचे देशात आगमन होऊन तब्बल १६ महिने उलटून गेले आहेत. मात्र, तरीही राज्याचा शिक्षण विभाग राज्यातील शिक्षण क्षेत्राचे नेमके काय करायचे? या गोंधळातून बाहेर पडायला तयारच नाही. परीक्षा घेणार की, नाही घेणार? यावर भरपूर गोंधळ घालून झाल्यावर एकदाचे परीक्षा होणार नसल्याचे जाहीर झाले. मात्र, परीक्षा नाही तर मग मुलांना गुण कसे देणार? यावर गोंधळ सुरू झाला. न्यायालयाच्या हस्तक्षेपाने कसा तरी हा घोळ मिटला आणि अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करण्याचा मार्ग निश्चित झाला. आता राज्यात ‘अंतर्गत मूल्यमापन’ याकडे शिक्षण मंडळाने आजवर किती गांभीर्याने पाहिले आहे याचा इतिहास सर्वश्रुतच नव्हे तर अगदी उपहासाचाच विषय! त्यामुळे त्याद्वारे शिक्षण मंडळाने अत्यंत गतीने लावलेल्या दहावी परीक्षेच्या निकालावर काही भाष्य करण्यात व त्यात दर्जा, गुणवत्ता वगैरे शोधण्यात काही अर्थच नाही.

त्याबाबतचे सविस्तर विश्लेषण याच ठिकाणी ‘एकमत’ने दहावी निकालानंतर केलेलेच आहे. मात्र, त्याचवेळी निकालानंतर या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाबाबत योग्य धोरण न ठरवले गेल्यास त्याबाबत नवा घोळ निर्माण होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व प्रवेश प्रक्रिया रखडू शकते, हे ही ‘एकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. मात्र, तरीही राज्यातील शिक्षण खात्याने जो गोंधळ व घोळ घालायचा वसा घेतला आहे, तो सोडण्यास शिक्षण खाते काही केल्या तयार नाहीच! निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आल्याने राज्यातील अकरावीच्या परीक्षेसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येईल, असे शिक्षण खात्याने जाहीर केले. त्यावरही हरकत असण्याचे कारण नाहीच! मात्र, तिथेही शिक्षण खात्याचा गृहपाठ कच्चाच आणि वर या खात्याला आता लांगुलचालनाची सवय जडलीय. त्यामुळे खात्याने विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा बंधनकारक नाही तर ऐच्छिक असेल, अशी पुस्ती जोडली. मात्र, केंद्रीय पद्धतीने जी प्रवेश प्रक्रिया राज्यात पार पडते, तेथे मात्र, ही प्रवेश प्रक्रिया देणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य असेल, असे जाहीर केले! शिक्षण खात्याच्या या संदिग्ध व गोंधळलेल्या भूमिकेने आता व्हायचा तो घोळ निर्माण झाला आहे.

मुळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्नच राज्यात उपस्थित होत नाही कारण तिथे प्रवेश क्षमतेच्या २५ ते ३० टक्केही विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत, ही आजवरची राज्याची आकडेवारी आहे. सगळा प्रश्न निर्माण होतो तो शहरी व महानगरातील प्रवेशाचा! आपल्या मुलाने चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवला तर त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस योग्य दिशा मिळेल, हा त्यामागचा पालकांचा दृढ समज हे त्याचे प्रमुख कारण! हे कारणही चुकीचे आहे, असे अजिबात नाही. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालये शैक्षणिक दर्जा उंचावू शकलेले नाहीत, हे वास्तव नाकारता येतच नाही. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेताना चांगल्या व नावाजलेल्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, याची धडपड केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागात शालेय शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी व त्यांचे पालक करत असतात. त्यामुळे शिक्षण खाते जरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असल्याचे जाहीर करत असले तरी प्रत्यक्षात चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा तर ही परीक्षा बंधनकारकच हेच वास्तव!

