28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeसंपादकीयपैसा झाला मोठा!

पैसा झाला मोठा!

एकमत ऑनलाईन

आपले जीवन निर्धोकपणे पार पडावे यासाठी माणसाची धडपड सुरू असते. दोन वेळची भूक भागविण्यासाठी काबाडकष्ट करण्याची त्याची तयारी असते. संसाराचा गाडा रेटण्यासाठी गरज असते ती अर्थाची. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून माणूस प्रामाणिकपणे कष्ट करीत असतो. आपल्या बुद्ध्यांकाच्या जोरावर धनसंचय करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. प्रत्येकजण काही जन्मत:च सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येत नसतो. त्यामुळे समाजात श्रीमंत-गरीब अशी विभागणी झालेली दिसते. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांच्यातील संघर्ष सतत सुरू असल्याने श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी वरचेवर रुंदावत जाताना दिसते. ही दरी कमी झाली की राज्याचा अर्थगाडा सुसाट सुटतो आणि पर्यायाने देशाची भरभराट होते. देशाला महाशक्ती बनण्याची ओढ लागते. या ओढीला खोडा घालण्याचे काम एखादी अदृष्य शक्ती करते तेव्हा माणूस हताश होतो.

सध्या कोरोना नावाची महाशक्ती ‘मीच बलवान’चा नारा देते आहे. या महाशक्तीने सारे जग व्यापून टाकले आहे. एखादी टोळधाड यावी अन् तिने सारे काही फस्त करून टाकावे, तसे झाले आहे. मानवी जीवनाचे असे एकही क्षेत्र शिल्लक नाही की ज्याला कोरोनारूपी वाळवी लागली नाही! या वाळवीने सारे समाजजीवन पोखरून टाकले आहे. एका मागून एक टोळधाडी येतच आहेत आणि त्यासमोर माणूस ‘किंकर्तव्यमूढ’ बनला आहे. कोरोना संसर्गाचा फटका राजकारणाला, समाजकारणाला, शिक्षणाला, उद्योगक्षेत्राला, मनोरंजन क्षेत्राला तसेच क्रीडाक्षेत्रालाही बसला. सारे काही संपले आहे असे वाटत असताना क्रीडाक्षेत्रामुळे माणसाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. परंतु कोरोना संसर्गाने आता त्यावरही दहशतीची टांगती तलवार लटकवली आहे. आणखी दोन महिन्यांनी जपानमध्ये होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेवरही अनिश्चिततेचे सावट आहे.

गतवर्षी होणारी स्पर्धा कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रीडा प्रकाराला कोरोनाची ढकलपट्टी मिळाली आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ही टी-२० क्रिकेट स्पर्धा जगातील सर्वांत मोठी स्पर्धा मानली जाते. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. या संघटनेमार्फत आयपीएलचे आयोजन केले जाते. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे आयपीएलचे १३ वे पर्व संयुक्त अरब अमिरातीमध्ये भरवण्यात आले होते. त्यावेळी आयपीएलचे १४ वे पर्व २०२१ मध्ये भारतातच आयोजित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ९ एप्रिल रोजी १४ वे पर्व सुरू झाले. २०२० मध्ये मुक्कामाला आलेल्या कोरोनाने आपले बस्तान बसवले होते. २०२१ मध्ये त्याची दुसरी लाट अधिक त्वेषाने आली. परंतु आयपीएल स्पर्धा सुरूच राहिली. सहभागी संघांना बायो बबलचे (जैव सुरक्षा) सुरक्षा कवच असल्याने स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल असा आयोजकांचा अंदाज होता. अर्धी स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडलीसुद्धा; परंतु अखेर कोरोनाने डाव साधला. आयोजकांच्या अंदाजाला सुरुंग लागला.

विनाकारण सलाईन लावून रुग्णांची लूट

जैव-सुरक्षित वातावरणात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत अखेर कोरोनाने शिरकाव केलाच. कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी अहमदाबाद येथे रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सहायक कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली. चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका कर्मचा-याचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. दिल्लीच्या कोटला स्टेडियमवरील मैदान कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील १० कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स यांच्यात मंगळवारी दिल्लीत सामना होणार होता; परंतु हा सामनाही रद्द करण्यात आला. कारण सनरायजर्सच्या वृद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. कोलकाता-बंगळुरू सामना पुढे ढकलण्यात आल्यामुळे आयपीएलची प्रतिमा काळवंडली होती. परंतु मुंबई-हैदराबाद सामनाही पुढे ढकलण्यात आल्याने आयपीएलची प्रतिमा अधिक काळी झाली.

चार संघांच्या खेळाडूंना आणि सहायकांना कोरोनाची बाधा झाल्याने स्पर्धा आयोजकांना स्पर्धाच स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएलची उर्वरित स्पर्धा मुंबईत खेळविण्याचा आयोजकांचा विचार होता. परंतु देश कोरोनाशी सामना करत असताना स्पर्धा मुंबईत खेळवण्याचे प्रयत्न रोखा अशा प्रकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यामुळे स्पर्धा आयोजकांनी स्पर्धाच स्थगित केली. त्याआधी कोरोनाच्या कारणावरून आर. अश्विन, झम्पा, रिचर्डसन या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली होती. स्पर्धा स्थगित झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे १४, न्यूझिलंडचे १०, इंग्लंडचे ११, द. आफ्रिकेचे ११, वेस्ट इंडिजचे ९, अफगाणिस्तानचे ३ आणि बांगला देशच्या २ खेळाडूंचा सहभाग होता. या खेळाडूंना त्यांच्या मायदेशी कसे पाठवणार हा प्रश्न आहे. कारण विमानसेवा बंद आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबरमध्ये भारतात होणा-या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझिलंडने भारतातील आयोजनावर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. आयसीसी या स्पर्धेचे आयोजन करणार आहे आणि बीसीसीआय फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देणार आहे. आयपीएल स्थगित झाल्याने बीसीसीआयच्या संघटनात्मक कौशल्याला धक्का बसला आहे असे नाही परंतु भारतीय क्रिकेटचे नुकसान मात्र झाले आहे. कारण या स्पर्धेतून भारतीय क्रिकेटला सकारात्मक ऊर्जा मिळत होती. अनेक गुणवान युवा खेळाडू मिळत होते. सामाजिक बांधीलकी लक्षात घेऊन बीसीसीआयने योग्य निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. नाही तरी आयपीएल हे बायप्रॉडक्टच म्हणता येईल. त्याचा फायदा संघमालकांना, सरकारला, जाहिरातदारांनाच होत होता. अर्थात खेळाडूंनाही आर्थिक लाभ मिळत होताच. ‘पैसा झाला मोठा’ ही टीकाही त्यातूनच! देशात आरोग्य सुविधांची कमतरता आणि मरण यातनांच्या किंकाळ्या सुरू असताना आयपीएलचे मनोरंजन योग्य नव्हते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या