मग अशावेळी ती कोरोनाकाळात कशी सुरळीत पार पाडायची, याचे नियोजन शिक्षण खात्याने अगोदरच करायला हवे. मात्र, तिथे शिक्षण खात्याची पाटी पूर्ण कोरीच! ही परीक्षा ऑफलाईनच होणार, असे शिक्षण खात्याने जाहीर करून टाकले! कोरोनाचे कारण पुढे करून जर दहावी परीक्षा रद्दच करण्याचा निर्णय झाला असेल तर मग आज राज्यातील कोरोना स्थितीत असा कोणता आमूलाग्र बदल झालाय की, त्यामुळे प्रवेश परीक्षा ऑफलाईनच होणार, असे शिक्षण खात्याने जाहीर करून टाकावे? हा प्रश्नच! एकीकडे आरोग्यतज्ज्ञ देशात तिसरी लाट तोंडावर आल्याचे इशारे देत असताना व महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांची कोरोना स्थिती आजही गंभीर असल्याचे सांगून राज्य सरकार तेथील निर्बंध सैल करण्यास तयार नसताना त्याच राज्याचे शिक्षण खाते मात्र, परीक्षा ऑफलाईनच होणार, असे जाहीर करत असेल तर यापेक्षा मोठी विद्यार्थ्यांची क्रूर चेष्टा दुसरी कोणती? शिक्षण खात्याने राज्य सरकारला अवगत न होता ही परीक्षा कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून, प्रतिबंधात्मक उपायांसह, सुरक्षेची पूर्ण हमी घेत पार पाडण्याचे तंतोतंत नियोजन केले आहे, असाच याचा अर्थ निघतो!

तसे असेल तर उत्तमच कारण हे आज ना उद्या करणे भागच आहे कारण कोरोना काही एवढ्यात देशाची व राज्याची पाठ सोडणार नाही, हे आता सुस्पष्टच झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात शिक्षण खात्याने असे कडेकोट नियोजन केल्याचे कुठेही आढळून येत नाहीच! म्हणजेच मग ही परीक्षा होणार की, नाही? याबाबतचा संभ्रम कायमच राहण्याची चिन्हे! त्याचा परिणाम म्हणून अकरावी प्रवेशावरची टांगती तलवार कायमच! बरे एवढा घोळ कमी की काय म्हणून आता या प्रवेश परीक्षेला नेमक्या कोणत्या मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसता येईल व त्यासाठी प्रवेश परीक्षेत कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील? हा नवा घोळ निर्माण झाला आहे व तो न्यायालयात पोहोचला आहे! हे होणे अटळच होते कारण प्रवेश परीक्षा जाहीर करताना शिक्षण खात्याला त्यावर काहीएक विचार करण्याची गरज आहे, असे वाटलेलेच नाही. न्यायालयात सरकारचा युक्तिवाद असा की, राज्य मंडळ हे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठीचे प्रश्न निश्चित करू शकत नाही आणि अन्य मंडळांच्या प्रश्नांची उत्तरे राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी देऊ शकत नाहीत. याचाच अर्थ असा की, सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमावरच सामायिक प्रश्नपत्रिका काढण्याची शिक्षण खात्याची तयारी नाही की, तशी इच्छाही नाही!

मग आता इतर मंडळांतून दहावी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी अकरावीला कुठे प्रवेश घ्यायचा? हा प्रश्नच! विशेष म्हणजे न्यायालयात सरकारतर्फे ही बाजू मांडली जात असताना प्रत्यक्षात सीईटीसाठी अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी राज्यात सुरू झालेली होती! आता बोला!! याला काय म्हणावे शिक्षण खात्याच्या अकलेचे कांदे की, शिक्षण खात्यातील बजबजपुरीचा अस्सल पुरावा? हा सगळा प्रकार न्यायालयातच उघडा पडल्यावर आता न्यायालयानेच अकरावी प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाबरोबरच अन्य शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत प्रश्नांचाही समावेश करण्याबाबत विचार करा, असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी सर्व शिक्षण मंडळांची संयुक्त समिती तयार करून प्रश्नपत्रिका निश्चितीच्या पर्यायावर विचार करा, असे सुचवितानाच ४ ऑगस्टपर्यंत सरकारने भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. थोडक्यात काय तर अकरावी प्रवेशाचा राज्यातला गुंता कमी होण्याऐवजी त्यात भरच पडणार, हे सुस्पष्ट करणारीच ही स्थिती! हा सगळा शिक्षण खात्याच्या दिव्य कारभाराचा व शिक्षणाकडे पाहण्याच्या दिव्य दृष्टिकोनाचा परिणाम, त्यामुळेच राज्यातील शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेला गोंधळ व घोळात घोळ दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, हे मात्र निश्चित!

जुळे सोलापूर रोटरी क्लबच्या माध्यमातून सचिन चौधरी यांचे लक्षवेधी कार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या